सौरव गांगुलीचा हार्ट अटॅक बंगालमध्ये कुणाला राजकीय झटका देणार?
गांगुलीच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सौरवच्या पत्नीला फोन केला. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रुग्णालयात जात सौरवच्या प्रकृतीची चौकशी केल्याची माहिती मिळत आहे.
नवी दिल्ली: BCCI चा अध्यक्ष आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याला हृदयविकाराचा सौम्य धक्का आल्यानंतर त्याच्यावर कोलकातामधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडतानाही दिसत आहेत. गांगुलीच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सौरवच्या पत्नीला फोन केला. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रुग्णालयात जात सौरवच्या प्रकृतीची चौकशी केल्याची माहिती मिळत आहे. (political happenings in West Bengal after Sourav Ganguly suffered a heart attack)
अमित शाहांचा गांगुलीच्या पत्नीला फोन
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सौरवच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थनाही केली आहे. तसंच सौरवच्या उपचारांसाठी लागणाऱ्या सर्व मदतीची तयारीही शाह यांनी दर्शवली आहे. शाह यांनी सौरवची पत्नी डोना गांगुलीला फोन करुन सौरवच्या प्रकृतीची माहितीही घेतली आहे. इतकंच नाही तर पुढील उपचारासाठी सौरवला दिल्लीला हलवण्याची तयारीही अमित शाह यांनी दाखवली आहे.
ममता बॅनर्जी रुग्णालयात
सौरव गांगुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रुग्णालयात पोहोचल्या. रुग्णालयात दाखल होत ममता यांनी सौरवच्या प्रकृतीची चौकशी केल्याची माहिती मिळत आहे.
ममता बॅनर्जी यांनी गांगुलीच्या स्वास्थ्यासाठी पार्थना केली आहे. “गांगुलीला सौम्य झटका आला, हे ऐकून मला फार दुख झालं. गांगुली लवकरात लवकर बरा व्हावा, अशी मी प्रार्थना करते. आम्ही गांगुलीच्या कुटुंबासोबत आहोत,” असं ट्विट ममता बॅनर्जी यांनी केलं आहे.
Sad to hear that @SGanguly99 suffered a mild cardiac arrest and has been admitted to hospital.
Wishing him a speedy and full recovery. My thoughts and prayers are with him and his family!
— Mamata Banerjee (@MamataOfficial) January 2, 2021
पश्चिम बंगालमध्ये राजकीय उलथापालथ
पश्चिम बंगालमध्ये आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. ममता बॅनर्जी यांची सत्ता उलथून टाकण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे. भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पश्चिम बंगालमधील दौरे त्याचेच संकेत मानले जात आहेत. इतकंच नाही तर ममता बॅनर्जी यांचे एक-एक शिलेदार भाजपनं आपल्या गोटात ओढायला सुरुवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जीही चांगल्याच सतर्क झाल्या आहेत.
सौरव गांगुलीला मुख्यमंत्रीपदाची ऑफर?
पश्चिम बंगालमधून ममता बॅनर्जी यांना सत्तेपासून खाली खेचायचं झाल्यास तेवढाच ताकदीचा चेहरा भाजपला हवा आहे. त्यासाठी भाजपनं थेट सौरव गांगुलीला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याची बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसात सौरव गांगुली आणि भाजप नेत्यांच्या वाढत्या भेटीमुळे या चर्चेला अधिक बळकटी मिळत आहे. सौरव गांगुली याने भाजपचा प्रस्ताव स्वीकारल्यास तो ममता बॅनर्जी यांच्यासाठी मोठा धक्का असेल. त्यामुळे ममता बॅनर्जीही एक एक पत्ता मोठा विचारपूर्वक टाकत आहेत.
सौरव गांगुली आणि राज्यपाल भेट
सौरव गांगुली याने काही दिवसांपूर्वीच पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांची राजभवनात जात भेट घेतली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशीत दिल्लीमध्ये सौरव आणि अमित शाह यांची भेट झाली होती. त्यामुळे ममता बॅनर्जीही सतर्क झाल्या आहेत. ममता बॅनर्जी यांनीही सौरव गांगुलीबाबत काय रणनिती आखता येईल, याबाबत काम करण्यास सुरुवात केली आहे.
सौरवला दिलेला भूखंड काढून घेणार?
सौरव गांगुली आणि भाजपची वाढती जवळीक ममता बॅनर्जी यांच्यासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. सौरवने राज्यपाल आणि अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर पश्चिम बंगाल सरकारने तात्काळ आदेश जारी करत सौरवला देण्यात आलेला भूखंड काढून घेण्याचे आदेश दिले आहेत. या अचानक घडलेल्या मोठ्या राजकीय घडामोडींमुळे सौरव तणावात आल्यामुळेच त्याची प्रकृती बिघडल्याचं बोललं जात आहे.
पश्चिम बंगालमधील भाजपची रणनिती, ममता बॅनर्जी यांच्या खंद्या शिलेदारांनाच भाजपमध्ये घेणं, सौरव गांगुली सारख्या अत्यंत लोकप्रिय चेहरा देण्याचा भाजपचा प्रयत्न आणि ममता बॅनर्जी यांचा सातत्यानं सुरु असलेला केंद्रावरील हल्ला, या पार्श्वभूमीवर आता सौरव गांगुली याला आलेला हृदयविकाराचा सौम्य धक्का कुणाला मोठा राजकीय झटका देतो, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
संबंधित बातम्या:
क्रिकेटर सौरव गांगुलीला ह्रदयविकाराचा सौम्य झटका
सौरभ गांगुलीला दिलेली जमीन परत घेणार, ममता सरकारकडून प्रक्रिया सुरु
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा सौरव गांगुलीच्या पत्नीला फोन, सर्वतोपरी मदतीचं आश्वासन
political happenings in West Bengal after Sourav Ganguly suffered a heart attack