जिममध्ये ट्रेनिंगच्या बहाण्याने मैत्री, नंतर प्रेम आणि मग धक्कादायक घटनेने हादरलं शहर
जिम ट्रेनर विमल सोनी याने व्यावसायिकाची पत्नी एकता गुप्ता हिला आपल्या जाळ्यात ओढलं. दोघांमध्ये मैत्री झाली आणि मग त्यांच्यात प्रेम संबंध सुरु झाले. त्यानंतर अचानक दोघांमध्ये वाद सुरु झाले. विमलला राग अनावर झाला आणि त्याने नको ते पाऊल उचललं. या घटनेने संपूर्ण शहर हादरलंय.
जिममध्ये ट्रेनिंगच्या बहाण्याने आधी मैत्री, नंतर प्रेम आणि मग खून. अशी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या हत्येचा सुगावा कोणाला लागू नये म्हणून आरोपीने मृतदेहाची विल्हेवाट लावली. आपला गुन्हा लपवण्यासाठी त्याने अशी जागा निवडली की त्याचा कोणी विचारही करू शकत नाही. खून केल्यानंतर तो चार महिने पोलिसांच्या नजरेपासून लांब पळत राहिला. पण जेव्हा तो पकडला गेला तेव्हा सगळा प्रकार उघडकीस आला.
कानपूरच्या एकता गुप्ता या महिलेच्या हत्याकांडातील वास्तव अतिशय धक्कादायक आहे. व्यापाऱ्याची पत्नी असलेली एकता गुप्ता आणि जीम ट्रेनर विमल सोनी यांची भेट एका जिममध्ये झाली. यानंतर दोघेही एकमेकांच्या जवळ आले आणि त्यांच्यात अवैध संबंध सुरु झाले. काही महिने सगळं सुरळीत चाललं होतं. पण अचानक जेव्हा विमलचा साखरपुडा ठरल्याचं तिला कळालं त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरु झाले.
एकता आणि विमलमध्ये वाद
एकता बरेच दिवस जिमला आली नाही. तेव्हा विमलही तिच्यापासून सुटका करून घेण्याचा विचारात होता. 24 मे रोजी एकता जीममध्ये गेली, मात्र इतर महिलांमुळे विमल तिच्याशी बोलू शकली नाही. यानंतर विमलने एकताच्या प्रोटीन शेकमध्ये झोपेची गोळी मिसळली. यामुळे एकताला चक्कर येऊ लागल्यावर विमलने तिला गाडीत जाऊन बसण्यास सांगितले.
विमल आणि एकता यांचा कारमध्ये वाद झाला. यादरम्यान त्याने एकताच्या नाकावर जोरात बुक्की केली. ज्यामुळे एकता बेशुद्ध झाली आणि त्यानंतर विमलने तिचा गळा आवळून खून केला. आता मृतदेहाची विल्हेवाट लावायची म्हणून त्याने जिल्हा दंडाधिकारी निवास संकुलातील निर्जन जागा शोधली. या ठिकाणी त्याने पाच फूट खोल खड्डा खणून तिचा मृतदेह त्यामध्ये पुरला. यानंतर विमल फरार झाला.
पोलिसांच्या चौकशीत विमलचे खरे नाव विमल कुमार असल्याचे समोर आले. जिममधील महिलांना प्रभावित करण्यासाठी त्याने आपले नाव बदलले होते. जिम ट्रेनर बनण्याआधी तो एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होता. एका आयएएस अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून त्याला जिम ट्रेनरची नोकरी मिळाली होते. त्याने हळूहळू इतर अधिकाऱ्यांशी संपर्क वाढवण्यास सुरुवात केली.
गैरवर्तनासाठी जिममधून हकालपट्टी
जिममध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीने सांगितले की, काही दिवसांपूर्वी त्याला चुकीच्या कामांमुळे जीममधून हाकलून देण्यात आले होते. मात्र, त्याने आपल्या संपर्कात आलेल्या लोकांच्या मदतीने पुन्हा एकदा येथे नोकरी मिळवली. विमलने सांगितले की, जिममध्ये दुसऱ्या महिलेला प्रशिक्षण देण्याच्या मुद्द्यावरून एकता त्याच्याशी भांडत असे.
एकताच्या हत्येला चार महिने पूर्ण झाले होते. त्यानंतर विमल पोलिसांच्या हाती लागला. त्याने कबुली दिल्यानंतर पोलिसांनी तो खड्डा खोदला असता त्यात केवळ सांगाडा सापडला. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. विमलची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती तर कदाचित तिचा जीव वाचला असता, असे एकताच्या पतीचे म्हणणे आहे.