1971च्या भारत-पाक युद्धातील हा किस्सा माहिती आहे का?
3 डिसेंबर 1971 रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये हे युद्ध सुरु झाले होते. 16 डिसेंबरपर्यंत हे युद्ध सुरु होते. | India Pakistan 1971 War
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील 1971च्या युद्धाला (India Pakistan War) आज 49 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने सोशल मीडियावर भारतीय लष्कराच्या पराक्रमाच्या आठवणींना नव्याने उजाळा दिला जात आहे. या युद्धात एका निर्णायक क्षणी भारतीय सैन्याने तब्बल लाखभर पाकिस्तानी सैनिकांना घेरले होते. तेव्हा भारताचे तत्कालीन लष्करप्रमुख सॅम माणेकशॉ यांनी पाकिस्तानी लष्करप्रमुखांना निर्वाणीचा इशारा दिला होता. भारतीय सैन्याने तुम्हाला सर्व बाजूंनी घेरले आहे. त्यामुळे तुम्ही शरण या, अन्यथा आम्ही तुमचा खात्मा करू, असे सॅम माणेकशॉ यांनी पाकिस्तानला सांगितले. ही 1971च्या युद्धातील ऐतिहासिक घटना ठरली होती. (1971 India Pakistan War)
3 डिसेंबर 1971 रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये हे युद्ध सुरु झाले होते. 16 डिसेंबरपर्यंत हे युद्ध सुरु होते. भारतीय जवानांच्या पराक्रमामुळे अवघ्या 13 दिवसांत पाकिस्तानने गुडघे टेकले. या युद्धात फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांनी उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्यांनी आपल्या चार दशकांच्या कारकीर्दीत पाच मोठ्या युद्धांमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली. त्यामुळे जनरल पदावर असणाऱ्या सॅम माणेकशॉ यांना फील्ड मार्शल म्हणून बढती देण्यात आली.
13 डिसेंबरला सॅम माणेकशॉ यांचा पाकिस्तानला निर्वाणीचा इशारा
जवळपास नऊ दिवसांच्या युद्धानंतर 13 डिसेंबरला लष्करप्रमुख सॅम माणेकशॉ यांनी पाकिस्तानला निर्वाणीचा इशारा दिला. तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानात भारतीय लष्कराने पाकिस्तानी सैनिकांना कोंडीत पकडले होते. तेव्हा सॅम माणेकशॉ यांनी पाकिस्तानी लष्करप्रमुखांना म्हटले की, एकतर तुम्ही शरण या अन्यथा आम्ही तुमचा खात्मा करू. सॅम माणेकशॉ यांच्या या इशाऱ्यानंतर 16 डिसेंबरला पाकिस्तानी सैन्याने पांढरे निशाण फडकावले होते.
आताच्या बांगलादेशमध्ये असलेल्या ढाका शहरात जवळपास लाखभर पाकिस्तानी सैनिकांनी आत्मसमर्पण केले होते. भारतीय लष्कराचे पूर्व विभागाचे तत्कालीन कमांडर जगजीत सिंह अरोरा यांच्यासमोर पाकिस्तानचे कमांडिग ऑफिसर लेफ्टनंट एएके नियाजी यांच्या नेतृत्त्वाखालील पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्रे खाली ठेवली. हा भारतीय लष्कराच्या इतिहासातील ऐतिहासिक क्षण मानला जातो.
इंदिरा गांधींनी सॅम माणेकशॉंना विचारला सवाल
1971 मध्ये युद्ध अटळ असल्याची चिन्हं दिसू लागल्यानंतर भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लष्करप्रमुख सॅम माणेकशॉ यांना तुम्ही युद्धाला तयार आहात का, असा प्रश्न विचारला. तेव्हा सॅम माणेकशॉ यांनी दिलेले उत्तर आजही अनेकांच्या स्मरणात आहे. सध्या आर्मर्ड डिव्हिजन आणि इन्फन्ट्री डिव्हिजन्स वेगवेगळ्या ठिकाणी तैनात आहेत. त्यांच्याकडे युद्धासाठी तयार असलेले केवळ 12 रणगाडे आहेत. थोड्या दिवसांनी मान्सूनचा पाऊस सुरु झाल्यावर नद्यांना पूर येऊ शकतो. तसे झाल्यास भारतीय सैन्याची अडचण होऊ शकते, असा इशारा सॅम माणेकशॉ यांनी इंदिरा गांधींना दिला होता.
तेव्हा सॅम माणेकशॉ यांनी आपल्या पदाचा राजीनामाही देऊ केला होता. तेव्हा इंदिरा गांधींनी माणेकशॉ यांच्या राजीनाम्याचा प्रस्वात नाकारत सरकारने आता काय करावे, असा सल्ला मागितला होता. त्यावर सॅम माणेकशॉ यांनी इंदिरा गांधी यांना विजयाची खात्री दिली होती. मात्र, त्यासाठी आमच्या अटींवर युद्ध लढण्याची मोकळीक द्यावी. इंदिरा गांधी यांनी सॅम माणेकशॉ यांचा हा प्रस्ताव मान्य केला होता.
9 डिसेंबरला सॅम माणेकशॉ यांचा पहिला इशारा
3 डिसेंबर 1971 रोजी युद्धाला सुरुवात झाल्यानंतर पाकिस्तानी लढाऊ विमानांनी भारताच्या पश्चिमी सीमेवर बॉम्बफेक करण्यास सुरुवात केली. या हल्ल्याला भारतीय वायूदलाकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले. त्यानंतर 9 डिसेंबरला सॅम माणेकशॉ यांनी पाकिस्तानला पहिला रेडिओ मेसेज पाठवला. भारतीय सैन्याने तुम्हाला चारही बाजूंनी घेरले आहे. चितगाव, चालना आणि मांग्ला बंदरांशी तुमचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे.
तेथून तुम्हाला मदत मिळण्याची कोणतीही शक्यता नाही. मुक्ती वाहिनी आणि बाकी लोक बदला घेण्यासाठी तयारच आहेत. तुम्ही स्वत:च्या सैनिकांचा जीव का धोक्यात टाकत आहात? तुम्हाला घरी जायचे नाही का? आपल्या मुलाबाळांसोबत राहायचे नाही का? त्यामुळे वेळ दवडू नका, शस्त्रं खाली टाका. यामध्ये बेअब्रू होण्याची गोष्ट नाही. आम्ही तुम्हाला एका सैनिकाप्रमाणे वागणूक देऊ, असे सॅम माणेकशॉ यांनी रेडिओ मेसेजमध्ये म्हटले होते.
(1971 India Pakistan War)