भारतीय स्टार्टअप्सची भरारी, अमेरिका-चीनच्या स्पर्धेत उद्योगाचा झेंडा, तिसरा सर्वाधिक युनिकॉर्न कंपन्या असणारा देश
जगातील तिसरी महासत्ता होण्याच्या दिशेने भारत मार्गक्रमण करत आहे. भारतीय स्टार्टअप्सने जागतिक बाजाराला दखल घ्यायला लावली आहे. एक अब्ज अमेरिकन डॉलर्सचे भांडवली मूल्य असणाऱ्या नव्या दमाच्या उद्योगांमध्ये भारताने जागतिक पातळीवर तिसऱ्या स्थानावर धडक मारली आहे. या स्पर्धेत अमेरिका आघाडीवर आहे तर चीन दुसऱ्या स्थानी आहे.
मुंबई : मोदी सरकारच्या काळात भारतीय उदयोन्मुख उद्योगांनी (Indian startups) काळाची गती ओळखून आघाडी घेतली आहे. केवळ 5 वर्षांत जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप बाजारपेठ बनली आहे. 1 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त मूल्यांकन असलेल्या स्टार्टअप्सच्या यादीत (Startup Unicorn) तिसऱ्या स्थानी भारताने झेंडा रोवला आहे. जगातील तिसरी महासत्ता होण्याच्या दिशेने भारत मार्गक्रमण करत आहे. भारतीय स्टार्टअप्सने जागतिक बाजाराला दखल घ्यायला लावली आहे. एक अब्ज अमेरिकन डॉलर्सचे भांडवली मूल्य असणाऱ्या नव्या दमाच्या उद्योगांमध्ये भारताने जागतिक पातळीवर तिसऱ्या स्थानावर धडक मारली आहे. या स्पर्धेत अमेरिका आघाडीवर आहे तर चीन दुसऱ्या स्थानी आहे. अमेरिकेत सध्या 487 तर चीनमध्ये 301 युनिकॉर्न आहेत. भारतात स्टार्टअप उद्योगाला चालना मिळाल्यापासून 90 युनिकॉर्न भारताची आघाडी संभाळत आहेत.
Indian startups : खरे तर 2014 मध्ये देशाचे पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यासाठी आग्रही होते. त्यांनी नवीन उद्योग आणि स्टार्टअप्स उभारणीवर जोर दिला आहे. पंतप्रधान मोदींनी 2015 मध्ये स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून स्टार्टअप इंडिया उपक्रमाची घोषणा केली होती. नवउद्योगांना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी त्यांनी प्रभावी यंत्रणा उभारणीवर भर दिला. उद्योगांना परवानगी मिळण्यासाठी येणाऱ्या अडचणींचा विचार केला. त्या सोडविण्यासाठी सर्व विभागांची मोट बांधली. सरकारी पातळीवर उद्योग उभारणीत सुटसूटीतपणा आणण्यासाठी नियमांतही बदल करण्यात आला आहे.
81 व्या स्थानावरुन 46 व्या स्थानी झेप
16 जानेवारी 2016 रोजी देशात स्टार्टअप इंडिया उपक्रम सुरू करण्यात आला. स्टार्टअप्सकडे सरकारने विशेष लक्ष दिले. यासाठी सवलती दिल्या. नियमांत बदल केले. त्याचा सकारात्मक फायदा झाला. भारतात सध्या 90 युनिकॉर्न स्टार्टअप्स किंवा 1 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त मूल्यांकन असलेले स्टार्टअप्स आहेत आणि ही तिसरी सर्वात मोठी जागतिक स्टार्टअप बाजारपेठ आहे. कोरोना काळातही, गेल्या वर्षी म्हणजे 2021 मध्ये भारतात 42 स्टार्टअप्स युनिकॉर्न तयार झाले. स्टार्टअप इंडियाच्या प्रयत्नांमुळे भारताने 2015 मध्ये 81 व्या स्थानावरून जागतिक स्टार्टअप नाविन्यपूर्ण क्रमवारीत 46 व्या स्थानावर झेप घेतली.
भारत आता तिसऱ्या क्रमांकावर
अमेरिका सध्या 487 युनिकॉर्नसह प्रथम आहे आणि चीन 301 युनिकॉर्नसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर भारतात 90 युनिकॉर्न आहे. भारतीय अर्थव्यवस्था जेवढी मजबूत होईल, तेवढे या नवउद्योगांना बळ मिळेल. स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून देशाच्या आर्थिक विकासाबरोबरच मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे सरकारचे उद्दीष्ट आहे. ओरिओस व्हेंचर पार्टनर्सच्या अहवालात म्हटले आहे की, भारतीय स्टार्टअप्सने 2021 मध्ये एकूण 42 अब्ज डॉलर्स जमा केले, जे मागील वर्षाच्या 11.5 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहेत. या स्टार्टअप्समध्ये ShareChat, Creed, Meesho, Nazara, Moglix, MPL, Grofers (आता Blinkit), upgrad, Mamaearth, GlobalBees, Acko आणि Spinny या मुख्य स्टार्टअप्सचा समावेश आहे.
2021 ठरले मैलाचा दगड
भारतीय उदयोन्मुख उद्योगांसाठी 2021 हे वर्ष मैलाचा दगड ठरले आहे. 11 नवउद्योगांपैकी ज्यांचे उद्योग भांडवल 1 अब्ज अमेरिकन डॉलर आहे असे 8 युनिकॉर्न उद्योग (Startup Unicorn), या सर्वांनी आयपीओमधून देशात 7.16 अब्ज भांडवल उभारले आहे. त्यात पेटीएम, झोमाटो, नायका, फ्रेशवर्क यांचा प्रामुख्याने समावेश आहे. पेटीएमकडे 2.46 अब्ज अमेरिकन डॉलर, झोमाटोकडे 14.8 अब्ज, नायकाकडे 13.5 अब्ज तर फ्रेशवर्ककडे 6.9 अब्ज अमेरिकन डॉलर भांडवल (Capital) आहे.
इतर बातम्या
Gold Import | कोरोना काळातही सोन्याची आयात दुप्पट, भारतीय ग्राहकांची रेकॉर्डब्रेक खरेदी
बजेटआधीचे पडघम : दोन मिनिटांत समजून घ्या, तुमच्या सॅलरीवर किती टॅक्स लागणार?
(Indian startups have raised USD 42 billion in 2021, up from USD 11.5 billion in the previous year)