Mann Ki Baat ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात झाला बदल, कारण….
पंतप्रधान मोदींनी सर्वसामान्यांकडून सूचना मागवल्या होत्या. त्यांनी एका ट्विटमध्ये म्हटले होते की, नागरिकांकडून इनपुट मिळाल्यामुळे मला नेहमीच आनंद वाटत राहिला आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 18 जून रोजी रेडिओवरील कार्यक्रम ‘मन की बात’ करणार आहेत. या कार्यक्रमाचा हा 102 वा भाग असणार आहे. परंतु यावेळी नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम 25 जून ऐवजी 18 जून रोजी होणार आहे. हा कार्यक्रम महिन्याच्या शेवटच्या रविवारी सादर होत असतो. मात्र या महिन्याचा शेवटचा रविवार हा 25 जून रोजी आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यावेळी हा कार्यक्रम 18 जून रोजी होणार असल्याचे सांगण्यात आले.पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 ते 24 जून दरम्यान अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन आणि फर्स्ट लेडी जिल बिडेन यांच्याकडून स्टेट डिनरचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान 21 जून रोजी न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्र संघात आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या समारंभाला उपस्थित राहणार आहेत.
या दौऱ्यामध्ये नरेंद्र मोदी उद्योग क्षेत्रातील महत्वाच्या व्यक्तींच्या गाठीभेटी घेणार आहेत. तर त्याच वेळी ते अमेरिकेतील राजकीय नेत्यांबरोबर चर्चाही करणार आहेत.
थेट प्रक्षेपण
तर त्यामुळे ऑल इंडिया रेडिओ, दूरदर्शन आणि नरेंद्र मोदी मोबाईल अॅपवर मन की बात हा कार्यक्रम प्रसारित केला जाणार आहे. ऑल इंडिया रेडिओ, डीडी न्यूज आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब चॅनेलवरही या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. हिंदी प्रसारणानंतर त्याचवेळी ऑल इंडिया रेडिओ हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्ये प्रसारित करणार आहे.
पंतप्रधानांनी सर्वसामान्यांकडून सूचना मागवल्या
मन की बात कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदींनी सर्वसामान्यांकडून सूचना मागवल्या होत्या. त्यांनी एका ट्विटमध्ये म्हटले होते की, नागरिकांकडून इनपुट मिळाल्यामुळे मला नेहमीच आनंद वाटत राहिला आहे. लोक नमो अॅप, MyGov वर नवीन माहिती शेअर करू शकतात किंवा 1800-11-7800 डायल करून त्यांचा संदेश रेकॉर्ड करू शकतात. किंवा ते 1922 वर मिस्ड कॉलदेखील देऊ शकतात.