Kerala Election 2021 : केरळमध्ये काँग्रेसला मोठा झटका, पक्ष नेतृत्वावर आगपाखड करत पीसी चाको यांचा राजीनामा
. ANIने दिलेल्या माहितीनुसार चाको यांनी पक्षाच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे आपला राजीनामा पाठवला आहे. चाको यांनी केरळ काँग्रेसमधील गटबाजीला कंटाळून आपण राजीनामा देत असल्याचं म्हटलंय.
नवी दिल्ली : केरळमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता रंगात आली असताना काँग्रेसला एक मोठा झटका बसला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि गांधी परिवाराचे विश्वासू राहिलेले पीसी चाको यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. चाको यांनी बुधवारी राजीनाम्याची घोषणा केली. ANIने दिलेल्या माहितीनुसार चाको यांनी पक्षाच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे आपला राजीनामा पाठवला आहे. चाको यांनी केरळ काँग्रेसमधील गटबाजीला कंटाळून आपण राजीनामा देत असल्याचं म्हटलंय.(Kerala Congress leader PC Chacko submitted his resignation to Sonia Gandhi)
पक्षांतर्गत गटबाजीबाबत आपण पक्ष नेतृत्वाला कळवून थकलो आहोत. केरळ काँग्रेसमध्ये जे काही सुरु आहे, त्याबाबत पक्ष नेतृत्व फक्त बघ्याची भूमिका घेत आहे, अशी खंतही चाको यांनी बोलून दाखवली आहे. विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर चाको यांचा राजीनामा काँग्रेससाठी मोठा झटका मानला जात आहे.
गांधी परिवाराची स्तुती ते राजीनामा!
गांधी परिवार हा देशातील पहिला परिवार असल्याचं सांगत दोन वर्षांपूर्वी चाको यांनी वाद ओढवून घेतला होता. त्यावेळी देशपातळीवर चाको यांच्यावर मोठी टीका झाली होती. भाजपने तर चाको हे गांधी परिवाराची चाटूगिरी करण्यातच धन्यता मानत असल्याचं टीकास्त्र डागलं होतं. आता मात्र त्यात गांधी परिवाराच्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत चाको यांनी राजीनामा दिला आहे.
#WATCH Congress leader PC Chacko says, “PM Modi has negative opinion for the first family of India, the first family of India is truly the first family of India. India is obliged to them… India is India today because of the planning and leadership of Pandit Jawaharlal Nehru…” pic.twitter.com/lOK9ztpcEj
— ANI (@ANI) March 30, 2019
पक्ष नेतृत्वावर आगपाखड
“मी केरळचा आहे तिथे काँग्रेस नावाचा कोणता पक्ष नाही. तिथे दोन पक्ष आहे. एक काँग्रेस (I), तर दुसरी काँग्रेस (A). या दोन पक्षांची एक ओऑर्डिनेशन कमिटी आहे, जी KPCC प्रमाणे काम करत आहे. केरळमध्ये विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. लोक पुन्हा काँग्रेसची सत्ता येण्याची वाट पाहत आहेत. मात्र, वरिष्ठ नेते गटबाजीत समाधान मानत आहेत. मी पक्ष नेतृत्वाकडे ही गटबाजी संपवण्याची विनंती केली आहे. पण पक्ष नेतृत्व मात्र दोन्ही गटांच्या प्रस्तावांवर सहमती दर्शवत आहे”, अशा शब्दात पीसी चाको यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
राहुल गांधींच्या मतदारसंघातही राजीनामा सत्र!
काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांच्या मतदारसंघातील 4 नेत्यांनीही गेल्या आठवड्यात राजीनामा दिला होता. त्यात केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी सदस्य केके विश्वनाथन, केपीसीसी सचिव एमएस विश्वनाथन, डीसीसी महासचिव पीके अनिल कुमार आणि महिला कांग्रेस नेत्या सुजाया वेणुगोपाल यांचा समावेश होता.
संबंधित बातम्या :
राहुल गांधींनी शब्द पाळला, 12 वर्षाच्या मुलाला स्पोर्ट्स शूज पाठवले!
केरळमध्ये CPIM चा मोठा निर्णय, तरुणांना संधी देण्यासाठी 5 मंत्र्यांसह 25 आमदारांचं तिकिट कापलं
Kerala Congress leader PC Chacko submitted his resignation to Sonia Gandhi