VIDEO: ज्ञानवापी मशिदीतील सर्वेचा व्हिडीओ समोर, शिवलिंग, मंदिरांचे खांब, मूर्तींचे अवशेष असल्याचे स्पष्ट, केंद्राने हस्तक्षेप करावा हिंदू पक्षकारांच्या वकिलांची मागणी
तिथे शिवलिंग असल्याचे स्पष्टपणे दिसते आहे. या शिवलिंगात छिद्र करण्यात आल्याचेही या व्हिडीओत दिसते आहे. या परिसरात ८ फुटांचे जुन्या मंदिराचे चार खांब असल्याचेही व्हिडिोत दिसते आहे. या खांबांची रचना एखाद्या हिंदू मंदिराप्रमाणेच आहे. या परिसरातील भिंतींवर आणि मंदिरांच्या खांबावर स्वस्तिक, त्रिशुळ, डमरु, घंटा, पानांचे आकार, कलश अशी हिंदू धर्मात मान्यता असलेली चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत.
वाराणसी– वाराणसीच्या काशी विश्वेश्वर मंदिराच्या परिसरात असलेल्या ज्ञानवापी (Gyanvapi mosque)मशिदीवरुन गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहे. हे प्रकरण कोर्टातही गेलं आहे. जिल्हा कोर्टाच्या आदेशानुसार ४ हिंदू आणि मुस्लीम पक्षकारांच्या उपस्थितीत या मशिदीचा सर्वे करण्यात आला होता. त्यावेळी त्या परिसरातील व्हिडिओ शूटिंगही करण्यात आले होते. या सर्वेनंतर वजूखान्यात शिवलिंग (Shivling)असल्याचा युक्तीवाद हिंदू पक्षकारांनी केला होता. तर ते शिवलिंग नसून कारंजा असल्याचे मुस्लीम पक्षकारांचे म्हणणे होते. कोर्टाने त्यानंतर हा परिसर सुरक्षित करण्याचे आदेश दिले होते. सुप्रीम कोर्टातही मुस्लीम पक्षकारांनी धाव घेतली होती, मात्र या प्रकरणात ८ आठवड्यांत सुनावणी करण्याचे आदेश वाराणसी जिल्हा कोर्टाला सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. आता या सर्वेचा व्हिडिओच (Video of survey)समोर आला आहे. या व्हिडिओत ज्ञानवापी मशिदीच्या परिसरात मंदिर, शिवलिंग असल्याचे स्पष्टपणे दिसते आहे.
पाहा हा व्हिडीओ
काय आहे व्हिडीओत
ज्ञानवापीच्या मशिदीत असलेल्या वजूखान्यात, जिथे मुस्लीम बांधव हात–पाय धुत असत, त्या ठिकाणी असलेल्या हौदातील पाणी काढले असता, तिथे शिवलिंग असल्याचे स्पष्टपणे दिसते आहे. या शिवलिंगात छिद्र करण्यात आल्याचेही या व्हिडीओत दिसते आहे. या परिसरात ८ फुटांचे जुन्या मंदिराचे चार खांब असल्याचेही व्हिडिोत दिसते आहे. या खांबांची रचना एखाद्या हिंदू मंदिराप्रमाणेच आहे. या परिसरातील भिंतींवर आणि मंदिरांच्या खांबावर स्वस्तिक, त्रिशुळ, डमरु, घंटा, पानांचे आकार, कलश अशी हिंदू धर्मात मान्यता असलेली चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत. काही मूर्तींचे अवशेषही या परिसरात असल्याचे व्हिडीओत दिसते आहे. मंदिराच्या कळसाप्रमाणे असलेले शिखरही आतल्या भागात असल्याचे या व्हिडिओतून दिसत असल्याचा दावा हिंदू पक्षकारांनी केला आहे.
तळघर उघडण्याची मागणी
या परिसरातील तळघराचे चार दरवाजे बंद आहेत, ते उघडण्याची मागणी हिंदू पक्षकारांनी केलेली आहे. १५ बाय १४.७ फुटांचे हे तळघर आहे. या परिसरात अजून दोन फूट खोदकाम केल्यास अधिक पुरावे मिळतील, असा दावा हिंदू पक्षकारांच्या वकिलांनी केला आहे. या शिवलिंगाजवळ विहिरही सापडली असून, ती मंदिरात असलेल्या मूर्तीच्या स्नानासाठी बांधण्यात आल्याचा दावाही करण्यात आला आहे.
केंद्राने हस्तक्षेप करावा अशी हिंदू पक्षकरांची मागणी
हा व्हिडीओ समोर आल्यानंतर, या ठिकाणी हिंदू मंदिर होते, हे स्पष्ट असल्याचे हिंदू पक्षकारांचे म्हणणे आहे. या जुन्या खांबाजवळच नव्या विटांचे दोन खांब बांधले असल्याचेही वकील सांगत आहेत. यावरुन या जागेचे धार्मिक स्वरुप बदलण्यात आल्याचे स्पष्ट होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणातील हिंदू पक्षकारांचे वकील हरीशंकर जैन आणि विष्णू जैन यांनी या प्रकरणात केंद्राने हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे. या प्रकरणाची दररोज सुनावणी व्हावी. वरशिप एक्टबाबत गांभिर्याने चर्चा व्हावी, जे सत्य आहे, तेच समोर आले आहे. अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान या प्रकरणाची पुढील सुनाणी ४ जुलैला वाराणसी कोर्टात होणार आहे.