आलीशान आणि वेगवान वंदेभारतच्या काचा फुटल्या, पाहा कुठे घडला प्रकार
वंदेभारतच्या उद्घाटनापासून तिची गुरांशी धडक झाल्याच्या अनेक घटना मागे घडल्या आहेत. यामुळे या गाडीचा पुढील एअरो डायनामिक कोन असलेला फायबरचा भाग क्षतिग्रस्त झाल्याच्याही अनेक घटना घडल्या आहेत.
नवी दिल्ली : देशाची पहिली सेमीहायस्पीड ट्रेन वंदेभारतच्या मागे लागलेले शुक्लकाष्ट संपायचे नावच घेत नसल्याचे उघड झाले आहे. आधी गुरांच्या धडकांनी वंदेभारतचे वारंवार नुकसान झाले असताना आता वादळी वारे आणि वीज कोसळल्याने हावडा-पुरी-हावडा वंदेभारतची विंडस्क्रीन क्षतिग्रस्त होऊन ड्रायव्हर केबिनच्या काचा फुटल्याची घटना काल रात्री घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही मनुष्यहानी झाली नसून ही ट्रेन सहा तासाहून अधिक रखडल्याने सोमवारची फेरी रद्द करण्यात आली आहे.
देशाची सोळावी वंदेभारत
हावडा-पुरी-हावडा मार्गावरील देशाच्या 16 व्या वंदेभारत एक्सप्रेसचे उद्घाटन 18 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. या ट्रेनच्या प्रवासी फेऱ्या दोन दिवसांपासून सुरू झाल्या होत्या. भद्रक रेल्वे स्टेशनच्या व्यवस्थापकांनी सांगितले की सोसाट्याचे वारे आणि जोरदार पावसाने ड्रायव्हर केबिनच्या समोरील काचा आणि साईड विंडोच्या काचा क्षतिग्रस्त झाल्या. त्यात वीजप्रवाह देखील खंडीत झाल्याने वंदेभारत एकाच जागी अनेक तास उभी होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही मनुष्यहानी झाली नाही. ज्या वेळी ही घटना घडली त्यावेळी ही ट्रे दुलखापटना-मंजूरी रेल्वे स्थानकादरम्यान होती.
असे आहे वेळापत्रक
ट्रेन क्रमांक 22895/22896 हावडा-पुरी वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातून 6 दिवस धावते. ही ट्रेन गुरुवारी धावत नाही. ही ट्रेन हावडाहून स.6.10 वाजता रवाना होते. आणि दुपारी 12.35 वाजता पुरीला पोहचते. परतीची ट्रेन पुरीहून दुपारी 1.50 वाजता निघते. आणि रात्री 8.30 वाजता हावडाला पोहचते. ही देशाची 16 वी वंदेभारत असून ओडीशाची पहीली वंदेभारत ट्रेन आहे. ओडीशाचे पवित्र तीर्थस्थान पुरी शहराला ती पश्चिम बंगालच्या हावडा शहराने जोडली गेली आहे.
गुरांच्या धडका
वंदेभारतच्या उद्घाटनापासून तिची गुरांशी धडक झाल्याच्या अनेक घटना मागे घडल्या आहेत. यामुळे या गाडीचा पुढील एअरो डायनामिक कोन असलेला फायबरचा भाग क्षतिग्रस्त झाल्याच्याही अनेक घटना घडल्या आहेत. वंदेभारतचा वेग 160 किमी प्रति तास असल्याने तिला सुरूवातीपासून मोकाट गुरांचा धोका निर्माण झाला आहे. मुंबई-अहमदाबाद मार्गावर वंदेभारतने धडक दिल्याने गुरांचा मृत्यू झाल्याच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत. या घटनेनंतर रेल्वे ट्रॅकच्या शेजारी पोलादी कुंपण बसविण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे.
मेक इन इंडीया
वंदेभारत देशाची पहीली सेमी हायस्पीड ट्रेन आहे. जिचा वेग ताशी 160 किमी ते 180 किमी इतका आहे. ही ट्रेन मेक इन इंडीया अंतर्गत संपूर्ण देशी तंत्रज्ञानाने तयार करण्यात आली आहे. जिच्या 80 भागांना देशातच विकसित केले आहे. चेन्नईच्या आयसीएफ कारखान्यात तिची निर्मिती केली आहे. ही विजेवर धावणारी इंजिनलेस ट्रेन असून अत्यंत आरामदायी आहे. तिच्या विमानाप्रमाणे इंटेरिअर असून जीपीएस आधारित इंडीकेटर, सीसीटीव्ही, वॅक्युम बायोटॉयलेट, ऑटोमेटीक स्लायडींग डोअर आदी सुविधा आहेत.