लक्षद्वीपमध्ये रंगणार राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी सामना, कोणाला मिळणार उमेदवारी?
लक्षद्वीप हे बेट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. पर्यटकांचा लक्षद्वीपला जाण्याचं प्रमाण वाढत आहे. दुसरीकडे इथे देखील लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. याआधी इथे राष्ट्रवादीचाच खासदार होता. पण आता राष्ट्रवादीत दोन गट पडल्याने कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.
Loksabha election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर हे बेट चांगलेच चर्चेत आले होते. पंतप्रधान मोदी यांनी या बेटाला भेट देण्याचं आवाहन केलं होतं. पंतप्रधान मोदींनी आवाहन केल्यानंतर लक्षद्वीपच्या तीन मंत्र्यांनी त्या पोस्टवरुन खिल्ली उडवली होती. त्यानंतर भारतीयांनी देखील बायकॉट मालदीव मोहिम सुरु केली. ज्याचा मालदीवच्या पर्यटनाला मोठा फटका बसला होता. या घटनेनंतर लोकांनी लक्षद्वीपला जाण्याचा प्लान केला होता. यंदाच्या बजेटमध्ये देखील लक्षद्वीपला विकसित करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.
लक्षद्वीपमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी
दुसरीकडे देशात लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली असून सगळेच पक्ष कामाला लागले आहेत. लक्षद्वीपमध्ये देखील निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. पण यंदा या ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगू शकतो. कारण लक्षद्विपची जागा एनडीएत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळणार आहे.
राष्ट्रवादी फुटीचा संघर्ष महाराष्ट्राबरोबरच लक्षद्विपमध्ये दिसण्याची चिन्हं आहेत. कारण भाजपनं लक्षद्वीपची एक जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. विनोद तावडेंनी ट्विटद्वारे ही माहिती दिली. लक्षद्वीपचे आत्ताचे खासदार मोहम्मद फैजल शरद पवारांसोबत आहेत. त्यामुळे अजित पवार लक्षद्वीपमध्ये ज्या उमेदवाराला संधी देतील. त्याला भाजपचा पाठिंबा असल्याचं विनोद तावडे यांनी म्हटलं आहे.
मागच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला येथे दीडशे मतंही मिळाली नाहीत. तीच जागा अजित पवारांना मिळाल्यानं विरोधकांनी टीका केली आहे. 2019 ला राष्ट्रवादीच्या मोहम्मद फैजल यांना 22,851 मतं मिळाली होती. काँग्रेसच्या उमेदवाराला 22,028 मते मिळाली होती. राष्ट्रवादीचे फैजल अवघ्या 823 मतांनी जिंकले होते. मात्र भाजपचे उमेदवार अब्दुल कादर यांना फक्त 125 मतं मिळवू शकले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैजल यांचे लोकसभा सदस्यत्वपद मात्र संपुष्टात आले होते. कारण एका हत्येच्या प्रकरणात त्यांना लक्षद्वीपच्या न्यायालयाने दोषी ठरवले होते. ज्यामध्ये त्यांना 10 वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला होता. 11 जानेवारी 2022 रोजी त्यांच्यासह 4 जणांना कोर्टाने ही शिक्षा सुनावली होती. त्यानंतर 25 जानेवारी रोजी त्यांच्या शिक्षेवर केरळ उच्च न्यायालयाने स्थगितीचा आदेश दिला होता. त्यानंतर त्यांना खासदारकी पुन्हा बहाल करण्यात आली.
लक्षद्वीपमध्ये आता अजित पवार कोणाला उमेदवारी देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.