Bihar Politics: लालूप्रसाद यादव यांची लहान सून होऊ शकते बिहारची उपमुख्यमंत्री, तेजस्वी यादव पक्ष चालवतील, यापूर्वीही लालूंनी असे केले
राजश्री यादव यांच्यावर कोणतेही आरोप नसल्याने त्यांच्या नावाची चर्चा सध्या सुरु आहे. लालूप्रसाद यादव यांच्या परिवारातही हीच चर्चा सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. याबाबत राजदच्या बड्या नेत्यांशी लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांचीही चर्चा झाल्याचे सांगण्यात येते आहे. हाच फॉर्म्युला पक्षाकडूनही मान्य होईल असे सांगण्यात येत आहे.
पटणा– बिहारच्या (Bihar) नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार असतील. गेल्या वेळी जेव्हा जेडीयू आणि राजदचे सरकार एकत्र आले होते तेव्हा तेजस्वी यांना उपमुख्यमंत्रीपद दिले होते. यावेळी मात्र तेजस्वी यांची पत्नी राजश्री (रेचल) (Rajshree Yadav)यांना उपमुख्यमंत्री करण्यात येईल, अशी चर्चा आहे. तेजस्वी यादव (Tejaswi Yadav)यांच्यासह परिवारातील सगळ्या सदस्यांवर घोटाळ्यांचे आरोप असल्यामुळे राजश्री यांना हे पद दिले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. गेल्या वेळी हाच मुददा भाजपाने जोरदार उपस्थित करत सरकारला धारेवर धरले होते, त्याचमुळे नितीश कुमार यांना लालूप्रसाद यादव यांची साथ सोडावी लागली होती.
राजश्री यांच्या नावाची का चर्चा?
राजश्री यादव यांच्यावर कोणतेही आरोप नसल्याने त्यांच्या नावाची चर्चा सध्या सुरु आहे. लालूप्रसाद यादव यांच्या परिवारातही हीच चर्चा सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. याबाबत राजदच्या बड्या नेत्यांशी लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांचीही चर्चा झाल्याचे सांगण्यात येते आहे. हाच फॉर्म्युला पक्षाकडूनही मान्य होईल असे सांगण्यात येत आहे. असे असले तरी अद्याप पक्षाकडून कोणताही अधिकृत दुजोरा याला देण्यात आलेला नाही.
लालू यादव कुटुंबीयांवर घोटाळ्याचे आरोप
लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप आहेत. लालू प्रसाद यादव चारा घोटाळ्यात शिक्षा भोगत आहेत. त्याचबरोबर रेल्वेत जमीन घएऊन नोकरी दिल्याप्रकरणी वेगळा खटला सुरु आहे. याच प्रकरणात राबडी यादव आणि त्यांची मोठी मुलगी मिसा भारतीही सहआरोपी आहेत. ही दोन्ही प्रकरणे सीबीआयकडे आहेत. यासह सीबीआयकडे रेल्वे हॉटेल्सच्या टेंडरचेही एक प्रकरण आहे. यात लालू, राबडी आणि तेजस्वी यांच्यावर आरोप आहेत. ईडीने या प्रकरणात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केलेला आहे. लालू यादव आणि त्यांच्या परवारातील सदस्य हे रडारवर आहेत. जर तपास यंत्रणांनी पावले उचलली तर सरकार अडचणीत येऊ नये म्हणूनही राजश्री यादव यांच्या नावाला पसंती असल्याचे सांगण्यात येते आहे. राजश्री यांच्यावर कोणतेही आरोप नाहीत. त्यांची प्रतिमा ही निष्कलंक आहे.
यापूर्वी लालूंनी असाच केला होता प्रयोग
लालू जेव्हा चारा घोटाळ्यात अडकले होते, त्यावेळी त्यांनी पत्नी राबडी देवी यांना पुढे केले होते. त्यांनी वरिष्ठ नेत्यांना बाजूला ठेवत राबडी देवी यांना मुख्यमंत्रीपद दिले होते. त्यामुळे पुन्हा एकदा राजश्री यांच्याबाबत हा प्रयोग होऊ शकतो, अशी चर्चा आहे.
राजश्री यांचे ८ महिन्यांपूर्वी तेजस्वी यांच्याशी लग्न
९ डिसेंबर २०२१ रोजी तेजस्वी यादव यांनी रेचल (राजश्री) यांच्याशी दिल्लीत विवाह केला आहे. तेजस्वी यादव आणि राजश्री हे लहानपासूनचे मित्र आहेत. सात वर्षांपूर्वी ते एकमेकांच्या अधिक जवळ आल्याचे सांगण्यात येते आहे.
हरियाच्या रहिवासी राजश्री
राजश्री या हरियाणाच्या चंदीगड येथील एका व्यापाऱ्याची कन्या आहेत. तेजस्वी आणि राजश्री हे एकत्र शिकलेले आहेत. तेजस्वी हे लालूप्रसाद यादव यांचे सर्वात लहान पुत्र आहेत, त्यामुळे ते लाडकेही आहेत. लालूप्रसाद आणि राबडी देवी यांनी लग्नाला परवानगी द्यावी यासाठी तेजस्वी यांना बरेच प्रयत्न करावे लागले आणि वाट पाहावी लागल्याचेही सांगण्यात येते.