GDP: जागतिक मंदीदरम्यान भारत सर्वाधिक मजबूत अर्थव्यवस्था म्हणून येणार समोर, ही आहेत कारणे
जगभरात मंदीचे वातावरण असताना भारत मात्र यात चांगली कामगिरी करू शकतो अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.
नवी दिल्ली, एकीकडे जागतिक मंदीची (global recession) भीती व्यक्त केली जात असताना दुसरीकडे मात्र 2022-23 मध्ये 7 टक्के विकास दरासह भारत (India GDP) सर्वात मजबूत अर्थव्यवस्था म्हणून उदयास येईल अशी शक्यता वर्तविण्यात येईल. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे (EAC-PM) सदस्य संजीव सन्याल म्हणाले की, 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला, जेव्हा जागतिक अर्थव्यवस्था वाढत होती तेव्हा बाह्य वातावरण सकारात्मक होते. अशा वातावरणात भारताने नऊ टक्के वाढ नोंदविली होती. येणाऱ्या काळात निश्चितच असे वातावरण निर्माण होणार आहे की जगभरातील अनेक देशांना मंदीचा सामना करावा लागेल, इतकेच काय तर काही देश मंदीतही जाऊ शकतात.
संजीव सन्याल म्हणाले की, कडक आर्थिक धोरणापासून ते ऊर्जेच्या चढ्या किमती आणि युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेला व्यत्यय अशी अनेक कारणे आहेत. जागतिक बँकेने बिघडलेल्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीचे कारण देत अलीकडेच भारताच्या विकास दराचा अंदाज कमी केला आहे. ताज्या अंदाजानुसार, भारतीय अर्थव्यवस्था 2022-23 या आर्थिक वर्षात 6.5 टक्के दराने वाढेल, जी जून 2022 च्या अंदाजापेक्षा एक टक्के कमी आहे.
अशा परिस्थितीत, भारताची कामगिरी सर्वोत्तम असेल, चालू आर्थिक वर्षात जीडीपी वाढीचा दर सात टक्के असलेल्या प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये तो सर्वात मजबूत असेल. ते म्हणाले की, नरेंद्र मोदी सरकारने गेल्या काही वर्षांत केलेल्या पुरवठा बाजूच्या सुधारणांमुळे भारताची अर्थव्यवस्था पूर्वीपेक्षा अधिक लवचिक आणि आक्रमक आहे. 2002-03 ते 2006-07 या काळात जागतिक अर्थव्यवस्था वाढत असताना, जागतिक चलनवाढीचा दबाव कमी होता, तसेच बाह्य वातावरण भारताला मिळाले, तर अशा परिस्थितीत अर्थव्यवस्था नऊ टक्के दराने वाढू शकते.
डॉलर मजबूत होत आहे
संन्याल म्हणाले की, सध्या अशी कोणतीही परिस्थिती नाही, ती पाहता 7 टक्के वाढ ही चांगली कामगिरी म्हणावी लागेल. रुपया ऐतिहासिक नीचांकी पातळीवर पोहोचल्याबाबत संन्याल म्हणाले की, केवळ डॉलर-रुपया विनिमय दराच्या आधारे आपण याला प्राधान्य द्यावे असे मला वाटत नाही. इतर चलनांच्या तुलनेत डॉलर मजबूत होत असताना, या परिस्थितीत डॉलर वगळता इतर चलनांच्या तुलनेत रुपया प्रत्यक्षात मजबूत होत आहे.