आरिफ साहेबांचा केरळमध्ये कहर, एका रात्रीत डीन होतील दीन..
केरळमधील 9 विद्यापीठांच्या कुलगुरूंना 24 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:30 वाजेपर्यंत राजीनामा सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नवी दिल्लीः केरळमध्ये डाव्यांचं सरकार (Kerala Government) असलं तरी तेथील राज्यपाल आणि राज्य सरकार वाद लपून राहिला नाही. राज्यपाल आरिफ मोहम्मद खान (Governor Arif Mohammad Khan) यांच्यातील आणि राज्यसरकारमधील संघर्ष आता सातत्याने वाढत आहे. सध्या केरळमध्ये विद्यापीठांमधील कुलगुरु (vice chancellor) नियुक्तींचा वाद उफाळून आला आहे. त्यांच्या सर्वच मुद्द्यांवर राज्य सरकार आणि राज्यपाल आमनेसामने आले आहेत. त्यामुळे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी रविवारी 9 विद्यापीठांच्या कुलगुरूकडे तात्काळ राजीनाम्याची मागणी केली आहे. या प्रकरणी केरळ राजभवनाकडून ट्विट करून ही माहिती देण्यात आली आहे.
राज्यपालांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, 9 विद्यापीठांच्या कुलगुरूंना 24 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:30 वाजेपर्यंत राजीनामा सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
राजीनाम्यांची ही यादी संबंधित विद्यापीठांच्या कुलगुरू आणि कुलसचिवांनाही ईमेलद्वारे कळविण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे.
तत्पूर्वी, एका पुस्तकाच्या अनावरणप्रसंगी राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी केरळचे कायदा मंत्री आणि अर्थमंत्र्यांना सल्ला दिला आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, कोणत्याही मंत्र्यांनी संविधानाचे नियम विसरता कामा नये.
त्यामुळे केरळच्या कायदामंत्र्यांनीही राज्यपालांच्या निर्णयाचा आढावा घेणार असल्याचे सांगितले होते. त्यावर राज्यपाल म्हणाले की, मंत्र्यांची नियुक्तीला मी जबाबदार आहे. त्यामुळे कोणीही संविधानाला विसरू नये.
मी त्यांच्या कामांचे पुनरावलोकन करण्यासाठी या ठिकाणी असून ते माझ्या कामाचे पुनरावलोकन करू शकत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
आरिफ मोहम्मद यांनी केरळच्या दारू आणि लॉटरी धोरणावर गेल्या काही दिवसांपासून जोरदार हल्लाबोल केला होता.त्याप्रकरणी मंत्र्यांवरही त्यांनी ताशेरे ओढले होते.
ते म्हणाले होते की, कायदामंत्री माझ्या कामाचा आढावा घेणार असल्याचे ते सांगत आहेत. मात्र राज्यपाल म्हणून मी त्यांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी येथे आलो आहे.
मंत्र्यांनी शपथ देताना मी त्याला जबाबदार होतो असंही ते म्हणाले आहेत. याचा अर्थ त्यांना राज्यघटनेच्या नियमांची माहिती नाही. हुशार आणि बुद्धीमान लोकं बाहेर जात असल्यानेच अज्ञानी लोकं नागरिकांवर राज्य करतात अशी खोचक टीकाही त्यांनी केली आहे.