Fact Check : शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावरील तिरंगा हटवून आपला झेंडा लावला का? तथ्य काय?
शेतकऱ्यांनी तिरंग्याचा अपमान केल्याचाही आरोप होतोय. याच आरोपांची ही तथ्यता तपासणी.
नवी दिल्ली : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाने आक्रमक रुप धारण केलंय. मोदी सरकारने नवे कृषी कायदे मागे घ्यावेत या मागणीसाठी सुरु असलेलं हे आंदोलन आयटीओ भागात हिंसक झालंय. दिल्ली सीमेवर वेगवेगळ्या ठिकाणी ट्रॅक्टर मार्च काढण्यात येत आहे. त्यापैकी आयटीओ या ठिकाणी असलेल्या ट्रॅक्टर मार्चमधील आंदोलक आक्रमक झालेत. त्यांनी आपला पूर्वनियोजित ट्रॅक्टर मार्चचा मार्ग बदलत लाल किल्ल्यावर पोहचले. या ठिकाणी आंदोलकांनी लाल किल्ल्यावर झेंडा फडकावला. मात्र यावरुनच आता अनेक अफवा पसरण्यास सुरुवात झालीय. शेतकरी आंदोलकांनी लाल किल्ल्यावरील तिरंगा काढून आपला झेंडा लावल्याचा आरोप होतोय. शेतकऱ्यांनी तिरंग्याचा अपमान केल्याचाही आरोप होतोय. याच आरोपांची ही तथ्यता तपासणी (Fact Check of Allegations on Farmer Protesters about insulting National flag at Lal Killa).
आयटीओ येथील ट्रॅक्टर मार्चातील आक्रमक आंदोलकर्त्यांनी अचानक आपला मार्ग बदलत थेट लाल किल्ल्याकडे कूच केली. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापटही झाली. यामुळे बराच तणाव निर्माण झाला. आंदोलकांचे अनेक ट्रॅक्टर लाल किल्ल्यावर पोहचले. त्यानंतर या ट्रॅक्टरमधील आंदोलकांनी लाल किल्ल्यावर चढाई केली.
Delhi: Flags installed by protestors continue to fly at Red Fort. #FarmLaws #RepublicDay pic.twitter.com/U0SZnTw4Wn
— ANI (@ANI) January 26, 2021
यापैकी काही आक्रमक आंदोलकांनी लाल किल्ल्यावर तिरंगा झेंड्याच्या शेजारी असलेल्या एका खांबावर चढून शिख धर्मात पवित्र मानला जाणारा निशान साहिब हा झेंडा लावला. यानंतर आक्रमक आंदोलनकांपैकी अनेकांनी लाल किल्ल्यावर ठिकठिकाणी चढून शिख धर्माचे झेंडे फडकावले. विशेष म्हणजे यावेळी अनेक शेतकरी आंदोलक हातात तिरंगा झेंडा फडकावत सरकारचा निषेध करतानाही दिसले.
शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मार्चमधील 20 पेक्षा अधिक ट्रक्टर लाल किल्ल्यात घुसले आहेत. सुरुवातील आयटीओ येथील स्थिती चिघळली होती. मात्र आता परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती मिळत आहे. लाल किल्ल्यावर ट्रॅक्टर पोहचल्याने मोठ्या प्रमाणात सुरक्षा दलांना येथे पाचारण करण्यात आलंय.
देशाची राजधानी दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाची परेड लक्षात घेऊन शेतकरी आंदोलनाला परेड संपल्यावर ट्रॅक्टर मार्च काढण्याची परवानगी दिली होती. मात्र, दिल्ली सीमेवर सकाळी 8 वाजल्यापासूनच शेतकरी जमा होण्यास सुरुवात झाली. काही शेतकरी आंदोलक तर पायीच राजधानी दिल्लीच्या दिशेने रवाना झाले. सेंट्रल दिल्लीतील आयटीओ येथे काही आक्रमक आंदोलनकर्त्यांनी गोंधळ घातल्याचंही पाहायला मिळालं.
संबंधित बातम्या :
ठरलेल्या मार्गावरुन भ्रम, हिंसा घडवणं पूर्वनियोजित कट, शेतकऱ्यांचा सरकारवर गंभीर आरोप
Delhi Farmers Tractor Rally तिरंग्याचा अपमान सहन करणार नाही, शेतकरी आंदोलनावरुन संजय राऊत कडाडले
Delhi Farmers Tractor Rally LIVE | शेतकऱ्यांची लाल किल्ल्यावर धडक, दिल्लीत तणाव
व्हिडीओ पाहा :
Fact Check of Allegations on Farmer Protesters about insulting National flag at Lal Killa