माजी IPS सिंघम शिवदीप लांडे यांची नवीन इव्हिनिंग ? सोशल मीडियावर लिहिले ‘मातीच्या ऋणाकडे एक पाऊल…’
IPS Shivdeep Lande News: अकोला जिल्ह्यातील रहिवाशी असलेले बिहार केडरचे माजी आयपीएस शिवदीप लांडे यांनी राजीनामा दिल्यानंतर बिहार कर्मभूमी करण्याचा निर्णय जाहीर केला. राजीनामा दिल्यानंतर ते अकोल्यात परतले नाही. ते बिहारमध्येच थांबले असून आपल्या भविष्यातील पावलांवर काम करत आहेत.

IPS Shivdeep Lande News: माजी IPS अधिकारी, महाराष्ट्रातील रहिवाशी असलेले आणि बिहारमध्ये सिंघम म्हणून ओळखले गेलेले शिवदीप लांडे यांनी नवीन इव्हिनिंग सुरु करण्याचे संकेत दिले आहेत. आयपीएस सेवेचा शिवदीप लांडे यांनी दिलेला राजीनामा 13 जानेवारी रोजी मंजूर झाला होता. त्यानंतर त्यांच्या नवीन भूमिकेबाबत चर्चा सुरु आहे. अजूनही त्यांनी त्याबद्दल स्पष्ट काही सांगितले नसले तरी ते राजकारणात प्रवेश करण्याची शक्यता आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून ते राजकारणात येऊ शकतात. याबाबत त्यांनी संकेत देणारी पोस्ट सोशल मीडियावर लिहिली आहे. त्यात म्हटले आहे की, ‘One step towards the debt of soil…’ त्याची ही पोस्ट वेगाने व्हायरल झाली आहे.
काय आहे सोशल मीडिया पोस्टवर
अकोला जिल्ह्यातील रहिवाशी असलेले बिहार केडरचे माजी आयपीएस शिवदीप लांडे यांनी राजीनामा दिल्यानंतर बिहार कर्मभूमी करण्याचा निर्णय जाहीर केला. राजीनामा दिल्यानंतर ते अकोल्यात परतले नाही. ते बिहारमध्येच थांबले असून आपल्या भविष्यातील पावलांवर काम करत आहेत. सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असणारे शिवदीप लांडे यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यांनी ‘One step towards the debt of soil…’ या पोस्टसोबत सूर्याला नमस्कार करतानाचा त्यांचा फोटो आहे. त्यात बिहारचा नकाशा आहे. त्यानंतर आणखी एक पोस्ट शिवदीप लांडे यांनी लिहिली आहे. त्यात ‘कर्मयोग…. ख़ाकी से खाक होने तक…’, असे कॅप्शन दिले असून त्यात त्यांचा वर्दीतील आणि साधा फोटो आहे.
19 सप्टेंबर रोजी दिला राजीनामा
माजी IPS शिवदीप लांडे यांनी 19 सप्टेंबर 2024 रोजी राजीनामा दिला होता. त्यावेळी ते पूर्णिया येथे आयजी होते. राजीनामा देण्याच्या 13 दिवसांपूर्वी ते 6 सप्टेंबर रोजी पूर्णिया विभागाचे IG म्हणून कार्यभार घेतला होता. अनेक दिवस त्यांचा राजीनामा मंजूर झाला नाही. त्यामुळे ते राजीनामा मागे घेतली, अशी चर्चा सुरु होती. परंतु जानेवारी महिन्यात त्यांचा राजीनामा मंजूर झाला.




शिवदीप वामनराव लांडे २००६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात २९ ऑगस्ट १९७६ रोजी त्यांचा जन्म झाला. २ फेब्रुवारी २०१४ रोजी ममता शिवतारे यांच्यासोबत ते विवाहबद्ध झाले. सामाजिक कार्यात ते नेहमी अग्रसेस असतात. ते आपल्या पगारातील सुमारे ७०% रक्कम गरीब मुलींचे सामूहिक विवाह आणि अकोल्यातील विद्यार्थ्यांसाठी कोचिंग क्लासेससाठी खर्च करतात.