दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्यासाठी भारतीय जवानांनी सुरु केले ऑपरेशन सर्वशक्ती
काश्मीरमध्ये काही भागात पुन्हा एकदा दहशतवादाला खतपाणी घातलं जात असून पाकिस्तानातून कारवाया सुरु झाल्या आहेत. याच दहशतवादी कारवाया मोडून काढण्यासाठी भारतीय जवानांनी आता ऑपरेशन सर्वशक्ती सुरु केले आहे. यामध्ये सर्व सुरक्षा संस्था एकत्र येऊन दहशतवाद्यांचा खात्मा करणार आहेत.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया होत असल्याने भारतीय लष्कराने आता मोठे पाऊल उचलले आहे. पाकिस्तानातून होत असलेल्या दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी भारतीय लष्कराने ऑपरेशन सर्वशक्ती सुरु केले आहे. या अंतर्गत पाकिस्तानातून येणाऱ्या दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले जाणार आहे. ऑपरेशन सर्वशक्ती दरम्यान पर्वतरांगांच्या बाजूंने होणाऱ्या दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी सुरु केले गेले आहे.
सर्व एकत्र येऊन करणार कारवाई
सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, जम्मू आणि काश्मीर पोलीस, सीआरपीएफ, विशेष ऑपरेशन ग्रुप आणि गुप्तचर संस्था काश्मीरमधील दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी एकत्र काम करतील.
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्यासाठी ही कारवाई अपेक्षित आहे. दहशतवादी कारवाया नष्ट करण्यासाठी 2003 पासून ऑपरेशन सर्पविनाश सुरू करण्यात आले होते. या काळात या भागातील दहशतवादी कारवाया जवळपास संपुष्टात आल्या होत्या.
आणखी लष्कर पाठवले जाणार
भारतीय लष्कराने राजौरी-पुंछ सेक्टरमध्ये आणखी सैन्य दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या भागातील गुप्तचर यंत्रणा मजबूत करण्यासोबतच सैनिकांनाही सहभागी करून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
पाकिस्तानातून पीर पंजाल पर्वतरांगांच्या दक्षिणेकडील राजौरी पुंछ सेक्टरमध्ये दहशतवादाला पुन्हा एकदा वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु होते. शुक्रवारी कृष्णा घाटी परिसरात लष्कराच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला होता, मात्र नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून जवानांनी प्रत्युत्तर दिले नाही. गेल्या वर्षीही २१ डिसेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात चार जवान शहीद झाले होते.
कारवाया संपवण्यासाठी पाऊले
लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी अलीकडेच सांगितले होते की. या भागातून होणाऱ्या दहशतवादी कारवाया जवळपास संपल्या होत्या. पण पुन्हा एकदा येथून दहशतवाद्यांना अॅक्टिव्ह करण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे.
गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, लष्कर, गुप्तचर संस्थांसह सर्व संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यानंतर लगेचच यावर नियोजन केले गेले आणि काम सुरु झाले. भारतीय लष्कराकडून राजौरी-पुंछ सेक्टरमध्ये आणखी सैन्य पाठवले जात आहे.