Rajasthan Murder & Suicide : उदयपूरमध्ये पती-पत्नीमधील वादातून तीन मुलांची हत्या करुन महिलेची आत्महत्या
कछिया खेडी गाव रस्त्यावरील आरएनटी कॉलेजच्या पोल्ट्री फार्ममध्ये ही घटना घडली आहे. शेतात लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये आई तीन मुलांना फासावर लटकवताना दिसत आहे, असे कापसनचे एसएचओ फूलचंद टेलर यांनी सांगितले. याप्रकरणी मयत महिलेचा पती भुरालाल याची चौकशी करण्यात येत आहे.
उदयपूर : पती-पत्नीमध्ये सुरु असलेल्या कलहातून महिलेने आपल्या तीन मुलांना गळफास लावून त्यांची हत्या (Murder) करत स्वतः आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना उदयपूरमध्ये उघडकीस आली आहे. एका पोल्ट्री फार्ममध्ये ही घटना घडली असून तेथील सीसीटीव्ही (CCTV)त सर्व घटना कैद झाली आहे. रुपा असे मयत महिलेचे नाव आहे. पती घरी नसताना बुधवारी रात्री ही घटना घडली आहे. पती घरी परतला तेव्हा आतील भयानक दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.चित्तौडगड जिल्ह्यातील कपासन पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. पोलिस अधिक तपास करत पुढील कारवाई करत आहेत. (In Udaipur, a woman committed suicide by killing three children in a dispute between husband and wife)
हत्या, आत्महत्येची घटना सीसीटीव्हीत कैद
लाईव्ह हिंदुस्थानने दिलेल्या माहितीनुसार, कछिया खेडी गाव रस्त्यावरील आरएनटी कॉलेजच्या पोल्ट्री फार्ममध्ये ही घटना घडली आहे. शेतात लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये आई तीन मुलांना फासावर लटकवताना दिसत आहे, असे कापसनचे एसएचओ फूलचंद टेलर यांनी सांगितले. याप्रकरणी मयत महिलेचा पती भुरालाल याची चौकशी करण्यात येत आहे. महिलेच्या पतीने पोलिसांना सांगितले की, तो रात्री बाजारात दूध आणण्यासाठी गेला होता, परत आल्यानंतर त्याने पत्नी आणि मुलांना फासावर लटकलेले पाहिले. भुरालाल सात वर्षांपासून आरएनटी पोल्ट्री फार्ममध्ये कुक्कुटपालनाचे काम करतो.
डीव्हीआर ताब्यात घेत पोलिस पुढील तपास करताहेत
सीसीटीव्ही फुटेजनुसार, महिलेने आधी 7 वर्षाच्या मोठ्या मुलीला पोल्ट्री फार्मच्या वरच्या टिन शेडवर बसविलेल्या पाईपला दोरीने गळफास लावला. त्यानंतर 6 वर्षाचा मुलगा आणि 3 वर्षाची मुलगी यांना गळफास लावला. त्यानंतर स्वतः गळफास लावून आत्महत्या केली. पतीने हे दृश्य पाहिल्यानंतर तात्काळ पोल्ट्री फार्मचा मालक आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलीस सध्या डीव्हीआर ताब्यात घेऊन या प्रकरणाचा तपास करत आहेत. माहिती मिळताच भिलवाडा येथील एफएसएल पथकाने घटनास्थळी दाखल होत पुरावे गोळा केले. पोलिसांनी मृतदेह कापसन रुग्णालयाच्या शवागारात ठेवले असून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. (In Udaipur, a woman committed suicide by killing three children in a dispute between husband and wife)