आधी भ्याड हल्ला, मग भारतीय जवानांची हत्यारंही पळवली, नक्षलवाद्यांच्या प्रेस नोटमध्ये काय मागण्या?
छत्तीसगडमध्ये सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केल्यानंतर नक्षलवाद्यांनी एक प्रेस नोट जारी केलीय. यात त्यांनी सीआरपीएफचा एक जवान आपल्या ताब्यात असल्याचा दावा केलाय.
रायपूर : छत्तीसगडमध्ये सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केल्यानंतर नक्षलवाद्यांनी एक प्रेस नोट जारी केलीय. यात त्यांनी सीआरपीएफचा एक जवान आपल्या ताब्यात असल्याचा दावा केलाय. तसेच जोपर्यंत मध्यस्थांच्या माध्यमातून सरकार चर्चा करत नाही तोपर्यंत तो आपल्याकडे सुरक्षित राहिल असंही म्हटलंय. विशेष म्हणजे या प्रेस नोटमध्ये नक्षलवाद्यांनी बिजापूर जिल्ह्यात 4 तास चाललेल्या या चकमकीत जवानांची हत्या करुन पळवलेल्या हत्यारांचीही माहिती दिलीय. यानुसार नक्षलवाद्यांनी जवानांच्या 14 रायफल आणि 2000 पेक्षा अधिक काडतुसं ताब्यात घेतली आहेत. ही प्रेस नोट भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या (माओवादी) यांच्या दंडकारण्य स्पेशल झोनल समितीने प्रसारित केलीय (Naxalite release press note after attack on CRPF soldiers in Chhattisgarh).
नक्षलवाद्यांनी आपल्या प्रेस नोटमध्ये अनेक दावे केले आहेत. तसेच आपल्या मागण्याही सांगितल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांनी सीआरपीएफच्या एका जवानाचं अपहरण केल्याचंही कबुल केलंय. सरकारने आपल्या मागण्या मान्य केल्यास या जवानाला सुरक्षित सोडण्यात येईल, असंही त्यांनी म्हटलं. नक्षलवाद्यांनी आपल्या प्रेस नोटमध्ये पोलिसांच्या 2000 जवानांनी बिजापूर जिल्ह्यातील सुकमा गावावर हल्ला केल्याचा आरोप केलाय.
सैन्य कारवाईत 150 पेक्षा अधिक ग्रामीण जनतेची हत्या केल्याचा आरोप
प्रेस नोटमध्ये दावा करण्यात आलाय, “नोव्हेंबर 2020 पासून सुरु झालेल्या सैन्य कारवाईत आतापर्यंत 150 पेक्षा अधिक ग्रामीण जनतेची हत्या करण्यात आलीय. त्यात आमच्या काही कार्यकर्ते आणि नेत्यांचाही समावेश आहे. हजारोच्या संख्येत नागरिकांना तुरुंगात टाकण्यात आलेय. महिलांवर अत्याचार करुन त्यांची हत्या करण्यात आलीय. जनतेच्या संपत्तीची आणि मालमत्तेची लूट करण्यात आलीय. एकिकडे हत्याकांड आणि दुसरीकडे पोलीस छावणी बांधत रस्त्यांची निर्मिती केली जातेय. त्यालाच विकास म्हटलं जातंय.”
सैनिकांच्या कारवाईत शाळा आणि रुग्णालयं उद्ध्वस्त केल्याचा दावा
“जनतेच्या कल्याणासाठी सरकार या भागात ना रुग्णालय सुरु करत आहे, ना शाळा सुरु करत आहे. उलट आहे त्या शाळा आणि रुग्णालयांना सैनिकांच्या कारवाईत उद्ध्वस्त करण्यात येत आहे. दुसरीकडे मावोवादी विकासविरोधी आहेत असा खोटा प्रचार करण्यात येत आहे. पोलिसांच्या छावणी आणि सरकारच्या विध्वंसाला हजारोंच्या संख्येने लोक विरोध करत आहेत. शाळा आणि रुग्णालयांची मागणी केली जात आहे. या भागातील पोलीस छावण्या हटवण्याची मागणी केली जातेय,” असंही या पत्रात म्हटलं आहे.
पोलीस आमची शत्रू नाही, मृतांच्या कुटुंबांविषयी खेद
या प्रेस नोटमध्ये नक्षलवाद्यांनी म्हटलंय, “खरंतर सामान्य पोलीस आमचे शत्रू नाहीत. सरकारकडून थोपवलेल्या युद्धात त्यांना बळीचा बकरा करण्यात येतंय. त्यांनी या युद्धात बळीचा बकरा होऊ नये, अशी त्यांना विनंती. मृत पोलिसांच्या कुटुंबांप्रती आम्हाला दुःख आहे. या हल्ल्यात आम्ही 14 बंदुका आणि 2000 पेक्षा अधिक काडतुसं ताब्यात घेतले आहेत.”
यात पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर अंबानी आणि अदानी या उद्योगपतींच्या फायद्यासाठी काम केल्याचाही आरोप नक्षलवाद्यांनी केलाय.
हेही वाचा :
बेपत्ता कोब्रा जवान ताब्यात असल्याचा दावा, सुटेकसाठी नक्षलवाद्यांकडून ‘ही’ अट
मला नक्षलवादी व्हायचंय, हवालदिल शेतकऱ्याचं हिंगोली तहसीलदाराकडे निवेदन
व्हिडीओ पाहा :
Naxalite release press note after attack on CRPF soldiers in Chhattisgarh