इंडिया आघाडीच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी, ‘हा’ बडा नेता विरोधकांकडून पंतप्रधान पदाचा चेहरा?
इंडिया आघाडीची नवी दिल्लीत आज अतिशय महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. यापैकी सर्वात महत्त्वाची चर्चा ही पंतप्रधान पदाचा चेहरा आघाडीकडून कुणाचा असेल? याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
संदीप राजगोळकर, Tv9 मराठी, नवी दिल्ली | 19 डिसेंबर 2023 : इंडिया आघाडीची नवी दिल्लीत आज अतिशय महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. यापैकी सर्वात महत्त्वाची चर्चा ही पंतप्रधान पदाचा चेहरा आघाडीकडून कुणाचा असेल? याबाबत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांकडून याबाबत आणखी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करावं, असं मत मांडलं. त्यांच्या या मताला दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनीदेखील पसंती दिली. अरविंद केजरीवाल यांनीदेखील मल्लिकार्जुन खर्गे हे पंतप्रधान पदाच्या निवडणुकीसाठी योग्य उमेदवार असल्याचं मत मांडलं, अशी चर्चा आजच्या बैठकीत पार पडल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीनंतर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रया दिली.
मल्लिकार्जुन खर्गे यांना बैठकीत ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांनी बैठकीत पंतप्रधान पदाबाबत मांडलेल्या मताबाबत प्रश्न विचारण्यात आला. तुम्ही पंतप्रधान पदाचे उमेदवार असल्याचं निश्चित झालंय का? असा प्रश्न विचारण्यात आला. पण त्यावर खर्गे यांनी “आम्हाला आधी निवडून यायचं आहे, मग आम्ही पंतप्रधान कोण हे ठरवू. ममता , केजरीवाल काही बोलले असतील तो आमचा अंतर्गत मुद्दा आहे”, अशी प्रतिक्रिया खर्गेंनी दिली. खर्गे यांच्या या प्रतिक्रियेतील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांनी या प्रश्नावर नकार दिला नाही.
‘इंडिया आघाडीचे खासदार 22 डिसेंबरला निलंबनबाबत आंदोलन करणार’
“इंडिया आघाडीच्या आजच्या बैठकीत 28 पक्ष सहभागी झाले. सगळ्यांनी एकत्र येवून आघाडीत काम केलं पाहिजे, याबाबत आज चर्चा झाली. देशात अजून नव्याने 8 ते 10 बैठका होणार आहेत. आमची बैठक 2 ते 3 तास चालली. संसदेत 142 खासदार निलंबन केलं. अम्ही ठराव केला की, हे लोकशाही विरोधी आहे. या लढाईत आम्ही सगळे एकत्र असू”, अशी प्रतिक्रिया खर्गे यांनी दिली. तसेच “देशात इंडिया आघाडीचे खासदार 22 डिसेंबरला निलंबनबाबत आंदोलन करणार”, अशीदेखील माहिती खर्गे यांनी यावेळी दिली.
‘जागावाटपबाबत अम्ही निर्णय घेवू’
“संसदेत घुसखोरी झाली. याप्रकरणी आमची मागणी आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत येवून उत्तर द्यावं. त्यांना गुजरातमध्ये जावून उद्घाटन करायला वेळ आहे. आम्ही याबाबत लढू. ते समजतात आमच्या शिवाय देशात कुणी नाही, हा त्यांचा समज आहे तो आम्ही संपवणार आहोत. जागावाटपबाबत अम्ही निर्णय घेवू, आम्ही अनेक ठिकाणी समझौता करणार आहोत. स्थानिक ठिकाणी नेते निर्णय घेणार आहेत”, अशी माहिती मल्लिकार्जुन खर्गेंनी दिली.
बैठकीतील आणखी इनसाईड बातमी काय?
इंडिया आघाडीची पाहिली संयुक्त सभा बिहारची राजधानी असलेल्या पाटण्यात होईल, असा निर्णय आजच्या बैठकीत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच इंडिया आघाडीच्या बैठकीत पुन्हा एकदा ईव्हीएम मशीनचा मुद्दा चर्चेत आला. ईव्हीएमबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या नेतृत्वाखाली यापूर्वी समिती स्थापन झालीय. पण निवडणूक आयोगाने त्यांना अजूनही वेळ दिलेला नाही. याबाबत बैठकीत चर्चा झाली, अशी माहिती सूत्रांनी दिली.