Mp By Election Result | दुधात साखर विरघळावी तसे ज्योतिरादित्य भाजपमध्ये विरघळले : शिवराज सिंह चौहान
मध्य प्रदेशमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. मध्य प्रदेश भाजपच्या गोटात आनंदाचं वातावरण पसरलं आहे.
नवी दिल्ली : देशात एकीकडे बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा धुराळा उडत आहे. दुसरीकडे याचवेळी देशातील 11 राज्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीचाही निकाल जाहीर होत आहे. यात मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेशसह आणखी 8 इतर राज्यांचा समावेश आहे. मध्य प्रदेशमध्ये 28 जागांवर, गुजरात 8, उत्तर प्रदेश 7, मणिपूर 5, नागालँड 2, ओडिशा 2, झारखंड 2, कर्नाटक 2, हरियाणा 1, तेलंगाणा 1, छत्तीसगड 1 जागेवर पोटनिवडणूक होत आहे. मध्य प्रदेशमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. या विजयाने मध्य प्रदेश भाजपच्या गोटात आनंदाचं वातावरण पसरलं आहे. (Madhya pradesh by Election 2020 Cm Shivraj Singh Chauhan on jyotiraditya Scindia)
मध्य प्रदेश पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसमधून भाजपात गेलेले ज्योतिरादित्य सिंधिया यांचे समर्थक आमदार जास्त करुन निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. या समर्खत आमदारांना निवडून आणण्याचं आव्हान ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यापुढे होतं. हे आव्हान सिंधिया यांनी तितक्याच ताकदीने पेललं आहे. सिंधिया समर्थकांचा मोठ्या फरकाने विजय झाला आहे. यामुळे मुख्यमंत्री शिवराज सिंह भलतेच खुश झाले आहेत. त्यांनी सिंधिया यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे.
ज्याप्रमाणे दुधात साखर विरघळते त्याप्रमाणे ज्योतिरादित्य सिंधिया भाजपमध्ये विरघळून गेले आहेत, अशा शब्दात शिवराज सिंह चौहान यांनी सिंधिया यांचं कौतुक केलं आहे. काँग्रेसच्या नकारात्मक राजकारणाला जनतेने नाकारलं आहे. मोदींजींच्या कामाला लोकांची पसंती आहे, मध्य प्रदेशचा विजय हा लोकांचा विजय आहे, असं शिवराज म्हणाले.
मध्यप्रदेशमधील 28 जागांच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज सकाळी 8 वाजल्यापासून सुरु आहे. सगळ्या जागांचे निकाल हाती आलेले नसले तरी बहुतांशी जागी भाजप उमेदवार आघाडीवर आहेत.
मध्य प्रदेशमध्ये 28 विधानसभा जागांवर 3 नोव्हेंबरला मतदान झालं होतं. या 28 जागांवर एकूण 355 उमेदवार मैदानात आहेत. यावेळी भाजप आणि काँग्रेसशिवाय बसपाने देखील सर्व 28 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. याशिवाय सपाने 14 मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले आहेत.
आतापर्यंत हाती आलेल्या पोटनिवडणूक निकालाच्या आकडेवारीनुसार मध्य प्रदेशमधील 28 पैकी 20 जागांवर भाजपने आघाडी घेतली आहे. काँग्रेसला 7 जागांवर तर अन्यला एका जागेवर आघाडी मिळाली आहे.
(Madhya pradesh by Election 2020 Cm Shivraj Singh Chauhan on jyotiraditya Scindia)
संबंधित बातम्या
By Election Result 2020 LIVE: देशातील 11 राज्यांमध्ये पोटनिवडणुकीचा निकाल, कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?