बीसीसीआयचे माजी चेअरमन एन श्रीनिवासन यांना झटका, इंडिया सिमेंटवर ईडीचा छापा
बीसीसीआयचे माजी चेअरमन एन श्रीनिवासन यांना मोठा झटका बसला आहे. श्रीनिवासन यांच्या मालकीची कंपनी इंडिया सिमेंटच्या कार्यालयावर ईडीने छापा टाकला आहे

चेन्नई| 1 फेब्रुवारी 2024 : बीसीसीआयचे माजी चेअरमन एन श्रीनिवासन यांना मोठा झटका बसला आहे. श्रीनिवासन यांच्या मालकीची कंपनी इंडिया सिमेंटच्या कार्यालयावर ईडीने छापा टाकला आहे. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने चेन्नई येथे असलेल्या इंडिया सिमेंटच्या आवारात छापा टाकला आहे. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन हे इंडिया सिमेंट्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि उपाध्यक्ष आहेत. इंडिया सिमेंट ही देशातील सर्वात मोठी सिमेंट कंपन्यांपैकी एक आहे. महसुलाच्या बाबतीत ही 9वी सर्वात मोठी सूचीबद्ध सिमेंट कंपनी आहे. त्यांच्या मुंबई तसेच चेन्नई येथील कार्यालयात छापे टाकण्यात आले आहेत
इंडिया सिमेंटचे तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा येथे 7 प्लांट आहेत. विशेष म्हणजे, 2008 ते 2014 पर्यंत, इंडिया सिमेंट्सकडे इंडियन प्रीमियर लीग फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्जची थेट मालकी होती.
मिळालेल्या माहितीनुसार, ईडी टीमने बीसीसीआय आणि आयसीसीचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या कंपनीवर छापा टाकला आहे. ईडीच्या टीमने चेन्नईतील इंडिया सिमेंट्सच्या ठिकाणांवर छापे टाकल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ईडीने चेन्नईशिवाय मुंबई तसेच श्रीनिवासन यांच्या इतर काही कार्यालयांवरही छापे टाकले असून तेथे तपास सुरू आहे. एन. श्रीनिवासन हे इंडिया सिमेंटचे उपाध्यक्ष आणि एमडी आहेत. ईडीच्या छाप्यामुळे एन. श्रीनिवासन यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होऊ शकते.
भ्रष्टाचाराविरुद्ध ईडीची मोहीम सुरूच
अंमलबजावणी संचालनालय भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सातत्याने कारवाई करत आहे. राजकारण्यांपासून ते व्यावसायिकांपर्यंत अनेक जण ईडीच्या रडारवर आहेत. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. जमीन घोटाळ्याच्या आरोपांमुळे हेमंत सोरेन यांना झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता ते ईडीच्या ताब्यात आहे. याप्रकरणी तपास यंत्रणेने अद्याप त्याची अधिक चौकशी केलेली नाही.