जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा ‘टार्गेट किलिंग’; विस्थापितांचं जगणं झालं मुश्किल…
अनंतनागच्या राख-मोमीन भागात दहशतवाद्यांनी गोळीबार करुन दोन मजूरांना जखमी केल्याचे पोलिसांनी सांगितलं होतं. दोन्ही जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगच्या घटना थांबायचे नाव घेत नाहीत. यामुळे आता दहशतवाद्यांकडून येथील निष्पाप नागरिकांना लक्ष्य केले जात असल्याने त्याचा अनेकांना फटका बसत आहे.दरम्यान, सोमवारी सायंकाळी उशिरा अनंतनाग जिल्ह्यात त्यांनी एका विस्थापित नागरिकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उधमपूरमध्ये राहणाऱ्या दीपूला दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार केले आहे. अनंतनाग येथील जंगलात मंडीजवळील एका उद्यानात एका खाजगी सर्कस मेळ्यात तो काम करत होता.
दीपूवर हल्ला करुन त्यानंतर दहशतवादी घटनास्थळावरून पळून गेले आहेत. त्याच वेळी, गोळी लागल्यावर दीपूला तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते,
मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेबाबत जम्मू-काश्मीर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दहशतवाद्यांनी अनंतनागमध्येच दोन विस्थापित मजुरांना टार्गेट केले होते. तर 10 दिवसांत मजुरांवर झालेला हा दुसरा हल्ला होता.
अनंतनागच्या राख-मोमीन भागात दहशतवाद्यांनी गोळीबार करुन दोन मजूरांना जखमी केल्याचे पोलिसांनी सांगितलं होतं. दोन्ही जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
गेल्या वर्षी काश्मीरमध्ये अधिकाधिक नागरिकांना आणि सुट्टीवर असलेल्या पोलिसांनाही लक्ष्य करण्यात आले होते. पोलिसांनी दिलेल्या अधिकृत आकडेवारीत असे सांगण्यात आले आहे की, दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये जवळपास 29 जणांना टार्गेट करून ठार करण्यात आले आहे.
यामध्ये प्रामुख्याने विस्थापित मजूर आणि मुस्लिमेतर कर्मचाऱ्यांचाच अधिक समावेश असल्याचेही सांगण्यात आले आहे.
मृतांमध्ये तीन स्थानिक तळागाळातील लोकप्रतिनिधी, तीन पंडित, एक स्थानिक महिला गायक, राजस्थानमधील एक बँक व्यवस्थापक, एक शिक्षक आणि जम्मूमधील एक सेल्समन, आठ गैर-स्थानिक मजुरांचा त्यामध्ये समावेश आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात किमान दहा विस्थापित नागरिक गंभीर जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.