मोदी सरकारने जबरदस्तीने घरी बसवले; IPS अधिकाऱ्याने घराबाहेर लावला बोर्ड, म्हणाला…
योगी सरकारने अमिताभ ठाकुर यांच्यासोबत आणखी दोन IPS अधिकाऱ्यांना घरी पाठवले आहे. | IPS Amitabh Thakur
लखनऊ: अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडणारे IPS अधिकारी अमिताभ ठाकुर (Amitabh Thakur) यांना उत्तर प्रदेश सरकारने निवृत्त केले आहे. यानंतर अमिताभ ठाकुर यांनी आपल्या लखनऊमधील घराबाहेर लावलेल्या नेमप्लेटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अमिताभ ठाकुर हे लखनऊच्या गोमती नगरमध्ये वास्तव्याला आहे. या घराबाहेर त्यांनी स्वत:च्या नावाखाली पद आणि ‘जबरिया रिटार्ड’ (Jabira Retired) अशी उपाधी लावून घेतली आहे. त्यांचा हे छायाचित्र सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (IPS Jabaria retired IPS Amitabh Thakur in UP)
योगी सरकारने अमिताभ ठाकुर यांच्यासोबत आणखी दोन IPS अधिकाऱ्यांना घरी पाठवले आहे. केंद्र सरकारने परवानगी दिल्यानंतर योगी सरकारने हे पाऊल उचलले. जनहितार्थ या दोन्ही अधिकाऱ्यांना निवृत्त करण्यात आल्याचे कारण योगी सरकारने दिले. नियमांचे पालन न करणे आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. त्यामुळे हे पाऊल उचलण्यात आल्याचेही योगी सरकारकडून सांगण्यात आले.
कोणत्या अधिकाऱ्यांना घरी बसवले?
योगी सरकारने अमिताभ ठाकुर यांना जबरदस्तीने घरी धाडले आहे. अमिताभ ठाकुर हे 1992च्या बॅचचे अधिकारी आहेत. तर उर्वरित दोन अधिकाऱ्यांमध्ये 2005च्या बॅचच्या राकेश शंकर आणि 2006च्या बॅचच्या राजेश कृष्ण यांचा समावेश आहे. योगी सरकारची ही कारवाई आतापर्यंत कोणत्याही आयपीएस अधिकाऱ्यावर करण्यात आलेल्या मोठ्या कारवायांपैकी एक मानली जात आहे.
अमिताभ ठाकुर यांची निवृत्ती का?
अमिताभ ठाकुर यांची आतापर्यंतची कारकीर्द अत्यंत वादग्रस्त आहे. समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांच्यासोबत त्यांचा 36 चा आकडा होता. मुलायम सिंह यांनी आपल्याला धमकी दिल्याची तक्रारही अमिताभ ठाकुर यांनी केली होती. त्यानंतर समाजवादी पक्षाच्या सरकारने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.
याशिवाय, अमिताभ ठाकुर यांची बेहिशेबी संपत्तीही हादेखील चर्चेचा विषय आहे. यापूर्वी उत्तर प्रदेश सरकारने त्यांना दोनवेळा निलंबितही केले होते. त्यांची चौकशी सुरु असल्यामुळे त्यांची बढतीही रोखण्यात आली होती. त्यांनी योगी सरकारच्या कारभारावर अनेकदा जाहीरपणे टीका केली आहे.
संबंधित बातम्या :
Jitendra Awhad on Rashmi Shukla : आयपीएस रश्मी शुक्ला का रडल्या? जितेंद्र आव्हाड म्हणतात…
रश्मी शुक्ला भाजपच्या एजंट, बेकायदेशीरपणे विरोधकांचे फोन टॅप करायच्या; राष्ट्रवादी काँग्रेसचा पलटवार
(IPS Jabaria retired IPS Amitabh Thakur in UP)