मेहबुबा मुफ्तींच्या मुलीचं अमित शाहांना पत्र
इल्तिजा यांनी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून काश्मीरमध्ये अन्याय होत असल्याचा दावा केला आहे. काश्मिरींना एखाद्या जनावराप्रमाणे पिंजऱ्यात बंद केलं जात आहे, असं इल्तिजा यांनी पत्रात म्हटलं आहे.
Iltija Javed श्रीनगर : कलम 370 हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमधून अनेक नेत्यांचा तीळपापड होत आहे. माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांना ताब्यात घेतल्यानंतर, त्यांची मुलगी इल्तिजा जावेदने (Mehbooba Mufti’s daughter Iltija Javed) सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं. मेहबुबांना ताब्यात घेऊनही सरकार खोटे बोलून आपण काहीच केलं नसल्याचा आव आणत आहे, असं इल्तिजा यांनी म्हटलं होतं.
त्यानंतर आता पुन्हा एकदा इल्तिजा यांनी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून काश्मीरमध्ये अन्याय होत असल्याचा दावा केला आहे. काश्मिरींना एखाद्या जनावराप्रमाणे पिंजऱ्यात बंद केलं जात आहे, असं इल्तिजा यांनी पत्रात म्हटलं आहे.
इल्तिजा यांनी आपल्या पत्रात अमित शाहांकडून उत्तर मागितलं आहे. आज जेव्हा देशभरात स्वातंत्र्याचा जल्लोष होत असताना, काश्मिरींना मात्र जनावरांप्रमाणे पिंजऱ्यात कोंबलं आहे. त्यांच्या मानवाधिकारांवर गदा आणली जात आहे, असं इल्तिजाने म्हटलं आहे.
इल्तिजा यांनी आपल्या पत्रासोबत एक व्हॉईस मेसेजही जोडला आहे. त्यामध्ये त्या म्हणतात, “कारण तुम्हाला माहितच असेल. दुर्दैवाने मलाही आमच्या घरात नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. आम्हाला भेटायला येणाऱ्यांना गेटवरुनच माघारी धाडलं जातं. त्यामुळे भेटायला कोण आलं होतं हेच कळत नाही. आम्हाला बाहेरही पडू देत नाहीत. मी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही, तरीही मला घराबाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. मी नेहमीच कायद्याचं पालन केलं आहे. विविध वर्तमानपत्रे आणि वेबसाईट्सना दिलेल्या मुलाखतींचा दाखला देऊन, पोलिसांकडून मला गंभीर परिणाम भोगावे लागतील असा दम दिला जातो”.
माझ्यासोबत गुन्हेगारासारखं वर्तन आपल्याला गुन्हेगारासारखी वागणूक दिली जात आहे, असा आरोपही इल्तिजा यांनी केला. सातत्याने आपल्यावर नजर ठेवली जात आहे. ज्या काश्मिरींनी आवाज उठवला, त्यांच्याप्रमाणे आपल्याही जीवाला धोका आहे, असं इल्तिजा म्हणाल्या.