Israel-Hamas War | भारत-इस्त्राईलवर टाकणार अणुबॉम्ब, पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांच्या जावयाची धमकी
Israel-Hamas War | दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असणाऱ्या पाकिस्तानचे नेते आता युद्धाची भाषा बोलायला लागले आहे. पाकिस्तानच्या एका माजी पंतप्रधानांच्या जावयाने तर थेट भारतावर अणुबॉम्ब टाकण्याची धमकी दिली. तिथल्या जनतेला भारताविरुद्ध युद्धासाठी तयार राहण्याचे आवाहन केले.
नवी दिल्ली | 18 ऑक्टोबर 2023 : महागाईने कंबरडे मोडलेल्या पाकिस्तानमधील नेत्यांना भारताशी युद्ध करायचे आहे. सध्या पाकिस्तान जागतिक समूदायाकडे मदतीसाठी कटोर घेऊन फिरत आहे. तर येथील नेते जनतेला भारताविरुद्ध युद्ध करण्यासाठी भडकावत आहेत. पाकिस्तान मुस्लीम लीगचा (एन) नेता कॅप्टन सफदर याने एका सभेत भारतासह इस्त्राईलवर अणुबॉम्ब टाकण्याची धमकी दिली आहे. तर पाकिस्तानच्या मुस्लीम जनतेने भारताविरुद्ध गजवा-ए-हिंदसाठी तयार राहण्याचे त्याने आवाहन केले आहे. पाकिस्तानमध्ये लवकरच निवडणुका लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे असे भडकाऊ भाषणं करण्यात येत आहेत.
कोण आहे हा कॅप्टन
कॅप्टन सफदर हा माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचा जावई आहे. मरियम शरीफ ही त्याची पत्नी आहे. मध्यंतरी या पती-पत्नीमध्ये विस्तव पण जात नव्हता. पाकिस्तानची सत्ता समीकरणं बदलल्यानंतर हे दोघे पण राजकीय पूनर्वसनासाठी बरळत असतात. या दोघांना पण पाकिस्तानमध्ये मोठा जनाधार नाही.
पेशावर येथे झाली सभा
पॅलेस्टाईनला समर्थन देण्यासाठी पाकिस्तानच्या पेशावर येथे रॅली आणि सभा घेण्यात आली. त्यात मुस्लीमांना भडकवणारी भाषणं देण्यात आली. मुस्लिमांनी वेळीच जिहाद पुकारावा नाही तर त्यांची मानहानी होईल. त्यांना अपमान सहन करावा लागेल, असे सांगितले. मुस्लिमांनी जिहादसाठी तयार रहावे. भारताविरुद्ध गजवा-ए-हिंद साठी तयार रहाण्याचे आवाहन सफदरने केले.
PML N leader Muhammad Safder son in law of Nawaz Sharif speech on jihad and Ghazwai Hind…#Pakistan pic.twitter.com/RqOQhe9CCD
— Fakhar Yousafzai (@fakharzai7) October 16, 2023
अणुबॉम्बची दिली धमकी
पाकिस्तानकडे असलेला अणबॉम्ब हा सर्व मुस्लिमांचा आहे. कश्मीर आणि पॅलेस्टाईनचा उल्लेख करत त्याने या दोन्ही ठिकाणी मुस्लिमांवर अन्याय होत असल्याचे सांगितले. लहान मुलांसह महिलांची हत्या करण्यात येत आहे. नवाज शरीफच्या एका जुन्या विधानाचा आधार घेत इस्त्राईल आणि भारतावर अणुबॉम्ब टाकण्याची धमकी कॅप्टन सफदरने दिली.
नवाज शरीफ लवकरच पाकिस्तानात
नवाज शरीफ गेल्या काही वर्षांपासून लंडनमध्ये आहे. त्यांचा भाऊ शाहबाज शरीफ दोघांनी पाकिस्तानचे पंतप्रधान पद भुषवले. शाहबाजच्या कार्यकाळात पाकिस्तानची अर्थव्यवस्था एकदम रसातळाला गेली. सध्या पाकिस्तानमध्ये काळजीवाहू सरकार आहे. नवाज शरीफ लवकरच मायदेशी परतत आहे. त्यांच्या स्वागताची तयारी पीएमएल एनने सुरु केली आहे. पूर्व क्रिकेटर आणि माजी पंतप्रधान इम्रान खान सध्या न्यायालयीन कचाट्यात अडकला आहे. त्याच्यावर जीवघेणा हल्ला पण झाला आहे. पाकिस्तानमध्ये लवकरच निवडणुका लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी नवाज शरीफ पाकिस्तानमध्ये परत येत आहेत.