Loudspeaker issue-लाऊडस्पीकरच्या वादातून हत्या, मंदिरात सुरु होती जोरात आरती, दोघांना लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, एकाचा रुग्णालयात मृत्यू, दुसरा गंभीर
मशिदीवरील लाऊडस्पीकर बंद व्हायला हवेत, यासाठी जरी योगी आणि राज ठाकरे यांनी हा मुद्दा उचलला असला तरी आता त्याचे विपरीत परिणाम समाजात पाहायला मिळत आहेत. एकमेकांवरील वैर काढण्यासाठी या मुद्द्याचा वापर करुन हिंदू समुदायातील वेगवेगळ्या जातीतील काही अपप्रवृत्ती या मुद्द्याचा वापर करुन असे प्रकार करताना दिसत आहेत.
अहमदाबाद – लाऊडस्पीकरवर (loudspeaker controversy)जोरजोरात वाजवून आरती करत होते म्हणून चिडलेल्या काही जणांनी दोघा मजुरांना केलेल्या बेदम मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुजरातच्या (Gujrat)मेहसाणा जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. मंदिरांवरील लाऊडस्पीकरच्या आवाजामुळे होणाऱ्या वादातून गुजरातेत झालेली ही दुसरी घटना आहे. राज ठाकरे आणि योगी आदित्यनाथ यांनी मंदिर आणि मशिदींवरील लाऊडस्पीकरबाबत घेतलेल्या भूमिकांमुळे सध्या भोंगे हा देशभरात चर्चेचा आणि वादाचा विषय ठरताना दिसत आहेत. ४ मे नंतर महाराष्ट्रात अनेक मंदिर आणि मशिदींवरील भोंगे उतरवण्यास सुरुवात झाली आहे. तर देशभरात याचे पडसाद उमटताना दिसतायेत. गुजरातसारख्या धार्मिक राज्यातही या वादाचे पडसाद उमटताना दिसतायेत.
नेमकं काय घडलं
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहसाणा जिल्ह्यातील जोतना तालुक्यात लक्ष्मी पुरा गावात हा प्रकार घडला आहे. या घटनेत मृत्यमुमुखी पडलेला जसवंतजी ठाकोर हा मजुरीचे काम करीत असे. जसवंत आणि त्यांचे मोठे बंधू अजिक ठाकोर हे बुधवारी संध्याकाळी सातच्या सुमारास मेल्डी मातेच्या मंदिरात आरती करत होते. लाऊडस्पीकरवर जोरजोरात ही आरती सुरु होती. तेवढ्यात सदाजी ठाकोर, विष्णू ठाकोर, बाबू ठाकोर, जयंती ठाकोर, जवान ठाकोर आणि विनू ठाकोर हे मंदिरात आले आणि त्यांनी लाऊडस्पीकरवर इतक्या जोरजोरात आरती का करत आहेत, याची विचारणा केली. जसवंत यांचे बंधू अजित यांनी आरती करत असल्याचे या सगळ्यांना सांगितले. त्यानंतर यातील सदा ठाकोर यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. याला जसवंत आणि अजित यांनी आक्षेप घेतल्यानंतर सदाने आपल्या इतर मित्रांना मंदिरात बोलावले. या सगळ्यांनी जसवंत आणि अजित यांच्यावर लाठ्याकाठ्यांनी हल्ला केला.
या हल्ल्यात जसवंत आणि अजित हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. याच स्थितीत त्यांना मेहसाणाच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. जिथे उपचारादरम्यान जसवंत यांचा मृत्यू झाला. यानंतर गुरुवारी अजित यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन घेतला आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या अजित यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Gujarat | A 40-year-old man was beaten to death allegedly for playing loudspeaker at a temple in Mudarda village of Mehsana. Six persons were arrested and charged with murder, rioting, assault, says police. pic.twitter.com/nD6eq6JPqN
— ANI (@ANI) May 6, 2022
लाऊडस्पीकरच्या वादातून यापूर्वीही झाली मारहाण
यापूर्वी २ मे रोजी अहमदाबादच्या बावला तालुक्यात ३० वर्षीय भरत राठोड याला मंदिरात लाऊडडस्पीकर लावला म्हणून बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणातही पीडीत आणि आरोपी हे हिंदु समुदायातील वेगवेगळ्या जातीतील होते.
भोंग्याच्या वादातून हिंदू समुदायातही निर्माण होते आहे तेढ
मशिदीवरील लाऊडस्पीकर बंद व्हायला हवेत, यासाठी जरी योगी आणि राज ठाकरे यांनी हा मुद्दा उचलला असला तरी आता त्याचे विपरीत परिणाम समाजात पाहायला मिळत आहेत. एकमेकांवरील वैर काढण्यासाठी या मुद्द्याचा वापर करुन हिंदू समुदायातील वेगवेगळ्या जातीतील काही अपप्रवृत्ती या मुद्द्याचा वापर करुन असे प्रकार करताना दिसत आहेत.