India Covid Updates : गेल्या 24 तासांत कोरोना रुग्णांच्या संख्येत घट; मात्र मृत्यूचा आकडा वाढला
गेल्या 24 तासांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. मात्र दुसरीकडे चिंताजनक बाब म्हणजे कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत वाढ झाली आहे. दिवसभरात 40 मृत्यूची नोंद झाली असून, त्यातील 35 जण हे एकट्या केरळमधील आहे.
नवी दिल्ली : कोरोनाबाबत (Coronavirus) एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे गेल्या 24 तासांमध्ये कोरोना (Corona) रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. केंद्रीय मंत्रालयाच्या माहितीनुसार गेल्या 24 तासांमध्ये देशभरात एकूण 3,451 नव्या कोरोना रुग्णांची (corona patients) नोंद झाली आहे. तर याचदरम्यान कोरोनामुळे 40 जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी 3,805 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती, तर कोरोनामुळे 22 रुग्णांचा मृत्यू झाला होता. रविवारी जरी कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली असली तरी देखील कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. आज जाहीर झालेल्या आकडेवारीसह आता देशात एकूण कोरोना रुग्णांच्या संख्येचा आकडा हा 4,25,57,495 वर पोहोचला आहे. तर सध्या 20,635 कोरोनाचे रुग्ण सक्रिय आहेत. चिंताजनक बाब म्हणजे गेल्या 24 तासांत एकूण 40 जणांचा मृत्यू झाला आहे, त्यापैकी 35 रुग्ण हे एकट्या केरळमधील आहेत. केरळमध्ये 35 जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आल्याने चिंता वाढली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने निर्बंध उठवण्यात आले होते. मात्र पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे.
केरळमध्ये 35 जणांचा मृत्यू
आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांमध्ये देशात 3,451 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाल्याने कोरोना रुग्णांचा एकूण आकडा हा 4,25,57,495 वर पोहोचला आहे. सध्या देशात 20,635 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. तर गेल्या 24 तासांमध्ये कोरोनामुळे चाळीस लोकांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचा एकूण आकडा हा 5,24,064 वर पोहोचला आहे. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण केरळमध्ये अधिक असून, गेल्या चोवीस तासांमध्ये देशात 40 रुग्णांचा मृत्यू झाला, त्यातील 35 रुग्ण हे एकट्या केरळमधील होते. सध्या देशात कोरोना रिकव्हरीचा रेट वाढला असून, तो 98.74 वर पोहोचला आहे. लसीकरणाने देखील वेग पकडला असून, आतापर्यंत एकूण 1,90,20,07,487 डोस देण्यात आले आहेत. यापैकी 17,39,403 डोस गेल्या 24 तासांमध्ये देण्यात आले आहेत.
WHO च्या दाव्याने खळबळ
देशात आतापर्यंत कोरोनामुळे एकूण 5,24,064 लोकांचा मृत्यू झाला आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची आकडेवारी सांगते. मात्र दुसरीकडे जागतिक आरोग्य संघटनेने भारतात कोरोनामुळे 47 लाख लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या या दाव्यामुळे खळबळ उडाली असून, भारताने जागतिक आरोग्य संघटनेचा दावा फेटाळून लावला आहे. तसेच भारताकडून जागतिक आरोग्य संघटनेच्या कोरोना रुग्ण मृत्यू मापक गणितीय मॉडेलवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. भारतामध्ये जन्म आणि मृत्यूचे मोजमाप करणारी एक सक्षम यंत्रणा असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.