‘मुस्लिमांना शांततेत आणि सन्मानाने जगू द्या’, कर्नाटक भाजपमधून मुस्लिमांप्रती प्रेम आलं उफाळून
बंगळुरू : सध्या कर्नाटक (Karnataka) अनेक घटनांमुळे चर्चेत आहे. कर्नाटकमधील हिजाब प्रकरणाने राण उठवले होते. त्यानंतर तेथे हलाल मांस वाद ही उफाळून आला होता. तर आता कर्नाटकात एका नव्याच वादाने तोंड वर काढले आहे. येथे मुस्लिम (Muslims) व्यावसायिकांवरही मंदिराबाहेर हल्ले होऊ लागले. त्यामुले कर्नाटकातून सातत्याने वादग्रस्त घटना समोर येताना दिसत आहे. सतत समोर येणाऱ्या या […]
बंगळुरू : सध्या कर्नाटक (Karnataka) अनेक घटनांमुळे चर्चेत आहे. कर्नाटकमधील हिजाब प्रकरणाने राण उठवले होते. त्यानंतर तेथे हलाल मांस वाद ही उफाळून आला होता. तर आता कर्नाटकात एका नव्याच वादाने तोंड वर काढले आहे. येथे मुस्लिम (Muslims) व्यावसायिकांवरही मंदिराबाहेर हल्ले होऊ लागले. त्यामुले कर्नाटकातून सातत्याने वादग्रस्त घटना समोर येताना दिसत आहे. सतत समोर येणाऱ्या या वादग्रस्त आणि धार्मिक घटनांमुळे आता राज्यातील भाजप समोर आली असून अशा घटनांवर भाजपने आवाज उठवला आहे. तसेच भाजपकडून अशा घटनांवर टीका होत आहे. यावेळी मंदिरासमोरील मुस्लिम व्यापाऱ्यांच्या दुकानाची तोडफोड झाल्याची घटना समोर आल्यानंतर कर्नाटक भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा (B.S. Yediyurappa) चिंता व्यक्त करताना, मुस्लिमांना शांततेने आणि सन्मानाने जगू द्या, असं म्हटलं आहे.
मुस्लिम दुकानाची तोडफोड
कर्नाटकात हिजाब, हलाल या वादानंतर मंदिरासमोरील मुस्लिम व्यापाऱ्यांच्या दुकानाची तोडफोड झाल्याची घटना घडली आहे. धारवाड जिल्ह्यातील एका मंदिरात श्री राम सेनेच्या कार्यकर्त्यांनी मुस्लिम फळ विक्रेत्यांची तोडफोड करून त्यांची फळे रस्त्यावर फेकली. कर्नाटकातील वाढत्या जातीय घटना आणि तणावाबाबत विरोधकांनी सरकारविरोधात आघाडी उघडली. तसेच सरकारवर टीकेची झोड उठवत अनेक प्रश्न उभे केले. तर याचवरून सरकारला भाजपच्याच एका बड्या नेत्याने घेरत काही प्रश्न केले आहेत. हे प्रश्न दुसऱ्या तिसऱ्या कोणी केले नसून माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी उपस्थित केले आहेत. याशिवाय भाजपच्या अन्य दोन आमदारांनीही हा मुद्दा उपस्थित केला आहे.
कर्नाटकात हिंदू संघटनांकडून मुस्लिम आणि त्यांच्या व्यवसायांविरोधात चालवल्या जात असलेल्या मोहिमेबद्दल सरकारला विरोधी पक्षांकडून टीकेचा सामना करावा लागला आहे. तर धारवाडमधील मंदिरासमोर मुस्लिमांच्या फळांच्या गाड्या फोडल्याप्रकरणी श्री राम सेनेच्या सदस्यांना अटक करण्यात आली आहे. यानंतर याप्रकरणी पत्रकारांनी येडियुरप्पा यांना विचारले असता, त्यांनी मुस्लिमांना शांततेने आणि सन्मानाने जगू द्या, असे म्हटले आहे. तसेच त्यांनी मुस्लिमांच्या विरोधात हिंदू संघटनांनी अशी कृत्ये करू नयेत असे आवाहनही केले आहे.
आई मुलासारखे जगा
सोमवारी पत्रकारांशी बोलताना येडियुरप्पा म्हणाले की, हिंदू आणि मुस्लिमांनी आई मुलांप्रमाणे एकत्र राहावे अशी माझी इच्छा आहे. अशा परिस्थितीत काही उपद्रवी घटक आडकाठी आणत असतील, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच दिल्याचेही त्यांनी सांगितले.
येडियुरप्पा यांची जाहीर टीका
येडियुरप्पा हे भाजपचे राज्यातील पहिले मोठे नेते आहेत. ज्यांनी हिजाबच्या वादानंतर हिंदुत्व संघटनांनी केलेल्या मोहिमांवरजाहीरपणे टीका केली आहे. तसेच त्यांनी मुख्यमंत्र्यांनी कायदा आणि सुव्यवस्था संघ परिवाराकडे सोपवली असून श्रीराम सेनेच्या गुंडांना कंत्राटी पद्धतीने नियुक्त केले आहे, असा आरोप त्यांनी केला. हे कर्नाटकसाठी मोठे संकंट आहे. रामाच्या नावाने मुस्लिमांना मारण्याचे काम सुरू आहे. असे करणारे आणि आदेश देणारे रावण आहेत. त्यांना शिक्षाही झालीच पाहिजे, असे ते म्हणाले. कन्नड जनता अशा गोष्टींना कधीच माफ करणार नाही, असेही ते म्हणाले.
मंत्र्यांचा सभागृहात बहिष्कार
कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री जेसी मधुस्वामी यांनी सभागृहात सांगितले होते की, गैर-हिंदू लोक मंदिर परिसरात आणि धार्मिक मेळ्यांमध्ये त्यांचा व्यवसाय करू शकत नाहीत. तेव्हापासून हिंदुत्ववादी गट मुस्लिम विक्रेत्यांना सर्व धार्मिक स्थळांमधून बाहेर काढण्याची जोरदार मागणी करत आहेत. त्यामुळे शनिवारी श्री राम सेनेच्या लोकांनी धारवाड येथील मंदिरात एका मुस्लिम फळ विक्रेत्याची सर्व फळे रस्त्यावर फेकून दिली.
मंत्र्यांचाच यु टर्न
मुस्लिम फळ विक्रेत्यांवर होणाऱ्या हल्ल्याप्रकरणी भाजपमधूनच विरोध होत आहे. तसेच याप्रकरणी बीएस येडियुरप्पा यांनीही आवाज उठवल्यानंतर कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री जेसी मधुस्वामी यांनी आपल्या विधानावरून यु टर्न घेतला. तसेच त्यांनी मुस्लिमांवर हल्ला करमाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला. तसेच त्यांनी, स्वातंत्र्यानंतर ज्या लोकांनी भारतात राहण्याचा निर्णय घेतला ते सर्व भारतीय असल्याचे मधुस्वामी यांनी म्हटले आहे. हा देश सर्वांचा आहे. काही समाजकंटकांच्या कृत्यासाठी सरकारला जबाबदार धरता येणार नाही, परंतु अशा गटांनी विघ्न निर्माण करून शांतता भंग केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले. तसेच मधुस्वामी पुढे म्हणाले की, भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला जगण्याचा, व्यवसाय करण्याचा आणि त्याचा धर्म पाळण्याचा अधिकार दिला आहे. सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही समाजाची बदनामी करण्याचा अधिकार कोणालाही नाही. मात्र त्यांच्याच, अहिंदू व्यक्ती मंदिर परिसरात दुकान लावू शकत नाहीत, या विधानानंतर हिंदू संघटनेच्या लोकांना प्रोत्साहन मिळाले.
आमदार अनिल यांचाही विरोध
कर्नाटक सरकाने मुस्लिम व्यापाऱ्यांना वार्षिक हिंदु मंदिरातील मेळावे आणि इतर धार्मिक कार्यक्रमांना उपस्थित राहण्यास नकार दिला होता. त्यावर भाजपच्याच आमदार अनिल बेनाके यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावर ते म्हणाले ‘प्रत्येक व्यक्ती आपला व्यवसाय करू शकतो. मात्र कुठून काय खरेदी करायचे हे लोकांनी ठरवायचे आहे. यासंदर्भात राज्यघटनेचा संदर्भ देत ते म्हणाले होते की, “मंदिराच्या जत्रेदरम्यान कोणतेही निर्बंध घालण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, आम्ही बंदी घालू देणार नाही, पण लोकांनी तसे केले तर आम्ही काहीही करू शकत नाही.”
इतर बातम्या :