ओवैसी म्हणाले दंडावर पट्टी बांधा, मौलानांचं मत मात्र वेगळंच, म्हणाले..
एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनीदेखील देशातील समस्त मुस्लिमांना या हल्ल्याचा निषेध करण्याचे आवाहन केले होते. ओवैसी यांच्या या आवाहनावर मात्र मौलाना शहाबुद्दीन रिझवी यांनी वेगळे मत नोंदवले आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा सर्वच स्तरातून निषेध केला जात आहे. देशांनी राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, धार्मिक स्थळांनी मतभेद विसरून वेगवेगळ्या मार्गाने पाकिस्तानचा धिक्कार केला. एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनीदेखील देशातील समस्त मुस्लिमांना या हल्ल्याचा निषेध करण्याचे आवाहन केले होते. ओवैसी यांच्या या आवाहनावर मात्र मौलाना शहाबुद्दीन रिझवी यांनी वेगळे मत नोंदवले आहे.
मौलना रिझवी नेमकं काय म्हणाले?
मौलाना शहाबुद्दीन रिझवी यांनी पहलगाम हल्ल्याचा जाहीर निषेध केला. भारतातील समस्त मुस्लीम बांधव या वेदनादायी घटनेत प्रभावित झालेल्या कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त करतो. मानवतेला कलंकीत करणारी ही घटना असून यामुळे संपूर्ण देश दु:खी आहे, असे रिझवी म्हणाले.
अखंडता, एकता आणि शांतीसाठी प्रार्थना करण्याचं आवाहन
पहलगाम हल्ला झाल्यानंतर आम्ही देशभरातील मशिदीत मृतांसाठी खास दुवा केली, अशी माहिती त्यांनी दिली. देशभरातील मशिदीतील इमाम आणि नमाज अदा करण्यासाठी आलेल्या मुस्लीम बांधवांनी देशाची अखंडता, एकता आणि शांतीसाठी प्रार्थना करावी, असेही आम्ही सांगितल्याचे रिझवी यांनी सांगितले.
रिझवी ओवैसींच्या मताशी असहमत?
दरम्यान, यावेळी पत्रकारांनी त्यांना असदुद्दीने ओवैसी यांनी केलेल्या आवाहनाबद्दल विचारणा केली. त्यावर बोलताना रिझवी म्हणाले की, आम्ही आमच्या संस्थेकडून दंडावर काळी फित बांधण्याचं आवाहन केलेलं नाही. अशा प्रकारचा प्रतिकात्मक विरोध केल्यानंतर लोकांमध्ये चुकीचा संदेश जातो. यातून बंधुभावाची स्थिती बिघडते. आम्ही फक्त शांती आणि अखंडतेसाठी दुआ करण्याचं अपील केलं. कोणत्याही प्रकारचं प्रदर्शन करण्याचं कोणतंही आवाहन केलेलं नाही, असं रिझवी यांनी स्पष्ट केलं.
असदुद्दीन ओवैसी यांनी काय आवाहन केलं होतं?
दरम्यान, असदुद्दीन ओवैसी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून समस्त मुस्लीम बांधवांना शुक्रवारच्या नमाज पठणादरम्यान दंडाला काळ्या रंगाची फित बांधण्याचे आवाहन केले होते. या माध्यमातून पहलगाम हल्ल्याचा निषेध करावा, असे आवाहन त्यांनी केले होते. त्यांच्या आवाहनानंतर अनेक ठिकाणी मुस्लीम बांधवांनी नमाज पठणादरम्यान दंडाला काळ्या फिती लावल्या होत्या.