काँग्रेस कात टाकणार? सोनिया ‘त्या’ नेत्यांना भेटणार!
नेतृत्वबदलाबाबत पत्र लिहिणाऱ्या नेत्यांपैकी एकाने सोनिया गांधी यांनी भेटीसाठी बोलावलं असल्याचं सांगितलं आहे. या बैठकीत काँग्रेसमधील काही नाराज नेत्यांचाही समावेश असेल अशी माहिती मिळतेय.
नवी दिल्ली: काँग्रेसमधील नेतृत्वबदलाबाबत सोनिया गांधी यांना 23 नेत्यांनी पत्र लिहिल्यानंतर काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळाला होता. पण त्या 23 नेत्यांपैकी काही नेत्यांना पक्षाच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी भेटणार असल्याची माहिती मिळतेय. 19 डिसेंबरला होणारी ही बैठक मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी घडवून आणल्याचं सांगितलं जात आहे. या बैठकीला कमलनाथही उपस्थित असणार आहे. (Important meeting between Sonia Gandhi and Congress leaders )
नेतृत्वबदलाबाबत पत्र लिहिणाऱ्या नेत्यांपैकी एकाने सोनिया गांधी यांनी भेटीसाठी बोलावलं असल्याचं सांगितलं आहे. या बैठकीत काँग्रेसमधील काही नाराज नेत्यांचाही समावेश असेल अशी माहिती मिळतेय. पण नेतृत्वबदलाबाबतच्या पत्रावर या नेत्यांनी स्वाक्षरी केली नव्हती.
राहुल, प्रियंका गांधी उपस्थित राहणार?
या बैठकीला राहुल गांधी आणि प्रियंका गांधी उपस्थित राहणार का? याबाबत अद्याप स्पष्टता नाही. पण प्रियंका गांधी यांच्यामार्फतच ही बैठक होत असल्याचं बोललं जात आहे. महत्वाची बाब म्हणजे पत्र लिहिणारे नेते आणि सोनिया गांधी यांच्या बैठकीनंतर काँग्रेसमधील सुंदोपसुंदी दूर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
‘ते’ पत्र कुणी लिहिलं आणि पत्रात नेमकं काय?
ऑगस्ट 2020 मध्ये काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, कपिल सिब्बल या काँग्रेसमधील दिग्गजांसह 23 नेत्यांनी सोनिया गांधी यांना नेतृत्वबदलाबाबत पत्र लिहिलं होतं. त्यात महाराष्ट्रातील काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, मिलिंद देवरा यांचाही समावेश होता. या पत्राद्वारे त्यांनी सोनियां गांधींकडे पक्षाला सक्रिय अध्यक्ष देण्याची आणि संघटनेत व्यापक बदलाची मागणी केली होती. हे पत्र म्हणजे पक्ष नेतृत्व आणि खास करुन गांधी कुटुंबाला आव्हान असल्याचं काँग्रेसमधील अनेक नेत्यांचं मत बनलं. त्यामुळे काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचं चित्र संपूर्ण देशात निर्माण झालं होतं.
‘त्या’ पत्रानंतर कारवाईची मागणी
सोनिया गांधी यांना नेतृत्वबदलाबद्दल पाठवलेल्या पत्रानंतर गुलाम नबी आझाद यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही झाली. बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर आझाद आणि कपिल सिब्बल यांनी पक्षाच्या कार्यशैलीवर पुन्हा एकदा बोट ठेवलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा काँग्रेसमधीलच काही नेत्यांनी आझाद आणि सिब्बल यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
सुनील केदार यांचा इशारा
पक्ष नेतृत्वाबाबत लिहिल्या गेलेल्या पत्रात महाराष्ट्रातील काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आणि मिलिंद देवरा यांचाही समावेश होता. त्यावरुन काँग्रेसचे मंत्री सुनील केदार यांनी सोनिया गांधी यांची माफी मागा, नाही तर राज्यात फिरु देणार नाही, असा इशाराज चव्हाण आणि देवरा यांना दिला होता.
दरम्यान, आज सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या बैठकीत कोणते नेते सहभागी होतात आणि या बैठकीत नेमकी काय चर्चा होते, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
Rahul Gandhi urges Lok Sabha Speaker to protect right of MPs to speak freely at house panel meetings
Read @ANI Story | https://t.co/0SZq3uvJrd pic.twitter.com/zs7p8pnmb0
— ANI Digital (@ani_digital) December 18, 2020
संबंधित बातम्या:
काँग्रेस नेत्यांनी भाजपला हाताशी धरुन पत्र लिहिल्याचे राहुल गांधी म्हणालेच नाहीत : गुलाम नबी आझाद
CWC Meeting | भाजपसोबत हातमिळवणीचे आरोप, राहुल गांधींवर भडकलेले कपिल सिब्बल पुन्हा शांत
Important meeting between Sonia Gandhi and Congress leaders