Chandrayaan-3 Successful : चार वर्षांपूर्वी शास्त्रज्ञ ढसाढसा रडले, आज आनंदाश्रू तरळले!
Chandrayaan-3 Successful : भारताने आज इतिहास घडवला. सर्वांनीच याची देहि, याची डोळा हा सोहळा अनुभवला. चार वर्षांपूर्वी चंद्रयान-2 च्या अपयशाचा डाग सुद्धा इस्त्रोने या यशाने धुवून काढला. चंद्राच्या दक्षिण भूमीवर उतरणारा भारत हा पहिला देश ठरला. त्यामुळे प्रत्येकाची छाती अभिमानाने फुलून गेली आहे.
नवी दिल्ली | 23 ऑगस्ट 2023 : भारतीय अवकाश संशोधन संस्था, इस्त्रोने (ISRO) इतिहास घडवला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. दक्षिण ध्रुवावर उतरणे सर्वात कठिण आहे. आतापर्यंत या भागात कोणीच मजल मारलेली नाही. पण आज इस्त्रोने प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने फुलवली. देशभरात थोड्यावेळापूर्वीच सर्वांनी श्वास रोखून हा सोहळा पाहिला. प्रत्येकाच्या अंगावर शहारे आले. प्रत्येकाने चंद्रावर उतरण्याचा हा सोहळा याची देहि, याची डोळा अनुभवला. संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या चंद्रयान -3 कडे (Chandrayaan-3 Successful Landing) होते. इस्त्रोने ही कठिण परीक्षेत विशेष गुणांसह अव्वल स्थान पटकावले. रशियाचे यान कोसळल्यानंतर भारतीय चंद्र मोहिमेच्या भवितव्याविषयी सगळ्यांनाच चिंता होती. यापूर्वी 2019 मध्ये भारताने केलेला प्रयत्न फसल्यानंतर भारतीयांसह जग सुद्धा भावूक झाले होते. पण आज चार वर्षांपूर्वी चंद्रयान-2 च्या अपयशाचा डाग सुद्धा इस्त्रोने धुवून काढला.
अभिनंदन भारत, चंद्रावर पोहचलो
चंद्रयान -3 चे लँडर चंद्रावर उतरताच देशभरात टाळ्यांचा कडकडाट झाला. शेवटच्या टप्प्यात सर्वांनी श्वास रोखला होता. प्रत्येक जण या सोहळ्याचा साक्षीदार झाला होता. चंद्रावर पोहचताच, यानाने भारतीयांसाठी शुभेच्छा संदेश पण पाठवला. अभिनंदन, भारत, मी चंद्रावर पोहचलो आणि तुम्हीही, असा हा संदेश होता. भारताचा तिरंगा आज चंद्रावर फडकला. आज अनेक भारतीय गदगद झाले. अनेकांना शहारे आले, देश प्रेमाने त्यांचे मन उंचबळून आले. भारताने आज ऐतिहासिक कामगिरी केली.
चार वर्षांपूर्वी काय घडले होते
यापूर्वी चंद्रयान-2 वर जगभराचं लक्ष लागले होते. चार वर्षांपूर्वी भारताने चंद्राच्या या दक्षिण ध्रुवावर पाऊल टाकण्याचं धाडस दाखवलं होते. सर्वच काही ठिक सुरु होते. भारत इतिहास रचणार होता. पण वेगाने घात झाला आणि चंद्रयान-2 मिशन गर्तेत अडकलं. त्याचा संपर्क तुटला. हा भारतासह इस्त्रोला मोठा धक्का होता. त्यावेळचे इस्त्रोचे प्रमुख सिवन हे भावूक झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी येताच, त्यांच्या गळ्यात पडून ते ओक्साबोक्सी रडले.
अगदी शेवटच्या टप्प्यात हुकले होते लँडिंग
7 सप्टेंबर 2019 रोजी भारतासाठी महत्वाचा दिवस होता. चंद्राच्या अंधारल्या भागाला भारताने हाक दिली होती. भारताचे चंद्रयान-2 हे महत्वकांक्षी मोहिम होती. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बेगंळुरुला पोहचले होते. यान अगदी चंद्रभुमीवर उतरण्याच्या तयारीत होते. अवघ्या 2.1 किलोमीटर अंतर राहिले होते. या शेवटच्या टप्प्यात घात झाला आणि शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांवर पाणी फेरले गेले.
आज ऐतिहासिक कामगिरी
आजचा दिवस भारतासाठी महत्वाचा होता. गेल्या काही दिवसांपासून त्यासाठी इस्त्रोतील शास्त्रज्ञांनी मोठी मेहनत घेतली होती. त्याचे फळ आज समोर आले. आज इस्त्रोने ऐतिहासिक कामगिरी केली. चंद्रयान-3 ने सॉफ्ट लँडिग करुन इतिहास रचला. चंद्रयान-3 मोहिम 23 ऑगस्ट 2023 रोजी फत्ते झाली.
भारत अंतराळवीर पाठवणार
भारत लवकरच या यशानंतर अंतराळवीर पाठविण्याची तयार करत आहे. इस्त्रोचं पुढचं मिशन, गगनयान हे त्यासाठीच सुरु करण्यात आले आहे. इतर देशांच्या मदतीशिवाय स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे मानवाला अंतराळात पाठविण्याचा प्रयोग करण्यात येणार आहे.