मदरशात घुसूनच दिल्या जय श्रीरामच्या घोषणा; ओवेसींनी बरोबर साधला निशाणा…
महमूद गव्हाण मदरशामध्ये जमावाने जबरदस्तीने घूसून मदरशाच्या एका बाजूला पूजा केल्यामुळे ताण तणाव निर्माण झाला होता.
म्हैसूरः कर्नाटकातील बिदर (Bidar) येथे दसऱ्याच्या कार्यक्रमादरम्यान महमूद गव्हाण मदरशामध्ये जमावाने जबरदस्तीने घूसून मदरशाच्या एका बाजूला पूजा केल्यामुळे ताण तणाव निर्माण झाला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे वातावरण आणखी तापले आहे. ज्या लोकांनी मदरशात घुसून मदरशाच्या एका भागात पूजा केल्याचे आणि जय श्री रामच्या घोषणा (Jay shri Ram) दिल्याचे त्या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. या घटनेबद्दल येथील स्थानिक मुस्लिमांनी नाराजीही व्यक्त केली आहे.
या घटनेमुळे परिसरातील परिस्थिती बिघडवण्याचे षडयंत्र रचले जात असल्याची टीका मुस्लिम समाजातील नागरिकांनी केली आहे.
येथील ही पहिलीच घटना नसून याआधीही असे प्रकार केले गेले असून याआधीही अशा अनेक कार्यक्रमातून असे प्रयत्न झाल्याचेही नागरिकांनी म्हटले आहे.
कर्नाटकातील बिदरमध्ये घडलेल्या या घटनेमुळे स्थानिक नागरिकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत असल्यामुळे शुक्रवारी या विरोधान आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. ज्यांनी ही घटना घडवून आणली आहे किंवा या प्रकरणात ज्यांचा हात आहे.
त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. नागरिकांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार दिली असून कठोर कारवाई करण्याचा विश्वास पोलिसांनी दिला आहे.
मदरशामध्ये घुसून पूजा करणाऱ्या ज्या लोकांची नावं पोलिसांना माहिती नाहीत त्यांनाही अटक करावी अशी मागणीही मुस्लिम लोकांनी केली आहे.
निष्काळजीपणाबद्दल पोलीस अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणाबद्दल लोकांनी राग व्यक्त केल्यानंतर या प्रकरणी 9 जणांवर गुन्हा दाखल केला गेला आहे. यासोबतच यातील 4 जणांनाही अटक केली गेली आहे.
या प्रकरणातील अन्य आरोपींच्या अटकेसाठी छापेमारी सुरू करण्याता आली असून संबंधितावर कठोर कारवाई करणार असल्याचा विश्वास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला आहे.
यासोबतच एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनीही या घटनेचा निषेध नोंदवून त्यांनी या घटनेचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.
मदरशामधील घुसखोरीबद्दल भाजपवरही त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. दहशतवाद्यांनी मदरशाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला होता. ही विकृती फैलवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.