भारतीय रेल्वेचा रेकॉर्ड, अमेरिका-यूरोपला मागे टाकत केली जबरदस्त कामगिरी
Train Engines Production News: आर्थिक वर्ष 2024-25 दरम्यान रेल्वे लोकोमोटीव्हचे उत्पादन वाढवून 1,681 करण्यात आले. हे उत्पादन संयुक्त राज्य अमेरिका, यूरोप, दक्षिण अमेरिका, अफ्रीका आणि ऑस्ट्रेलियातील एकूण लोकोमोटिव्ह रेल्वे इंजिनापेक्षा जास्त आहे.

Train Engines Production News: भारतीय रेल्वे जगातील चौथ्या क्रमांकाचे नेटवर्क आहे. सेमीहायस्पीड ट्रेननंतर भारतात बुलेट ट्रेनही सुरु होणार आहे. वेगवेगळे विक्रम भारतीय रेल्वे करत आहे. सर्वात उंच आर्च ब्रिज किंवा समुद्रात ऑटो लिफ्ट ब्रिज करण्याचा विक्रम भारतीय रेल्वेने केला आहे. आता अमेरिका, यूरोप, दक्षिण अमेरिका, अफ्रीका आणि ऑस्ट्रेलिया मिळूनही जी कामगिरी करु शकत नाही, ती कामगिरी भारतीय रेल्वेने केली आहे. भारतीय रेल्वेने विक्रमी रेल्वे इंजिनाची निर्मिती केली आहे. मेड इन इंडिया अंतर्गत इंजिन निर्मितीचा विक्रम भारतीय रेल्वेने केला. दर महिन्याला 150 रेल्वे इंजिनाची निर्मिती रेल्वेने केली.
उत्पादन असे वाढले
आर्थिक वर्ष 2024-25 दरम्यान रेल्वे लोकोमोटीव्हचे उत्पादन वाढवून 1,681 करण्यात आले. हे उत्पादन संयुक्त राज्य अमेरिका, यूरोप, दक्षिण अमेरिका, अफ्रीका आणि ऑस्ट्रेलियातील एकूण लोकोमोटिव्ह रेल्वे इंजिनापेक्षा जास्त आहे. दरम्यान, देशातील सर्व लोकोमोटिव्ह युनिट्सच्या यशाची माहिती देताना भारतीय रेल्वे बोर्डाच्या प्रवक्त्याने सांगितले की, गेल्या वर्षी भारतात 1,472 लोकोमोटिव्हचे उत्पादन झाले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 19 टक्के अधिक 1,681 लोकोमोटिव्ह इंजिनाचे उत्पादन झाले आहे.
लोकोमोटिव्ह इंजिनाचे उत्पादनात अशी वाढ
मेड इन इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी घेतलेल्या निर्णयांमुळे देशात लोकोमोटिव्ह इंजिनाचे उत्पादन सातत्याने वाढत आहे. 2004 ते 2014 या कालावधीत देशात एकूण 4,695 लोकोमोटिव्हचे उत्पादन झाले होते. त्याची वार्षिक सरासरी 469.5 होती. 2014 ते 2024 दरम्यान देशात 9,168 रेल्वे लोकोमोटिव्हचे उत्पादन झाले. त्याची वार्षिक सरासरी सुमारे 917 झाली. 2024-25 या आर्थिक वर्षात 1,681 लोकोमोटिव्हचे उत्पादन झाले. यावर्षी, चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्समध्ये 700, बनारस लोकोमोटिव्ह वर्क्समध्ये 477, पटियाला लोकोमोटिव्ह वर्क्समध्ये 304, मधेपुरामध्ये 100 आणि मरहौरामध्ये 100 लोकोमोटिव्हचे उत्पादन करण्यात आले आहे.




देशातील बहुतेक लोकोमोटिव्ह माल गाड्या चालवण्यासाठी बनवले जातात. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये बांधल्या जाणाऱ्या 1,681 लोकोमोटिव्हमध्ये WAG 9/9H लोकोमोटिव्ह 1047, WAG 9HH लोकोमोटिव्ह 7, WAG 9 ट्विन 148, WAP 5 लोकोमोटिव्ह 2 यांचा समावेश आहे.