ललित झा नव्हे तर ‘ही’ व्यक्ती आहे संसदेतील ‘स्मोक हल्ल्या’ची सूत्रधार
Prliament Security Beach Mastermind : संसदेतील 'स्मोक हल्ल्या'चा खरा सूत्रधाराला पोलिसांच्या ताब्यात घेतलं आहे. ललितने या व्यक्तीसोबत मिळून फोन नष्ट केले. आरोपींच्या फोनचं यांनी नेमकं काय केलं? या प्रकरणाचा खरा सूत्रधार कोण? या सगळ्याची सविस्तर माहिती... त्यासाठी ही बातमी वाचा...
नवी दिल्ली | 15 डिसेंबर 2023 : दिवस 13 डिसेंबर… वेळच्या दुपारी एक वाजेची… हिवाळी अधिवेशन सुरु होतं. लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज सुरु होतं. अशात लोकसभे अनपेक्षित प्रकार घडला. लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या दोन तरूणांनी खासदार बसलेल्या बाकांवर उडी मारली अन् अख्ख्या सभागृहात गोंधळ उडाला. जेव्हा लोकसभेत हा प्रकार घडत होता. तेव्हा संसदेच्या बाहेरही दोन लोकांनी धुडगूस घातला. महाराष्ट्रातील अमोल शिंदे आणि हरियाणातील नीलम कौर सिंह या तरूणीने स्मोक कँडल फोडले. या हल्ल्याचे देशभर पडसाद उमटले. या सगळ्या प्रकरणाचा सूत्रधार ललित झा असल्याचं बोललं जात होतं. मात्र आता खऱ्या मास्टरमाईंडचं नाव पुढे आलं आहे.
सूत्रधार कोण?
संसदेत स्मोक कँडल फोडणाऱ्या चौघांचे फोन ललित झा या तरूणाजवळ होते. हे फोन घेऊन ललित फरार झाला. त्यामुळे ललित झा या स्मोक हल्ल्याचा सूत्रधार असल्याचं बोललं जात होतं. मात्र ललित झा नव्हे तर महेश कुमावत हा संसदेतील स्मोक हल्लाचा सूत्रधार असल्याचं समोर येतंय. महेश कुमावतला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याची कसून चौकशी केली जात आहे.
महेश कुमावत आणि ललितचं कनेक्शन
महेश कुमावत हा संसदेतील स्मोक हल्ल्याचा सूत्रधार असल्याची माहिती आहे. महेश कुमावत हा राजस्थानचा आहे. महेश कुमावत हा भगत सिंह फॅन क्लबशी संबंधित आहे. ललित जेव्हा दिल्लीतून या चौघांचे फोन घेऊन पळाला तेव्हा तो महेशकडे गेल्याची माहितीये. महेशनेच ललितला हॉटेलमध्ये राहण्यासाठी रूम उपलब्ध करून दिली. याच रूममधून ललित सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून होता. जेव्हा ललितच्या लक्षात आलं की पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तर तो दिल्लीत आला आणि दिल्ली पोलिसांना शरण गेला. ललित झा याची रात्री कसून चौकशी झाली.
फोनचं काय केलं?
संसदेत जायचं तर कुणा खासदाराकडून एन्ट्री पास मिळवावा लागेल, याची या आरोपींना जाणीव होती. त्यामुळे मित्रांसोबत चर्चा करून त्यांनी संसदेचा एन्ट्री पास मिळवला. ललितने सगळ्या सहकाऱ्यांचे फोन राजस्थानमध्ये नष्ट केलं. ललितने महेशच्या साथीने हे फओन जाळले. ललितकडे अमोल, मनोरंजन, सागर आणि नीलम या चौघांचेही फोन होते. ते त्यांनी जाळले.