सेकंदातच होत्याचं नव्हतं झालं, ॲटॅक येताच आरामात बसलेला जिम ट्रेनर कोसळला, जागीच मृत्यू; घटना सीसीटीव्हीत कैद
आदिलने गेल्या काही दिवसांपासून जिमचं काम बंद करून प्रॉपर्टी डिलिंगचं काम सुरू केलं होतं. त्यासाठी त्याने ऑफिस उघडलं होतं. रोज तो या ऑफिसात बसायचा.
गाजियाबाद: गेल्या काही दिवसांपासून तरुणांमध्ये हृदयविकाराच्या (heart attack) झटक्याचं प्रमाण अधिक वाढलं आहे. दिल्लीच्या (delhi) जवळच असलेल्या गाजियाबादमध्येही अशीच एक घटना घडली आहे. ऑफिसात बसलेल्या एका जिम ट्रेनरला अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर तो खुर्चीतून कोसळला आणि अवघ्या काही क्षणातच त्याचा मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (cctv) कैद झाली असून हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.
गाझियाबादमधील साहिबाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. शालीमार गार्डन येथे राहणाऱ्या 35 वर्षी आदिल नावाच्या युवकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. आदिल हा जिम ट्रेनर आहे. शालीमार गार्डन परिसरात तो जिम चालवतो. तो रोज एक्सरसाईज करायचा.
आपल्या कार्यालयात बसलेला असताना अचानक त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि तो खुर्चीतून खाली कोसळला. त्याला रुग्णालयात नेईपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती.
आदिलने गेल्या काही दिवसांपासून जिमचं काम बंद करून प्रॉपर्टी डिलिंगचं काम सुरू केलं होतं. त्यासाठी त्याने ऑफिस उघडलं होतं. रोज तो या ऑफिसात बसायचा. नेहमीप्रमाणे आजही तो ऑफिसात बसला होता.
तेव्हा अचानक त्याला हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे तो खुर्चीतून कोसळला. त्यामुळे कार्यालयातील लोकांनी तात्काळ त्याला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. पण रुग्णालयात पोहोचेपर्यंत त्याने प्राण सोडले होते. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
मिळालेल्या माहितीनुसार, आदिल फिटनेस फ्रिक होता. रोज जिममध्ये जाऊन तो एक्सरसाईज करायचा. गेल्या काही दिवसांपासून त्याला ताप होता. त्यानंतरही त्याने जिममध्ये जाणं बंद केलं नव्हतं. आदिलला दोन मुले आहेत. त्याच्या निधनामुळे त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगरच कोसळला आहे.