आशियातील सर्वात उंच खांबावर फडकला भारताचा तिरंगा, रंगला बीटिंग द रिट्रीट सोहळा
2017 मध्ये भारताने अटारी येथे 360 फूट उंच तिरंगा बसवला होता. ध्वजाची लांबी 120 फूट आणि रुंदी 80 फूट होती. परंतु, जोरदार वाऱ्यामुळे हा तिरंगा तीन वेळा फाटला. तो दुरुस्त करून पुन्हा फडकवण्यात आला. मात्र, त्यावरून बराच वाद झाला होता.
पंजाब | 26 जानेवारी 2024 : भारत आपला 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. पंजाब राज्यातील अटारी बाघा सीमेवरही सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी सकाळी तिरंगा फडकवण्याचा सोहळा पार पाडला. डीआयजी बॉर्डर रेंज संजय गौर यांचे जवानांनी रेड कार्पेटवर स्वागत केले. त्यांनी जवानांशी हस्तांदोलन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी जवानांना मिठाई आणि फळांची टोपली दिली. यानंतर डीआयजी बॉर्डर रेंज संजय गौर यांनी आशियातील सर्वात उंच खांबावर भारताचा तिरंगा फडकवला.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ऑक्टोंबर 2023 मध्ये अटारी सीमेवर जयंती गेटसमोर लावण्यात आलेल्या या ध्वजाचे उद्घाटन केले होते. 418 फूट उंच असा हा तिरंगा आहे. या ध्वजासाठी 305 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. याआधी देशाचा सर्वोच्च ध्वज कर्नाटकात फडकत होता. कर्नाटकातील कोते केरे येथील बेळगावी 361 फूट उंचीचा सर्वात उंच तिरंगा ध्वज स्थापित केला आहे.
भारतीय ध्वजाने दिली पाकिस्तानी ध्वजाला टक्कर
2017 मध्ये भारताने अटारी येथे 360 फूट उंच तिरंगा बसवला होता. ध्वजाची लांबी 120 फूट आणि रुंदी 80 फूट होती. परंतु, जोरदार वाऱ्यामुळे हा तिरंगा तीन वेळा फाटला. तो दुरुस्त करून पुन्हा फडकवण्यात आला. मात्र, त्यावरून बराच वाद झाला होता. हा ध्वज पाहून पाकिस्तानने चीनच्या मदतीने आपल्या ध्वजाची उंची 400 फूट वाढवली. त्यात लिफ्ट आणि सीसीटीव्ही कॅमेरेही लावले होते.
भारताचा हा 418 फुटी ध्वज हा NHAI सीमेच्या सुशोभीकरणाचे काम करत आहे. शिवाय जगभरातून पंजाबला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठीही ते आकर्षणाचे केंद्र बनले आहे. याच अटारी बाघा सीमेवर प्रजासत्ताक दिनाची सुरुवात झाली. दोन्ही सीमेवरील जवानांनी एकमेकांचे अभिनंदन करून एकमेकांना मिठाई दिली.
पाकिस्तान रेंजर्स यांनी दिल्या शुभेच्छा
दुपारनंतर दोन्ही देशांच्या सीमाचे दरवाजे उघडतील. यावेळी दोन्ही देशांचे जवान आमनेसामने येतील. दोघांच्याही हातात मिठाई असेल आणि त्यांच्या चेहऱ्यावर भारताच्या प्रजासत्ताक दिनाचा आनंद असेल. पाकिस्तान रेंजर्स बीएसएफला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतील आणि मिठाईची देवाणघेवाण करतील. त्यानंतर संध्याकाळी येथे रिट्रीट सोहळा सुरू होईल. सायंकाळी होणाऱ्या या सोहळ्याला 35 हजारांहून अधिक पर्यटक येण्याची शक्यता आहे. या क्षणाची आठवण म्हणून या दिवशी देशातूनच नव्हे तर परदेशातूनही लोक सीमेवर पोहोचतात.