मार्चमध्ये राज्यात भाजपचं सरकार येणार, नारायण राणेंनी सांगितली नवी तारीख

| Updated on: Nov 26, 2021 | 1:25 PM

राज्यातील आघाडी सरकार कोसळण्याच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे. राज्यातील आघाडी सरकार मार्चमध्ये कोसळणार असून मार्चमध्ये भाजपचं सरकार येणार असल्याचा दावा केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केला आहे.

मार्चमध्ये राज्यात भाजपचं सरकार येणार, नारायण राणेंनी सांगितली नवी तारीख
narayan rane
Follow us on

नवी दिल्ली: राज्यातील आघाडी सरकार कोसळण्याच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे. राज्यातील आघाडी सरकार मार्चमध्ये कोसळणार असून मार्चमध्ये भाजपचं सरकार येणार असल्याचा दावा केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. राणे यांच्या या नव्या तारखेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

नारायण राणे यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला आहे. राज्यात अनागोंदी कारभार आहे. भाजपचं सरकार नाही त्यामुळे असं होत आहे. मार्चमध्ये भाजपचं सरकार येणार आहे. तेव्हा तुम्हाला अपेक्षित बदल दिसेल. राज्यातील मविआ सरकार फार काळ टिकणार नाही, असं राणे म्हणाले.

सरकारचं लाईफ अधिक नाही

माझ्या मनात काही गोष्टी आहेत. त्या आताच सांगणार नाही. सरकार पाडायचं असेल किंवा नवं सरकार आणण्यासाठीच्या काही करायचं असेल तर अशा गोष्टी उघड बोलायच्या नसतात, असं सूचक विधानही त्यांनी केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आजारी आहेत. आजारी माणसाचं नाव घेऊन काही बोलणं योग्य नाही. पण आघाडी सरकारचं लाईफ अधिक नाही, असंही ते म्हणाले.

लक्ष देण्याची गरज नाही

दरम्यान, नाराणय राणे यांच्या या विधानाबाबत राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर, राणे काय बोलतात याकडे लक्ष देण्याची गरज नाही, असा टोला परब यांनी लगावला आहे.

राणे आणि भविष्यवाणी

नारायण राणे यांनी भाजपमध्ये आल्यापासून अनेकदा सरकार कोसळणार असल्याच्या भविष्यवाणी केल्या आहेत. कधी दिवाळीनंतर सरकार कोसळेल, तर कधी नव्या वर्षात सरकार कोसळेल असं त्यांनी सांगितलं आहे. मात्र, राणेंनी दिलेल्या डेडलाईनमध्ये सरकार काही कोसळलेलं नाही. त्यामुळे राणेंनी आता केलेली भविष्यवाणीही केवळ हुलबाजी असल्याचं बोललं जात आहे.

सरकार कोसळणं शक्य नाही

दरम्यान, भाजपने कितीही दावे केले तरी अंकांचं जे गणित आहे ते जुळवणं भाजपला आजपर्यंत शक्य झालं नाही. आणि ते कधीही शक्य होणार नाही. पक्षांतर बंदी कायद्यानुसार दोन तृतीयांश सदस्य एका पक्षातून बाहेर पडतात तेव्हाच त्यांना पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही. तेव्हाच तो संपूर्ण गट एखाद्या पक्षाला पाठिंबा देतो आणि सरकार बनू शकते, असं राजकीय विश्लेषक विवेक भावसार यांनी सांगितलं. आता शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सदस्य फोडायचे म्हटलं तर 34 किंवा 38 सदस्य फोडावे लागतील. एकाचवेळी कोणत्याही पक्षातून एवढे सदस्य फोडणं भाजपला शक्य नाहीये. कमीत कमी आमदार फुटले तर राजीनामा देऊन त्यांना बाहेर पडावे लागेल. परंतु, राजीनामा देऊन निवडणूक लढवण्याची कोणत्याही आमदारांची सध्या मन:स्थिती नाही. शिवाय भाजपही आज या आमदारांना निवडून आणण्याची गॅरंटी घेऊ शकत नाही, असंही भावसार यांनी सांगितलं.

 

संबंधित बातम्या:

ST workers : हट्ट करणाऱ्यांवर कारवाई करावीच लागेल. संपावरील एसटी कर्मचाऱ्यांना अनिल परबांचा इशारा

संविधानाला नेमका कुणाचा धोका? मोदी म्हणतात, काश्मीर टू कन्याकुमारी, पार्टी फॉर द फॅमिली!

26/11: धावत्या मुंबईला थांबायला लावणारा हल्ला! असंख्य जखमा, रक्तपात अन् दहशतवादाशी दोन-हात!