अदानी-अंबानींकडून रसद मिळाली की काय, तोंड बंद का झाले, पंतप्रधानांचा काँग्रेसवर गंभीर आरोप
PM Narendra Modi Attack on Congress : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणामध्ये काँग्रेसवर तुफान हल्लाबोल केला. अशात काँग्रेस मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्याविरोधात ब्र सुद्धा काढत नसल्याचा चिमटा त्यांनी काढला. काँग्रेसला या दोघांकडून काही रसद मिळाली की काय, असा टोला पण त्यांनी हाणला.
Lok Sabha Election 2024 आखाड्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला मोठ्या कोंडीत पकडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला आरोपांच्या कटघऱ्यात उभं केलं आहे. त्यांनी तेलंगणातील करीमनगरमध्ये काँग्रेसवर जोरदार प्रहार केला. काँग्रेसने निवडणुकीपूर्वी उद्योगपती मुकेश अंबानी- गौतम अदानी यांच्यावर केंद्रातील भाजप सरकार मेहरबान असल्याचा आरोप केला होता. त्यावरुनच पंतप्रधानांनी काँग्रेसची री ओढली.
राहुल गांधीवर तुफान हल्लाबोल
पंतप्रधान मोदी म्हणाले, ” तुम्ही पाहिले असेल की, काँग्रेसचे शहजादे (राहुल गांधी) गेल्या पाच वर्षांपासून सकाळी उठल्यावर एकच आरोप करत होते. त्यांचे नाव राफेल प्रकरणात आल्यानंतर त्यांचा हा दिनक्रम ठरला होता. पाच वर्षांपासून ते एकच माळ जपत होते. पाच उद्योगपती, पाच उद्योगपती, असा त्यांचा टाहो होता. त्यानंतर त्यांनी हळूहळू अंबानी-अदानी अशी जपमाळ आरंभली. पण लोकसभा निवडणूक सुरु झाल्यापासून त्यांनी अंबानी-अदानींविरोधात ब्र सुद्धा काढला नाही.”
रात्रीतूनच नाव घेणे का केले बंद
यापूर्वी अदानी-अंबानींना शिव्यांची लाखोली वाहणाऱ्या शहजाद्याने आताच शिव्या देणे का बंद केले असा चिमटा मोदींनी काढला. या लोकसभा निवडणुकीसाठी अंबानी-अदानी यांच्याकडून किती रसद मिळली, असा गंभीर आरोप पंतप्रधानांनी राहुल गांधींवर केला. काँग्रेसने रात्रीतूनच या दोन उद्योगपतींचे नाव घेणं का बंद केले, हे राहुल गांधी यांनी सांगावं असे आवाहन मोदींनी केले.
किती मिळाल्या काळ्याधनाच्या पोतड्या
“काळ्याधनाच्या किती पोतड्या भरुन रुपये आणले आहे. टेम्पो भरुन नोटा काँग्रेसला पोहचल्या का? काय सौदा झाला. तुम्ही एका रात्रीतूनच अंबानी-अदानी यांना शिव्या देणे का बंद केले. दाळीत काहीतरी काळंबेरं आहे. पाच वर्षें शिव्या दिल्या आणि रात्रीतूनच त्या बंद झाल्या. म्हणजे कोणता ना कोणता चोरीचा माल तुम्हाला (काँग्रेस) मिळाला आहे. याचं देशाला उत्तर तर द्यावेच लागेल.” असा घणाघात पंतप्रधानांनी केला.
For years, Congress के शहजादे दिन-रात एक ही माला जपते थे…’5 industrialists’, ‘Ambani’, ‘Adani’…
But since the elections are declared, they have stopped abusing Ambani, Adani…
Why?
I wish to ask the Shehzadey of Congress, how much black money have they recieved from… pic.twitter.com/fiAGe0m3qG
— BJP (@BJP4India) May 8, 2024
देश बुडाला तरी कुटुंबाला नाही झळा
“तेलंगणाची स्थापना होताना येथील जनतेने बीआरएसवर विश्वास ठेवला. पण बीआरएसने जनतेची स्वप्न तोडली. काँग्रेसचा पण हाच इतिहास आहे. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने हाच कित्ता गिरवला आहे. देश बुडाला तरी चालतो, पण कुटुंबाला झळ लागता कामा नये. या कुटुंबाला काहीच फरक पडत नाही. फॅमिली फर्स्टचे त्यांचे धोरण आहे. माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांचा असाच अपमान या कुटुंबाने केला. मृत्यूनंतर त्यांचे पार्थिव शरीर काँग्रेसच्या कार्यालयात येऊ दिले नाही. भाजप सरकारने नरसिंह राव यांना भारत रत्न दिले.”