Gyanvapi Masjid | कोर्टाच्या आदेशानंतर 7 दिवस नाही, 12 तासांच्या आत ज्ञानवापी मशीद परिसराच्या तळघरात पूजा
Gyanvapi Masjid | व्यासजींच्या तळघरात पूजा करण्यात आली. कोण होते पुजारी? हे तेच पुजारी आहेत, त्यांनी रामललाच्या प्राण प्रतिष्ठेचा मुहूर्त काढला होता. अयोध्येत राम मंदिराचा शिलान्यास आणि काशी विश्वनाथ कॉरिडोरच्या उद्घाटनाचा मुहूर्तही त्यांनीच काढलेला.
Gyanvapi Masjid | वाराणसीच्या ज्ञानवापी परिसरात तब्बल 31 वर्षानंतर व्यासजींच्या तळघरात पूजा करण्यात आली. जिल्हा न्यायाधीशाच्या आदेशानंतर काशी विश्वनाथ मंदिर ट्रस्टने गणेश्वर शास्त्री द्रविड यांच्याकडून ही पूजा करुन घेतली. गणेश्वर शास्त्री द्रविड यांनी मध्यरात्रीच्या सुमारास व्यासजींच्या तळघरात पूजा-अर्चा केली. पूजेच्या समयी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष या नात्याने वाराणसीचे आयुक्त कौशल राज शर्मा, मंदिर प्रशासनाचे माजी वर्तमान सीईओ उपस्थित होते. पूजेची पद्धत गणेश्वर शास्त्री द्रविड यांनी ठरवली. विधि विधानासह व्यासजींच्या तळघरात पूजा केली. ओम प्रकाश मिश्रा गर्भ गृहाचे पुजारी आहेत. पूजेनंतर काही लोकांना चरणामृत आणि प्रसादही दिला.
गणेश्वर शास्त्री द्रविड यांनीच रामललाच्या प्राण प्रतिष्ठेचा मुहूर्त काढला होता. अयोध्येत राम मंदिराचा शिलान्यास आणि काशी विश्वनाथ कॉरिडोरच्या उद्घाटनाचा मुहूर्तही त्यांनीच काढलेला. त्यांनीच आता ज्ञानवापी परिसराच्या तळघरात पूजा-अर्चा केली.
कोर्टाने आदेशात काय म्हटलेलं?
बुधवारी दुपारी 3 वाजता वाराणसी जिल्हा न्यायाधीशांनी निर्णय दिला. निर्णयामध्ये व्यासजींच्या तळघरात पूजा करण्याचा आदेश होता. आदेशाच्या अमलबजावणीची जबाबदारी श्री काशी विश्वनाथ मंदिर ट्रस्टला देण्यात आली होती. कोर्टाने निर्देश दिले होते की, “7 दिवसांच्या आता तिथे पूजा करण्याची व्यवस्था करावी. कोर्टाच्या आदेशानंतर 12 तासात व्यासजींच्या तळघरात पूजा करण्यात आली”
छावणीमध्ये बदलला ज्ञानवापी परिसर
जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशाच्या आदेशानंतर ज्ञानवापी परिसरात मोठ्या संख्येने पोलीस बळ तैनात करण्यात आलं. बुधवारी संध्याकाळी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. डी.एम. पोलीस आयुक्त आणि अन्य अधिकारी रात्री ज्ञानवापी परिसरात पोहोचले. रात्री 11 वाजता गणेश्वर शास्त्री द्रविड मंदिर परिसरात पोहोचले. 31 वर्षानंतर ज्ञानवापी परिसरात पूजा झाल्यानंतर कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने शांतता आहे. कुठेही अप्रिय घटना घडलेली नाही.