Duologue with Barun Das S3: आयुष्य अन् अध्यात्मशी संबंधित प्रश्नांची श्री श्री रविशंकर यांनी दिली उत्तरं
'डायलॉग्स विथ बरुण दास'च्या तिसऱ्या सिझनच्या नवीन भागात बरूण दास यांनी अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांच्याशी जीवन, अध्यात्म आणि ओळख यावर सखोल संवाद साधला. श्री श्री रविशंकर यांनी आत्म-शोधाची गरज, भारतीय संस्कृतीत प्रश्न विचारण्याचे महत्त्व आणि जीवनाचे परस्परसंबंधित स्वरुप अधोरेखित केलं.

‘डायलॉग विथ बरूण दास’ या लोकप्रिय शोच्या तिसऱ्या सिझनचा नवीन भाग प्रदर्शित झाला आहे. या भागात टीव्ही 9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरूण दास यांनी अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांच्याशी माहितीपूर्ण संवाद साधला. हा शो ‘न्यूज 9’ आणि ‘न्यूज 9 प्लस’वर प्रेक्षकांच्या भेटीला येतो. या शोचे प्रस्तुतकर्ता रेडिको असून टाटा एआयजी आणि टाटा कॅपिटल याचे असोसिएट पार्टनर आहेत. या नवीन एपिसोडमध्ये बरूण दास यांनी श्री श्री रविशंकर यांना अनेक महत्त्वपूर्ण प्रश्न विचारले आहेत, ज्यांची त्यांनी मोकळेपणे उत्तरंदेखील दिली आहेत.
या नव्या एपिसोडच्या सुरुवातीला बरुण दास यांनी त्यांच्या पाहुण्यांबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली. त्याचसोबत ही चर्चा अनेक दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचं अधोरेखित केलं. गुरूजींकडून काहीतरी शिकण्याची ही माझ्यासाठी संधी असल्याचंही त्यांनी म्हटलं. बरुण दास यांनी नंतर यावर भाष्य करताना असंही सांगितलं की त्यांनी त्यांच्या आयुष्यात कधीही कोणालाही दोष दिला नाही. “एक व्यक्ती म्हणून मी माझं आयुष्य कोणालाही दोष न देता जगलोय,” असं ते म्हणाले. त्यानंतर अध्यात्मिक गुरूंसोबत प्रश्नोत्तरांची मालिका सुरू झाली.
“मी कोण आहे?”
बरुण दास यांनी अध्यात्मिक गुरूंना विचारलं की मी कोण आहे? त्यावर उत्तर देताना श्री श्री रविशंकर म्हणाले की, “प्रत्येक प्रौढ व्यक्तीने स्वत:ला हा प्रश्न विचारला पाहिजे की अखेर मी आहे तरी कोण? खरंतर इथूनच आत्म्याच्या प्रवासाची सुरूवात होते. हा एक वैज्ञानिक प्रश्न आहे, त्याचा अधिक शोध घेण्याची गरज आहे.” यावेळी श्री श्री रविशंकर यांनी भारतीय संस्कृतीत प्रश्न विचारण्याचं महत्त्वदेखील सांगितलं. ते पुढे म्हणाले, “गीतेत असंही नमूद केलंय की कोणतीही गोष्ट स्वीकारण्यापूर्वी एखाद्या व्यक्तीने त्याबद्दल विचार करावा आणि नंतर ती योग्य वाटल्यास स्वीकारावी.”




श्री श्री रविशंकर म्हणाले की, “आपण आपल्या बुद्धिमत्तेला खूप महत्त्व देतो. माझी बुद्धी सत्याने भरलेली असावी हीच आमची सर्वांत मोठी प्रार्थना आहे.” आपल्या ओळखीच्या विविधतेबद्दल आणि आपण त्याकडे कसं पाहतो, त्याला कसं समजून घेतो याबद्दल बोलताना गुरुदेव पुढे म्हणाले, “आयुष्य हे आपण जे विचार करतो किंवा ज्याला ब्रँड बनवतो, लेबल लावतो आणि स्वत:ला मर्यादित ठेवतो त्यापेक्षा खूप जास्त आहे.” या मुद्दयावर त्यांनी सविस्तर संवाद साधला.
आपण आपल्या ओळखीशी चिपकून राहतो- श्री श्री रविशंकर
संवादाला पुढे नेत श्री श्री यांनी अध्यात्मिक प्रवासासाठी ‘तुमची जाणीव वाढवण्याचं’ महत्त्व आणि आपण आपल्या ओळखीपेक्षा कितीतरी जास्त आहोत यावर भर दिला. “या जगातील सर्वांत मोठी समस्या म्हणजे आपण आपल्या ओळखीशी चिकटून राहिलोय”, असं गुरुदेव म्हणाले. यावर बरुण दास यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील एक किस्सा सांगितला. यावेळी ते म्हणाले की त्यांचा मुलगा अनेकदा त्यांना म्हणायचा की, “तुम्ही घरी सीईओ नाही आहात, त्यामुळे त्यासारखं वागू नका.”
आयुष्य हे एक व्यवहार आहे का?
या एपिसोडमध्ये पुढे विविध मुद्द्यांवर चर्चा सुरू राहिली. त्यामध्ये अशा विषयांवर खोलवर चर्चा झाली जे व्यक्तीच्या आतील जीवनाशी आणि त्याच्या सभोवतालच्या व्यावहारिक जगाशी जोडणारे होते. हे व्यक्तीच्या स्वत:शी आणि जगाशी असलेल्या संघर्षाचं एका अर्थी परीक्षण होतं आणि याच भावनेने दास यांनी गुरुदेवांना विचारलं, “आयुष्य एक व्यवहार आहे का? माझ्या आणि इतर आयुष्यांमध्ये काही व्यवहार होत आहेत का?” श्री श्री रविशंकर यांनी या भावनेशी सहमती दर्शविली आणि स्पष्ट केलं की, “विश्वातील प्रत्येक गोष्ट इतर सर्व गोष्टींवर परिणाम करते. तुम्ही सतत कंपनं पाठवत आहात. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीच्या मन:स्थितीचा परिणाम केवळ त्याच्यावरच नाही तर त्याच्या सभोवतालच्या प्रत्येक व्यक्तीवर होतो,”
आयुष्याच्या व्यवहारात्मक स्वरुपाचा मुद्दा पुढे मांडताना बरूण दास यांनी विचारलं की, “मी समोरच्याला काय देतो याचा हिशोब ठेवत नाही, तर मला काय मिळतंय याचा मी मागोवा घेतो.” त्यावर गुरुदेवांनी स्पष्ट केलं की, “तुम्हाला असं करण्याची गरज नाही. आयुष्यात प्रत्येक गोष्ट मोजली जाऊ शकतत नाही. तुम्ही प्रत्येक गोष्टीचं मोजमाप करू शकत नाही.”