Gangster : मच्छरदाणीसाठी लढवली गँगस्टरने शक्कल, पण न्यायदेवतेसमोर नाही लागला निभाव, न्यायालयाच्या गुगलीने आरोपीला पळता भूई झाली थोडी
Gangster : एक मच्छर साला, हा नाना पाटेकर यांचा डायलॉग आठवतो..असाच हा अफलातून प्रसंग घडला आहे..
मुंबई : तर अंडरवर्ल्डचा बादशाह दाऊद इब्राहिमचा (Dawood Ibrahim) खासमखास गँगस्टर एजाज लकडावाला (Ejaz Lakdawala) सध्या कारागृहातील मच्छरांनी पार हैराण झाला आहे. त्याला या मच्छरांपासून स्वतःची सूटका करुन घ्यायची आहे. त्याने तुरुंगात मच्छरदाणीची व्यवस्था करण्यासाठी न्यायालयासमोर एक शक्कल लढवली. त्याची सध्या जोरात चर्चा सुरु आहे..
तर हा गँगस्टर सध्या नवी मुंबईतील तळोजा तुरुंगात (Taloja Prison) आहे. जानेवारी 2020 पासून तो कारावासात आहे. दोन वर्षांत तुरुंगाच्या बाहेर येण्यासाठी त्याची धडपड काही केल्या तडीस गेली नाही. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.
तुरुंगातील असुविधेवर तो वरचेवर नाराज असतो. पण त्याला कारागृहातील मच्छरांनी अक्षरशः फोडून काढले आहे. त्यामुळे या मच्छराविरुद्ध त्याचा निरुपाय झाला. आता मच्छरदाणीसाठी त्याने थेट न्यायालयाचा दरवाजा ठोठावला.
त्याने मच्छरांपासून सुटकेसाठी मच्छरदाणीची मागणी केली. त्यासाठी त्याने सत्र न्यायालयात (Session Court) एक अर्जही सादर केला. त्यात मच्छरदाणीची मागणी त्याने केली. मच्छरांनी कसा उच्छाद मांडला आहे, याचे वर्णनही त्याने केले.
या गुरुवारी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याने त्याने मच्छरांचा भरभक्कम पुरावाच सोबत घेण्याची शक्कल लढवली. तुरुंगात असताना मारलेले मच्छर एका प्लॉस्टिकच्या बाटलीत घेऊन तो न्यायदेवतेसमोर हजर झाला. त्याने मेलेले डासांची ही बाटलीच सादर केली.
त्याने मच्छरांचा तुरुंगात किती त्रास आहे, याचे रसभरीत वर्णन केले. त्याने न्यायदेवतेकडे मच्छरदाणी मिळावी यासाठी गयावया केल्या. पण त्याच्या अर्जाला तुरुंग प्रशासनाने विरोध केला. यामुळे सुरक्षेला धोका उत्पन्न होईल असे म्हणणे प्रशासनाने दाखल केले.
गँगस्टरने मच्छरदाणी ऐवजी ओडोमास अथवा तत्सम औषधांचा वापर करुन मच्छरांच्या त्रासापासून सूटका करुन घ्यावी असे मत मांडत न्यायालयाने गॅंगस्टर एजाजचा अर्ज फेटाळला.