Karnataka Election 2023 : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई शिगगांव मधून निवडणूक लढविणार, कसा आहे हा मतदार संघ
शिगगांवात कॉंग्रेस आणि भाजपात काटे की टक्कर आहे. कॉंग्रेसला येथे शेवटचा विजय 1994 मध्ये मिळाला होता. भाजपाने गेल्या तीन विधानसभा निवडणूकांत येथे कमळ फुलवले आहे.
नवी दिल्ली : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी येत्या विधानसभा निवडणूकीत शिगगांव विधानसभा मतदार संघातून आपण निवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली आहे. भाजपाच्या मुख्य निवडणूक समितीची बैठक रविवारी ( 9 एप्रिल ) दिल्ली येथे झाली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी एक दोन दिवसात विधानसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे. बसवराज बोम्मई यांनी शिगगांव या मतदार संघातून निवडणूक लढविण्याची घोषणा केली असून या मतदार संघाचे जातीय समीकरण कसे आहे ते आपण पाहूयात…
2008 पासून सलग तीन वेळा आमदार
बसवराज सोमप्पा बोम्मई कर्नाटकचे 23 वे मुख्यमंत्री आहेत. ते अत्यंत मुत्सदी नेते असून राजकारणात येण्यापू्र्वी पेशाने इंजिनियर होते. भारतीय जनता पार्टीतील ते एक दिग्गज नेते आहेत. शिगगांव विधानसभा क्षेत्रातून ते निवडून येतात. 2008 पासून सलग तीन वेळा ते निवडून आले आहेत. 2008 आणि 2013 मध्ये ते जल संधारण आणि सहकार मंत्री होते. बोम्मई यांनी चौथ्या येडीयुरप्पा सरकारमध्ये गृह, सहकार, न्याय आणि विधी, संसदीय कामकाज आदी खाती सांभाळली आहेत.
लिंगायत समुदायाचे प्राबल्य
शिगगांव विधानसभा सिट हावेरी जिल्हा आणि मुंबई-कर्नाटक विधानसभा क्षेत्रात आहे. या विधानसभा निवडणूक क्षेत्रात 2,09,629 मतदार आहेत. ज्यात सामान्य मतदार, एनआरआय मतदार आणि अन्य मतदार आहेत. सामान्य मतदारांत 1,09,443 पुरुष, 1,00,077 महिला आणि 6 अन्य आहेत. या क्षेत्रा लिंग गुणोत्तर 91.36 आहे आणि साक्षरता दर 74% च्या जवळ आहे. येथील जातीय समीकरणाचा विचार केला तर येथे 73% हिंदू, 24% मुस्लिम आणि 0.08% ख्रिश्चन आहेत. शिगगांव मतदार संघात लिंगायत समुदाय आणि एस.टी. सामाजिक गटाचे प्राबल्य आहे. बोम्मई यांना मानणारा हा मतदार मोठा असून ते स्वत: याच समुदाचे आहेत.
बोम्मई 83868 मते मिळवून जिंकले होते
2018 च्या विधानसभा निवडणूकीत बोम्मई 83868 मते मिळवून जिंकले होते, कॉंग्रेसच्या सैय्यद अजीम्पीर खादरी यांना 29265 मतांनी त्यांनी पिछाडीवर टाकले होते. 2018 मध्ये या जागेसाठी पर एकूण 79.55% मतदारांनी मतदान केले होते. साल 2013 च्या विधानसभा निवडणूकीत भाजपाने 9,503 मतांच्या (6.33%) अंतराने या जागेवर विजय मिळविला.
कॉंग्रेसला शेवटचा विजय 1994 मध्ये मिळाला
शिगगांवात कॉंग्रेस आणि भाजपात काटे की टक्कर आहे. कॉंग्रेस येथे शेवटचा विजय 1994 मध्ये मिळाला होता. भाजपाने गेल्या तीन विधानसभा निवडणूकांत येथे कमळ फुलवले आहे. मतदार यंदा आपले पारडे कुणाच्या बाजूने टाकतात हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे. कर्नाटक- 2018 च्या विधानसभा निवडणूकांत भाजपा 104 जागा जिंकून राज्यातील सर्वात मोठी पार्टी बनली होती. कॉंग्रेसला 80 आणि जेडी (एस) ला 37 जागा मिळाल्या होत्या. कर्नाटकच्या एकूण 224 विधानसभा जागांसाठी 10 मे रोजी निवडणूक होत आहेत आणि 13 मे रोजी मतमोजणी होत आहे.