शेजारील राज्यात जीवघेण्या विषाणूचा कहर, शेकडो मांजरे दगावली, लक्षण आणि उपाय काय?
कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यात एफपीव्ही (Feline Panleukopenia Virus) नावाच्या जीवघेण्या विषाणूचा प्रादुर्भाव पसरला आहे. या विषाणूने शेकडो मांजरांचा बळी घेतला आहे. हा विषाणू अत्यंत संसर्गजन्य असून त्यावर उपचार नाहीत.

महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या कर्नाटक राज्यात एका जीवघेणा विषाणूचा कहर पाहायला मिळत आहे. कर्नाटक बर्ड फ्लू या आजाराच्या धक्क्यातून सावरत असतानाच आता मांजरांमध्ये एफपीव्ही (Feline Panleukopenia Virus) नावाच्या एका जीवघेण्या विषाणूचा कहर सुरू झाला आहे. कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यात एफपीव्ही या विषाणूने थैमान घातले आहे. यामुळे आतापर्यंत शेकडो मांजरांचा मृत्यू झाला आहे. या विषाणूची लागण झालेल्या मांजरींच्या जगण्याची शक्यता फक्त १ टक्का असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
कर्नाटकमधील रायचूर जिल्ह्यात एफपीव्ही या विषाणूचे थैमान सुरु आहे. एफपीव्ही हा अत्यंत संसर्गजन्य विषाणू आहे. हा विषाणू वेगाने पसरतो. जर गटातील एका मांजराला या विषाणूची लागण झाली असेल तर काही क्षणांतच इतर मांजरांनाही या आजाराची लागण होते. या आजारावर कोणताही उपचार नाही. यामुळे मांजरीचे पालन करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.
संपूर्ण राज्यात विषाणू पसरण्याची शक्यता
रायचूर जिल्ह्यात या विषाणूचा कहर सुरु असून संपूर्ण राज्यात हा विषाणू पसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे, मांजर पाळणाऱ्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. एडिनबर्ग प्राणी रुग्णालयातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, एफपीव्ही या विषाणूचा मानवांना किंवा कुत्र्यांना कोणताही धोका नाही. मात्र आपण घातलेले कपडे, शूज किंवा हातांमुळे या विषाणूचा मांजरांमध्ये प्रसार होऊ शकतो.
कर्नाटक सरकारने या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. पशुवैद्यकीय विभागाकडून मांजरांच्या लसीकरणावर भर दिला जात आहे. त्यासोबत नागरिकांमध्ये या विषाणूबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे.
मांजर पाळणाऱ्यांनी काय काळजी घ्यावी?
जर तुमच्या घरी पाळीव मांजर असेल तर त्या मांजराला इतर मांजरांच्या संपर्कात येऊ देऊ नका. घरात स्वच्छता ठेवा. जर मांजरांमध्ये काही लक्षणे आढळल्यास तात्काळ पशुवैद्यकांचा सल्ला घ्या. मांजरांचे नियमित लसीकरण करा.
एफपीव्ही आजाराची लक्षणे काय?
अशक्तपणा भूक न लागणे उलटी जुलाब उच्च ताप