भटक्या कुत्र्यांना इच्छा मरणाची परवानगी दिली जाणार?; सर्वोच्च न्यायालय आज निर्णय देणार
Supreme Court on Stray Dogs Issue : भटक्या कुत्र्यांच्या इच्छा मरणाविषयीच्या याचिकेवर आज सुनावणी; अवघ्या देशाचं लक्ष
नवी दिल्ली : भटके कुत्र्यांचे माणसांवर होणारे जीव घेणे हल्ले आता नवीन नाहीत. रोज भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या कितीतरी घटना समोर येतात. अशातच आता भटक्या कुत्र्यांनाही इच्छा मरण देता यावं, अशी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.
भटक्या कुत्र्यांच्या इच्छा मरणाच्या याचिकेवर आज सुनावणी होतेय. या निर्णय अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे.
हिंस्र आणि धोकादायक असणाऱ्या या भटक्या कुत्र्यांना मानवी पद्धतीने इच्छा मरण देण्यात यावं, अशी ही याचिका आहे. एखाद्या व्यक्तीने इच्छा मरणाची मागणी केल्यास त्याला कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी घेत ज्या प्रकारे मृत्यू दिला जातो. त्या प्रकारे या भटक्या कुत्र्यांनाही इच्छा मरण देता यावं, अशी मागणी करण्यात आली आहे.
केरळमधल्या कन्नूर जिल्ह्यातील एका घटनेनंतर भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याबाबत गांभीर्यपूर्वक पावलं उचलली गेली. तशी याचिका कन्नूर जिल्हा पंचायतीने सर्वोच्च न्यायलयात दाखल केली आहे.
11 जून 2023 रोजी केरळमधल्या कन्नूरमध्ये 11 वर्षीय ऑटिस्टिक मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. यात या मुलाचा मृत्यू झाला. या प्रकरणानंतर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. कन्नूरमधल्या या घटनेचा व्हीडिओ देखील आहे. हा व्हीडिओ न्यायाधिशांनी पाहावा, असं याचिकाकर्त्याचं म्हणणं आहे. तशी विनंतीही करण्यात आली आहे. या प्रकरणावर आज सुनावणी आहे.
21 जूनला झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यासमोर मौखिक विनंती करण्यात आली. त्याची दखल घेत आज या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.
गेल्या वर्षी केरळमधल्या कोट्टायम जिल्ह्यातही अशीच एक घटना घडली होती. 12 वर्षांच्या मुलाचा भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. या कोट्टायम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कुत्र्याच्या हल्ल्याच्या घटना समोर आल्या.
केरळच्या कन्नूर जिल्ह्यात 28 हजारांहून अधिक भटके कुत्रे आहेत. ये भटके कुत्रे बेसावध माणसांवर हल्ला करतात.
2019 या वर्षात 5 हजार 794 भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटना समोर आल्या. 2020 मध्ये 3 हजार 951 जणांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. तर 2021 मध्ये या आकड्यात वाढ झासी. 7 हजार 927 घटनांची नोंद झाली. 2022 मध्ये तर हा आकडा प्रचंड वाढला. 11 हजार 776 जणांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. तर 19 जून 2023 पर्यंत 6 हजार 276 जणांवर कुत्र्यांची हल्ला केल्याचं समोर आलं आहे.