Helicopter Crash : इंडियन आर्मीला धक्का, सैन्याचं चीता हेलिकॉप्टर कोसळलं
Helicopter Crash : दुर्गम डोंगराळ भागात घडली घटना. नेमका हा अपघात कसा घडला? वैमानिकांची सध्या काय स्थिती आहे? असे अनेक प्रश्न निर्माण झालेत.
Helicopter Crash : भारतीय सैन्य दलासाठी एक वाईट बातमी आहे. लष्कराच चीता हेलिकॉप्टर कोसळलंय. अरुणाचल प्रदेशमध्ये ही मोठी दुर्घटना घडली. अपघातानंतर वैमानिकांचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरु झालय. हा अपघात नेमका कसा घडला? त्या बद्दल अजून माहिती समोर आलेली नाही. दुर्घटनेनंतर बेपत्ता वैमानिकांचा शोध सुरु आहे. अरुणाचल प्रदेशच्या बोमडिलाजवळ चीता हेलिकॉप्टरचा गुरुवारी सकाळी 9.15 च्या सुमारास एटीसीशी संपर्क तुटल्याची माहिती मिळाली, असं गुवाहाटीचे डिफेन्स पीआरओ लेफ्टनंट कर्नल महेंद्र रावत यांनी सांगितलं.
ऑपरेशन सॉर्टीसाठी चीता हेलिकॉप्टरने उड्डाण केलं होतं. हेलिकॉप्टर बोमडिलाच्या पश्चिमेला मंडलाजवळ दुर्घटनाग्रस्त झाल्याची माहिती आहे. सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलं आहे.
याआधी कधी झाला चिता हेलिकॉप्टरचा अपघात?
मार्च 2022 मध्ये जम्मू-काश्मीर येथे चीता हेलिकॉप्टर कोसळलं होतं. या अपघातात दोन पायलट्सपैकी एकाचा मृत्यू झाला होता. एक पायलट गंभीर जखमी झाला होता. खराब हवामानामुळे हा अपघात झाला होता. हेलिकॉप्टरची लँडिंग होणार त्यावेळी हा अपघात झाला होता. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरच नियंत्रणाबाहेर गेलं होतं.
भारतीय सैन्याकडे किती चीता हेलिकॉप्टर्स?
भारतीय सैन्याकडे असलेल्या चीता हेलिकॉप्टरचा हलक्या हेलिकॉप्टर्समध्ये समावेश होतो. हे एक सिंगल इंजिन हेलिकॉप्टर आहे. भारतीय सैन्याकडे 200 चीता हेलिकॉप्टर्स आहेत. या हेलिकॉप्टरमध्ये ग्राऊंड प्रॉक्सिमिटी वार्निंग सिस्टम आणि वेदर रडार सिस्टम नाहीय. याच कारणामुळे खराब हवामानात ही हेलिकॉप्टर्स दुर्घटनाग्रस्त होतात.
अरुणाचल प्रदेशमध्ये जास्त अपघात का होतात?
अरुणाचल प्रदेश हा डोंगराळ भाग आहे. हे राज्य डोंगराळ प्रदेशाने व्यापलेलं आहे. इथे अचानक हवामान बदलतं. त्यामुळे या भागात हेलिकॉप्टर उड्डाण सोपं नसतं. त्यामुळेच देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत इथे जास्त अपघात होतात.