India Pakistan Tension : काही तरी मोठं घडणार… पंतप्रधानांना पुन्हा भेटले राजनाथ सिंह; ‘या’ सर्वात बड्या अधिकाऱ्याच्या हजेरीने चर्चांना उधाण
पहलगाममधील दहशतावादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान दरम्यान तणाव वाढला आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांची रसद तोडण्यात आलेली आहे. सीमेवर युद्धजन्य परिस्थिती असतानाच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी दोनदा भेट घेतली. या बैठकीत सीडीएस अनिल चौहान आणि अजित डोभाल उपस्थित होते.

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे केवळ भारतातूनच नव्हे तर जगभरातून संतापाची लाट उसळली आहे. भारताने तर या हल्ल्याचा बदला म्हणून पाकिस्तानचा दाणापाणी बंद केला आहे. त्यामुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तर, पाकिस्तानला कायमचा धडा शिकवण्यासाठी भारताने प्लान आखायला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. पंतप्रधानांच्या 7 लोक कल्याण मार्गावरील निवासस्थानी ही बैठक झाली. या बैठकीला अति महत्त्वाचे अधिरकाही उपस्थित होते. त्यामुळे बैठकीत मोठी रणनीती ठरल्याचं बोललं जात आहे.
आज सकाळीच राजनाथ सिंह यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं निवास गाठलं. यावेळी त्यांच्यासोबत तीन सैन्याचे प्रमुख सीडीएस अनिल चौहान आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल उपस्थित होते. रात्रीच्या बैठकीला फक्त राजनाथ सिंह उपस्थित होते. आता दोन्ही प्रमुख अधिकारी उपस्थित राहिले. यावेळी त्यांची मोदींसोबत 40 मिनिटे चर्चाा झाली. या बैठकीत काय चर्चा झाली हे अद्याप स्पष्ट झालं नाही. पण राजनाथ सिंह दोनदा पंतप्रधानांना भेटले आणि तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारही मोदींना भेटल्याने अनेक तर्कवितर्क लगावले जात आहेत.
काल रात्रीही खलबते
रविवारी रात्रीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आले होते. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 45 मिनिटे बैठक झाली. या बैठकीपूर्वी तिन्ही सैन्याची कमान सांभाळणारे सीडीएस अनिल चौहान यांनी राजनाथ सिंह यांच्याशी बैठक केली होती. तर, बीएसएफचे डीजींनीही गृहमंत्रालयात जाऊन गृह सचिवांशी चर्चा केली होती. या बैठकांवरून भारत लवकरच पाकिस्तान विरोधात मोठं पाऊल उचलणार असल्याचं सांगितलं जात आहे.
पाकच्या कुरापती सुरूच
दुसरीकडे पाकिस्तानच्या सीमेवरून सातत्याने युद्धासाठीची परिस्थिती निर्माण केली जात आहे. पाक आर्मीकडून एलओसीवर पुन्हा एकदा गोळीबार करण्यात आला आहे. कुपवाडा आणि पुंछ परिसरात लहान शस्त्राने फायरिंग करण्यात आली. त्याला भारतीय सैन्याने जशास तसं उत्तर दिलं आहे.
कुटुंबाची परदेशात रवानगी
दरम्यान, भारत-पाकमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पाकिस्तानची परिस्थिती बिघडण्याची चिन्हे दिसत असल्याने पाकिस्तानी पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो यांनी त्यांच्या कुटुंबाला परदेशात पाठवल्याची खात्रीलायक बातमी आहे. बिलावल भुट्टो यांचं कुटुंब कॅनडात गेलं आहे. तर पाकिस्तानी सैन्याचे प्रमुख असीम मुनीर यांनीही त्यांच्या कुटुंबाला पाकिस्तानच्या बाहेर पाठवलं आहे.