ED Raid : ईडीचा पुन्हा छापेमारीचा धडाका; उद्योग क्षेत्रातील ‘या’ आघाडीच्या कंपनीचे प्रमुख रडारवर
राजकारण्यानंतर आता उद्योजकांवर ईडीने आपला मोर्चा वळवला आहे. उद्योजकांवर छापेमारीचं सत्र सुरुच आहेत. देशातील बड्या उद्योजकांचा यात समावेश आहे.
नवी दिल्ली / 3 ऑगस्ट 2023 : राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनलेली अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडी ही केंद्रीय तपास यंत्रणा आता उद्योग क्षेत्रातही कारवाईसाठी सक्रिय झाली आहे. या तपास यंत्रणेने मागील काही दिवसांत विविध उद्योग आस्थापनांवर कारवाईचा धडाका लावला आहे. याचदरम्यान उद्योगक्षेत्रात आघाडीवर असलेल्या हिरो मोटोकॉर्पचे प्रमुख पदाधिकारी ईडीच्या रडारवर आले आहे. यात कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष पवनकांत मुंजाळ आणि इतर पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. आर्थिक अफरातफरीच्या गुन्ह्यातील सहभागाच्या संशयावरून ईडीने मुंजाळ यांच्यासह इतर संबंधितांच्या मालमत्तांवर छापेमारी सुरू केली आहे. या छापेमारीत मोठ्या प्रमाणावर देशी आणि परदेशी चलन तसेच हिरे आणि सोन्याच्या दागिन्यांचे मोठे घबाड ईडीच्या हाती लागले आहे. ईडीने जवळपास 25 कोटींहून अधिक रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.
नवी दिल्ली, गुरुग्राम येथील कार्यालयांवर धाडी
हिरो मोटोकॉर्प कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक अफरातफर झाल्याचा संशय ईडीच्या अधिकाऱ्यांना आहे. याच अनुषंगाने या कंपनीतील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मालमत्तांची झाडाझडती घेण्यात येत आहे. ईडीच्या पथकाने मंगळवारी संपूर्ण दिवसभर नवी दिल्ली आणि गुरुग्राम परिसरातील कंपनीच्या कार्यालयांवर धाडी टाकल्या. त्याचबरोबर संबंधित व्यावसायिकांच्या घरांचीही झाडाझडती घेण्यात आल्याची माहिती ईडीच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.
हिरो मोटोकॉर्पशी संबंधित इतर छोट्या कंपन्याही चौकशीच्या फेऱ्यात अडकल्या आहेत. ईडीने कसून चौकशी करीत आर्थिक अफरातफर प्रकरणात गुंतलेल्या रक्कमेचा उलगडा करण्याचे ठरवले आहे. मात्र नुकत्याच केलेल्या या छापेमारीत कोणत्या व्यावसायिकाकडे किती रक्कम वा सोन्याच्या दागिन्यांचा किती ऐवज हाती लागला, याचा नेमका तपशील ईडीने अद्याप उघड केलेला नाही.
उद्योग क्षेत्रात खळबळ
ईडीचे पथक सर्वप्रथम हिरो मोटोकॉर्प कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष पवनकांत मुंजाळ यांच्या घरी धडकले. त्यानंतर एकापाठोपाठ एक धाडी टाकण्यात आल्या. या छापेमारीदरम्यान मुंजाळ यांच्यासह हेमंत दहिया, के. आर. रमण यांच्या घरांची झाडाझडती घेण्यात आली. त्याचबरोबर हिरो मोटोकॉर्प लिमिटेड आणि हिरो फिनकार्प लिमिटेड या कंपन्यांच्या कार्यालयांची कसून तपासणी करण्यात आली. यावेळी संशयित कागदपत्रे, हार्ड डिस्क, सोन्या-चांदीचे दागिने, हिरे तसेच मोठ्या प्रमाणावर देशी-परदेशी चलन हस्तगत करण्यात आले आहे. जप्त केलेल्या ऐवजाची सर्वसाधारण किंमत जवळपास 25 कोटींहून अधिक रुपयांच्या घरात आहे. या कारवाईने उद्योग क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.
ईडीने केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाच्या (सीबीआयसी) तपास शाखा, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) आरोपपत्राच्या आधारे प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या (पीएमएलए) विविध कलमांतर्गत आर्थिक अफरातफरीचा गुन्हा नोंदवला आहे. दरम्यान, ईडीच्या पथकाला छापेमारी तसेच तक्रारीच्या अनुषंगाने अधिक चौकशीसाठी संपूर्ण सहकार्य केले जात असल्याचे कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.