जालन्यातील लाठीमार अन् मराठा आरक्षणावर संभाजीराजे यांची काय भूमिका? म्हणाले…
Chhatrapti Sambhaji Raje on Jalna Lathi Charge : जालन्यातील लाठीमार अन् मराठा आरक्षणावर संभाजीराजे यांची काय भूमिका? इंडिया शब्द राज्यघटनेतून हटवला जाण्याची शक्यता आहे. यावर संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. म्हणाले...
नवी दिल्ली | 05 सप्टेंबर 2023 : मराठा आरक्षण आणि इतर मागण्यासाठी जालन्यातील अंतरवलीत उपोषण करण्यात येत होतं. यावेळी पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला. या घटनेचा महाराष्ट्रभरातून निषेध करण्यात आला. ठिकाठिकाणी मोर्चे काढण्यात आले. शिवाय शहरं-गावं बंद ठेवण्यात आली. या सगळ्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही राजीनाम्याची मागणी करण्यात आली. यावर छत्रपती संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संभाजीराजे यांनी दिल्लीत बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिवाय मराठा आरक्षणावरही त्यांनी भाष्य केलं आहे. राज्यघटनेतील इंडिया हा शब्द हटवला जाण्याची शक्यता आहे. त्यावर संभाजी राजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मराठा समाजाची जी भूमिका आहे तीच माझी भूमिका असेल. तुम्हाला आरक्षण मिळावायचं असेल तर वेगवेगळे पॅरामीटर आहेत. सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला मागास म्हटलेलं नाही. पहिल्यांदा मराठा समाजाला आयोगाने मागास ठरवायला हवं. त्यानंतर आरक्षणाची प्रक्रिया सोपी होईल, असं संभाजीराजे म्हणाले. जालन्यात मराठा आंदोलकांवर लाठीमार करण्यात आला. यानंतर संभाजीराजे यांनी घटनास्थळी जात आंदोलकांची भेट घेतली. अंतरवाली सराटीत जात संभाजीराजे यांनी आंदोलकांशी संवाद साधला. त्यांची विचारपूस केली. तसंच आपण सोबत असल्याचं सांगत धीर दिला. त्यानंतर आज त्यांनी पुन्हा या मुद्द्यावर भाष्य केलं.
दुर्गम आणि दुर्बल भागातील लोकांना 50 टक्क्याच्या वर आरक्षण देता येतं. अन्यथा केंद्राला बदल करावा लागेल. क्युरेटीव्ह पिटीशन अगोदरच टाकायला हवी होती. हा राज्याचा प्रश्न आहे. निजामाने मराठ्यांना कुणबी केलं होतं. मराठवाड्यातल्या कुणब्यांना आरक्षण द्यायला अशी मागणी जरांडे यांनी केली आहे. राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवायला हवी. मुख्यमंत्र्यांचा मला फोन आला होता. जरांडे पाटीलांची प्रकृती खालावली आहे. या अगोदर मराठा समाजातील 40 लोकांनी आत्महत्या केल्या आहेत, असंही संभाजीराजे म्हणाले.
18 सप्टेंबरपासून 22 सप्टेंबरपर्यंत संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. या अधिवेशनात नवा प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे. यात देशाच्या राज्यघटनेतील ‘इंडिया’ हा शब्द हटवला जावा, असं विधेयक मांडलं जाण्याची शक्यता आहे. यावरून संमिश्र प्रतिक्रिया समोर येत आहेत. संभाजीराजेंनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे ‘इंडिया’ शब्द बदलून भारत केला जात असेल तर काही चुकीचं नाही, असं ते म्हणालेत.