कॉंग्रेसचे सरकार असलेल्या या राज्यात 22 जानेवारीची सुटी जाहीर, राम मंदिरात दीप प्रज्वलित करणार मुख्यमंत्री
सोमवारी राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा होणार असल्याने या निमित्ताने देशातील अनेक राज्यांनी सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. यातच आता कॉंग्रेसचे राज्य असलेल्या हिमाचल प्रदेशाने देखील उद्या सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे.
नवी दिल्ली | 21 जानेवारी 2024 : उद्या सोमवार दि. 22 जानेवारी रोजी अयोध्येतील नवनिर्मित राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने देशातील अनेक राज्यांनी सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. तर केंद्र सरकारने केंद्रिय कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सुटी जाहीर केली आहे. आता कॉंग्रेसचे सरकार असलेल्या हिमाचल प्रदेशनेही उद्याची सुटी जाहीर केली आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत.
उद्या 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिरात श्री रामाची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी उद्या सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. आता कॉंग्रेसचे सरकार असलेल्या हिमाचल प्रदेशात देखील उद्याची सुटी जाहीर केली आहे. याचा अर्थ हिमाचल प्रदेशातील सर्व सरकारी कार्यालयांना उद्या सुटी असणार आहे. मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू सिमला येथील एका राम मंदिरात दीप प्रज्वलित करीत असताना ही घोषणा केली. यावेळी त्यांनी भगवान राम सर्वांच्या श्रद्धा आणि आस्थेचे केंद्र आहेत. हा काही राजकीय विषय नाही. श्री राम कोणत्या पार्टीचे नाहीत, ते सर्वांचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या देशाच्या संस्कृतीत श्री राम आहेत..
श्री राम या देशाची संस्कृती आहेत. हिमाचल प्रदेश देवी-देवतांची भूमी आहे. आज देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण सिमलातील मंदिरात आलो आहोत. केंद्र सरकारने तर अर्ध्या दिवसाची सुटी देण्याची घोषणा केली आहे. परंतू कॉंग्रेस शासित हिमाचल प्रदेशात आम्ही 22 जानेवारीला संपूर्ण दिवस सुटी जाहीर केली आहे.
सिमलातील 40 मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त संपूर्ण हिमाचल प्रदेशात अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सिमलातील 40 मंदिरात हे कार्यक्रम असतील. 22 जानेवारीचा दिवस साजरा करण्यासाठी सिमला राममंदिरात 11 वाजताच्या हवन कार्यक्रमानंतर अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापनेचा कार्यक्रम लाईव्ह प्रसारीत करण्यात येणार आहे.