AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: राजाचा अहंकार प्रजेच्या हितापेक्षा मोठा होतो तेव्हा त्याच्या शासनकाळाचा अंत निश्चित : अमोल कोल्हे

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सोमवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना मोदी सरकारला चांगलेच धारेवर धरले.

VIDEO: राजाचा अहंकार प्रजेच्या हितापेक्षा मोठा होतो तेव्हा त्याच्या शासनकाळाचा अंत निश्चित : अमोल कोल्हे
| Updated on: Feb 10, 2021 | 12:44 AM
Share

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सोमवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना मोदी सरकारला चांगलेच धारेवर धरले. त्यांनी शेतकरी आंदोनावरुनही सरकारला खडेबोल सुनावले. तसेच राष्ट्रपतींच्याच भाषणातील मुद्दे घेत त्यावर भाष्य करत मोदी सरकारची चांगलीच कोंडी केली. यावेळी त्यांनी शेतकरी प्रश्नावर सन्मानजनक तोडगा काढण्यासाठी सरकारने पुढे यावं असं आवाहनही केलं. अमोल कोल्हे यांचं हे तडफदार भाषण सध्या चांगलंच व्हायरलही होत आहे (MP Amol Kolhe hits Modi Government in Parliament over Farmer Protest).

अमोल कोल्हे म्हणाले, “राष्ट्रपती महोदयांनी आपल्या अभिभाषणात केंद्र सरकारच्या विविध योजनांचा उल्लेख केला. या योजनांचा लाभ जर तळागाळातील लोकांना झाला असेल तर मी या सरकारचे अभिनंदन करतो. राष्ट्रपती महोदयांनी आपल्या अभिभाषणात नव्या संसद भवनाचे निर्माण करण्याबाबत उल्लेख केला. परंतु ज्या देशाची सार्वजनिक आरोग्यव्यवस्था कमकुवत असल्याचे कोरोनासारख्या महामारीने पुर्णतः उघड झाले असेल त्या देशाचे प्राधान्य काय असायला हवे? सध्या गरज लोकसभा मतदारसंघ, जिल्ह्यात सुसज्ज असे सार्वजनिक रुग्णालय उभारण्याची गरज आहे.”

“या सरकारला विनंती आहे की, देशाच्या आरोग्यव्यवस्थेची स्थिती पाहता अगोदर रुग्णालये आणि मग संसद भवन यावर आत्मचिंतन करावे. असंही या संसद भवनाची मागणी कुणीही केलेली नाही, परंतु ज्या निधीची मागणी सर्वजण करीत आहेत तो खासदार निधी तातडीने पुर्ववत केला जावा,” अशी मागणी अमोल कोल्हे यांनी सरकारकडे केली.

‘2 कोटी जॉब सोडा, हातातल्या नोकऱ्या गेल्या, हजार जागांसाठी लाखो अर्ज’

अमोल कोल्हे म्हणाले, “राष्ट्रपती महोदयांनी केंद्र आणि राज्य सरकारांमधील परस्परसंबंध व समन्वयाचा मुद्दा देखील मांडण्यात आला. माझी केंद्र सरकारला विनंती आहे की, महाराष्ट्र सरकारच्या हक्काची, जीएसटीच्या परताव्याची सुमारे 25 हजार कोटी रुपये केंद्राकडून येणे बाकी आहे, ही रक्कम तातडीने देण्यात यावी. या सरकारने देशातील दोन कोटी तरुणांना दरवर्षी रोजगार देण्याचे एक स्वप्न दाखविले होते, पण रोजगार मिळायचे लांबच राहिले जे हातातलं होतं ते देखील निसटून गेलं अशी स्थिती आहे. हजार जागांसाठी लाखो तरुण अर्ज करतात. चतुर्थ श्रेणीच्या जागांसाठी ग्रॅज्युएट-पोस्ट ग्रॅज्युएट तरुण रांगेत उभे आहेत.”

“कायम करायला नको म्हणून वर्ष-दोन वर्षांत कंपनी ब्रेक देते”

“‘नीम’ आणि ‘नॅशनल अप्राईंटिस’ यांसारखी धोरणे देशातील तरुणांसाठी शोषणव्यवस्था ठरली आहे. मुलांना नोकरी लागली की त्यांची लग्ने होतात आणि त्यानंतर त्याला कायम करायला नको म्हणून वर्ष-दोन वर्षांत कंपनी ब्रेक देते.यामुळे त्या तरुणांचे भविष्य अंधःकारमय होते. त्यामुळे या तरुणांचा आक्रोश समजून घ्या आणि या धोरणांचा पुनर्विचार करावा,” अशी विनंती त्यांनी सरकारला केली.

‘ओएलएक्सच्या ‘सब बेच दो’ जाहिरातीचा सरकारवर जास्तच प्रभाव’

अमोल कोल्हे यांनी अर्थसंकल्पावर बोलताना सरकारी कंपन्या विकण्याच्या धोरणावर सडकून टीका केली. ते म्हणाले, “या अभिभाषणात आम्हाला आत्मनिर्भर भारत हा एक चांगला शब्द ऐकायला मिळाला. जेव्हा आम्ही सर्वांनी ‘देश को बिकने नहीं दूँगा’ हे ऐकले होते तेव्हा आम्हाला अभिमान वाटला होता. पण त्यानंतर मात्र ओएलएक्सची जाहिरात जास्तच प्रभावी झाली आणि ती धोरणांतही दिसू लागली. जे आहे ते विकून टाकण्याचा सपाटा या सरकारने लावला. त्यामुळे आता भीती वाटतेय की हे सरकार आत्मनिर्भर भारताची उभारणी करतंय की ‘मुठभर भांडवलदारनिर्भर’ भारताची?”

“मी या सरकारला सांगू इच्छितो की, जर अशा प्रकारे मुक्त अर्थव्यवस्थेच्या पदराआड लपून केंद्र सरकार सत्तेच्या मागे-पुढे करणाऱ्या मुठभर भांडवलदारांना या देशाची संपत्ती विकून टाकणार असेल तर भावी पिढ्या आपल्याला कधीही माफ करणार नाहीत,” असेही अमोल कोल्हे यांनी नमूद केलं.

‘राष्ट्रपतींच्या भाषणात दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत शहीद झालेल्या 200 भारतीयांचा उल्लेखही नसावा?’

अमोल कोल्हे म्हणाले, “शेतकऱ्यांसाठीच्या योजनांबद्दल बोलण्यात आले. परंतु गेल्या 3 महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत शहीद झालेल्या 200 भारतीयांचा, हो मी त्यांना जाणीवपूर्वक भारतीयच म्हणतोय, त्यांचा उल्लेख देखील नसावा? त्यांच्याप्रती किंचितही संवेदना या अभिभाषणात नमूद नसावी ही आश्चर्यजनक बाब आहे. प्रजासत्ताक दिनी जी घटना घडली त्याचा निषेध करण्यात आला. हिंसेचे कसलेही समर्थन होऊ शकत नाही, ना केले जाऊ शकते. परंतु या माध्यमातून शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा जो कट रचण्यात आला तो अतिशय निषेधार्ह आहे.”

“अगोदर सांगण्यात आलं की हे पंजाबचे शेतकरी आहेत, नंतर सांगण्यात आलं की ते आडते आहेत, नंतर सांगण्यात आलं की ते खलिस्तानी आहेत. त्यानंतर तथाकथित आयटी सेल आणि मीडियातील काहींनी त्यांना देशद्रोही घोषित करुन टाकले,” असंही त्यांनी नमूद केलं.

‘देशाच्या संरक्षणासाठी पोटच्या मुलाला सीमेवर पाठवणारे बाप, आई देशद्रोही कसे?’

अमोल कोल्हे म्हणाले, “जो बाप आपल्या 18 वर्षांच्या मुलाला सांगतो की उठ, तुला लष्करात भरती व्हायचंय, जी आई आपल्या मुलाला सांगते की जर देशावर शत्रुची गोळी आली तर तुला तुझी छाती पुढे करायची आहे, तर हा असा बाप, आई देशद्रोही कसे असू शकतात? मुलगा आज उणे अंश सेल्सिअस तापमानात सियाचीनमध्ये कर्तव्यावर आहे. त्याचवेळी त्याचा 70 वर्षांचा म्हातारा बाप कडाक्याच्या थंडीत दिल्लीच्या सीमांवर आपल्या न्याय्य हक्कांसाठी आंदोलन करतोय. या अशा परिस्थितीत ‘जय जवान,जय किसान’ कसं म्हणायचं?”

“उठसूठ आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना काय म्हणायचं हे कळलं”

“आजतर देशाला दोन नवे शब्द मिळाले आहेत. त्यातला एक आहे आंदोलनजीवी. मी या शब्दाबद्दल अतिशय आभारी आहे, कारण महाराष्ट्रातील भाजपचे नेते उठसूठ आंदोलन करत होते. त्यांना काय म्हणायचं हे आम्हाला या शब्दामुळे समजलं. पण ज्या कष्टकरी वर्गासाठी बाबा आढाव वयाच्या नव्वदीतही ठामपणे उभे राहतात ते मात्र महाराष्ट्राचा अभिमान आहेत. ज्या देशाच्या स्वातंत्र्याचा पायाच आंदोलन आहे त्या देशात या शब्दाचा प्रयोग कसा काय केला जाऊ शकतो?”, असा सवाल अमोल कोल्हे यांनी विचारला.

‘बॅरीकेडस्, तटबंदी, रस्त्यावर खिळे हे कोणत्या लोकशाहीची लक्षणं?’

अमोल कोल्हे म्हणाले, “या सभागृहात काही सदस्यांनी परदेशातील लोकांनी आपल्याबद्दल काय गौरवोद्गार काढले हे अभिमानाने सांगितलं. ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष संजीवनी म्हणतील तर आम्ही खुश होऊ, अमेरिकेचे माजी अध्यक्ष ‘हाऊडी मोदी’ म्हणतील तर आम्ही टाळ्या वाजवू. पण एखादा परदेशी व्यक्ती मानवतावादी दृष्टीकोनातून शेतकरी आंदोलनाच्या बाबतीत एखादी टिपण्णी करीत असेल तर ती फॉरेन डिस्ट्रक्टीव्ह आयडॉलॉजी होते! हे बॅरीकेडस् लावणे, तटबंदी उभारणे, रस्त्यावर खिळे ठोकणे हे कोणत्या लोकशाहीचे लक्षण आहे?”

“राष्ट्रपती महोदयांनी आपल्या अभिभाषणात चाणक्याची वचने उद्धृत केली आहेत. मी या सभागृहाला सांगू इच्छितो की याच आर्य चाणक्यांनी असंही म्हटलं आहे की, जेव्हा राजाचा अहंकार प्रजेच्या हितापेक्षा मोठा होतो तेव्हा समजून जा की त्याच्या शासनकाळाचा अंत होणार हे निश्चित आहे. यामुळेच माझी या सरकारला विनंती आहे की, शेतकरी आंदोलनावर शांततेच्या मार्गाने तोडगा काढा. तरच आपण म्हणू शकू ‘जय जवान,जय किसान’,” असं म्हणत कोल्हे यांनी आपल्या भाषणाचा शेवट केला.

हेही वाचा :

 मानवी इतिहासाची दिशा बदलणारे जगातील 10 आंदोलनं कोणती? वाचा सविस्तर…

पंतप्रधान देशाची परंपरा विसरले, अहिंसक आंदोलनामुळेच देश स्वतंत्र – राजू शेट्टी

‘पंतप्रधान आम्हाला घाबरतात, त्यांना हे शोभत नाही’, ‘आंदोलनजीवी’वरुन योगेंद्र यादवांचा घणाघात

व्हिडीओ पाहा :

MP Amol Kolhe hits Modi Government in Parliament over Farmer Protest

ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.