हा शेवटचाच प्रवास ठरणार हे त्याला माहीतच नव्हतं, विमान लँडिंग करताना फेसबुक लाइव्ह; ‘त्या’ 10 सेंकदात काय घडलं?
विमान लँडिंग होताना अवघ्या दहा सेकंदात विमान जोरदार आदळलं आणि विमानाने पेट घेतला. काही कळायच्या आत ही आग प्रचंड भडकली.
गाझीपूर: नेपाळच्या पोखरा येथे रविवारी एक विमान कोसळून विमानातील 72 पैकी 69 प्रवासी ठार झाले. यातील तिघांची अद्याप ओळख पडलेली नाही. या विमान अपघातात पाच भारतीयांचा मृत्यू झाला आहे. यातील चौघेजण उत्तर प्रदेशातील गाझीपूरमधील होते. चौघेही मित्र होते. विमान लँडिंग होण्याच्या 10 सेकंद आधीच यति एअर लाइन्सचं विमान क्रॅश झालं.
या विमान अपघातात अलवालपूर अफ्ंगा येथील सोनू जायसवाल (वय 28), विशाल शर्मा (वय 33), चकदरीया चकजैनब येथील अनिल राजभर (वय 28) आणि धरवा गावचा रहिवासी अभिषेक कुशवाहा (वय 23) याचा मृत्यू झाला. चौघेही मित्र होते. 12 जानेवारी रोजी अनिल राजभर, विशाल शर्मा आणि अभिषेक कुशवाहा तिघेही एकत्र वाराणासीवरून सारनाथला पोहोचले होते. तिथे ते सोनू जायसवालला भेटले आणि नेपाळच्या काठमांडूच्या दिशेने रवाना झाले.
चौघेही नेपाळच्या पोखरा या पर्यटनस्थळी जाण्यासाठी निघाले होते. सकाळी काठमांडूहून फ्लाइट पकडून पोखराच्या दिशेने ते निघाले होते. मात्र, खराब हवामानामुळे पोखरा आणि काठमांडूच्या दरम्यान पोखरा विमानतळावर उतरताना विमान क्रॅश झालं.
दुर्घटनेच्या आधी सोनू जायसवाल त्याच्या मोबाईलमधून फेसबुक लाइव्ह करत होता. त्याचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पिवळे टीशर्ट/ हुडी घातलेला तरुण दिसत आहे. तो सोनू जायसवाल आहे. पण त्याला काय माहीत होतं हा त्याच्या आयुष्याचा शेवटचा व्हिडीओ ठरणार आहे. शेवटचं फेसबुक लाइव्ह ठरणार आहे.
विमान लँडिंग होताना अवघ्या दहा सेकंदात विमान जोरदार आदळलं आणि विमानाने पेट घेतला. काही कळायच्या आत ही आग प्रचंड भडकली आणि विमानासहीत विमानातील प्रवाशांचा जळून कोळसा झाला.
या चौघांच्या मृत्यूची संध्याकाळी माहिती मिळताच गाझीपूरमध्ये एकच खळबळ उडाली. ग्रामस्थांनी या चारही तरुणांच्या घरी धाव घेऊन त्यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं. हे तरुण राहत असलेल्या गावावर सध्या शोककळा पसरली आहे.
स्थानिक जिल्हा प्रशासनाकडूनही या तरुणांच्या कुटुंबीयांना त्यांच्या मृत्यूची बातमी दिली आहे. तसेच नेपाळ सरकारशी संपर्क साधून पुढील सोपस्कार पार पाडले जात आहेत.